नवजात पुर्णपणे अल्लाहच्या नियंत्रणात आहे. पवित्र कुरआनमध्ये म्हटले गेले आहे की, ’’ व हुवल्-काहिरु फव्-क इबादिही व युर्-सिलु अलय्-कुम् हफजतन, हत्ता इजा जा’अ अहदकुमुल्-मवतु तवफ्फतहु रुसुलुना वहुम् ला युफर्रितुन. ’’
अनुवाद :-
तोच आपल्या भक्तांवर संपूर्ण नियंत्रण राखतो आणि तुमच्यावर निरीक्षक नियुक्त करून पाठवतो, शेवटी जेव्हा तुमच्यापैकी एखाद्याची मृत्यूघटका येऊन ठेपते तेव्हा त्याने पाठवलेले फरिश्ते माणसाला ताब्यात घेतात आणि ते आपले कर्तव्य बजावण्यात कधीही चूकत नाहीत.
( 6 अल्-अन्आम - 61 )
अल्लाह प्रत्येक माणसावर देखरेख करण्यासाठी निरीक्षक म्हणून फरिश्त्यांची नेमणूक करतो. काही फरिश्ते माणसाच्या रक्षणासाठी नियुक्त केले जातात आणि काही फरिश्ते माणसाच्या भल्या-वाईट कृत्यांची नोंद करत असतात. अल्लाह जोपर्यंत माणसाला जिवंत ठेवू इच्छितो तोपर्यंत फरिश्ते अंगरक्षक म्हणून सदैव उपस्थित असतात.
बऱ्याच वेळा माणसाचा जीव धोक्यात येतो, उदाहरणार्थ रस्ता ओलांडताना अचानक बाजूने एखादे वाहन भरधाव वेगाने निघून जाते आणि माणूस जागच्या जागी स्थिर होतो. मनात धडकी भरते आणि कोणीतरी हात धरून वाचवल्याचे जाणवते. जोपर्यंत मृत्यूची वेळ येत नाही तोपर्यंत फरिश्ते रक्षण करत असतात. मग ज्या वेळी माणसाला मृत्यू देण्याचा आदेश फरिश्त्यांना दिला जातो त्यात ते कधीच चूकत नाहीत किंवा निष्काळजीपणा करत नाहीत. माणसाला कोणतीही सवलत वा संधी देत नाहीत. यांशिवाय काही फरिश्ते माणसावर सतत लक्ष ठेवून त्याची प्रत्येक कृती लिहित असतात. यावरून हे अधोरेखित होते की प्रत्येक मनुष्य अल्लाहच्या निगराणीत आहे. मानव क्षणभरही एकटा नसतो, त्याच्यासोबत पाप-पुण्यांची नोंद करणारे फरिश्ते नेहमीच असतात. जे माणसाच्या मृत्यूपर्यंत त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाची नोंद ठेवतात. ते इतका निर्दोष आणि सर्वसमावेशक दस्तावेज तयार करतात की त्यात कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. ही श्रद्धा मनात ईशभय निर्माण करते आणि माणसाला जबाबदारीचे जीवन जगण्यास भाग पाडते, यामुळे माणसाचे वर्तन बदलते आणि तो वाईट गोष्टींपासून दूर राहू लागतो. तसेच विचार करण्याची पद्धतही बदलते, म्हणूनच त्याच्या व्यक्तिमत्वात भल्या गुणांचा विकास होतो.
..................... क्रमशः
- अब्दुल कय्यूम शेख अहमद.
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment