Halloween Costume ideas 2015

अंमली पदार्थ वापर, सेवनावर कडक निर्बंध हवेत


जागतिक स्तरावर दरवर्षी 26 जूनला संयुक्त राष्ट्रातर्फे संपूर्ण विश्वात अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. अंमली पदार्थांच्या वापरावर व तस्करीवर बंदी जरूर आहे पण अंमलबजावणी होतांना दिसून येत नाही. म्हणूनच तर अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांच्या संख्येत आणि त्याच्या व्यापारात  मोठी वाढ होत चालली आहे. 

अंमली पदार्थाचे सेवन करणे हा एक भयानक रोग आहे ज्याने असंख्य कुटुंबाचे जीवन उध्वस्त  झालेली आहेत. अंमली पदार्थाची लत किंवा त्याच्या व्यापारात अडकून जाणे स्वतःचाच नव्हे तर आपल्या कुटुंबाचा, समाजाचा, राष्ट्राचा आणि संपूर्ण जगाचा विनाश करणे होय. 

अंमली पदार्थ म्हणजे ती सर्व पदार्थ ज्याने बुद्धी भ्रष्ट होते, स्मरणशक्ती, आकलन शक्ती, निर्णय घेण्याची क्षमता नष्ट होते. अमली पदार्थांचे अनेक प्रकार आहेत. जसे गुटखा, सिगारेट, हुक्का, दारू, हशिष, अफिम, चरस, गांजा, भांग, हिरोईन, ब्राऊन शुगर, इंजेक्शन,कोकिन, पेट्रोल, नशा युक्त गोळ्या, नशायुक्त पकोडे, भांगचे पापड, क्रॅक इत्यादी . 

सद्यस्थितीत वेगवेगळे द्रव्य, टायर पंचरचे सॉल्युशन, सर्दी, खोकला इ. औषधी इत्यादींचा देखील नशा युक्त पदार्थ म्हणून नशेडी वापर करतांना दिसतात.

युएनओ चे कार्यालय (अमली पदार्थ आणि क्राईम) णछजऊउ ने जारी केलेल्या 2019 च्या अमली पदार्थ ड्रग रिपोर्ट प्रमाणे जगात जवळपास 275 मिलियन व्यक्तींनी अमली पदार्थाचे वापर केले. काही लोकांच्या अंदाजानुसार जगात अमली पदार्थांच्या स्मगलिंगचा व्यापार 650 बिलियन डॉलर्सच्यावर पोहोचलेला आहे. तसेच 36 मिलियन पेक्षा जास्त व्यक्तींनी अमली पदार्थांचा वापर करून स्वतःला अडचणीत आणले आहेत. नुकताच औरंगाबाद शहरात अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या दोघांनी एका युवकाचा खून केल्याचे समोर आले आहे.  अमली पदार्थांचा सर्वाधिक वापर अमेरिका आणि पाश्चात्य राष्ट्रात होतो. अखचड ने केलेल्या सर्वेनुसार संपूर्ण भारतात 8 लाख 50 हजार लोक इंजेक्शन घेऊन अंमली पदार्थ वापरतात. जवळपास 460000 बालक आणि 18 लाख प्रौढ नाकाने ओढून नशा युक्त अमली पदार्थाचज्ञ वापर करतात. अंमली पदार्थांचा हा कारभार भारतासह संपूर्ण जगात एक गंभीर समस्या बनलेली आहे. 2017 च्या ग्लोबल बर्डन ऑफ डीसीसच्या डेटानुसार अवैध अंमली पदार्थाने यावर्षी संपूर्ण जगात 7.5 लक्ष व्यक्तींचे प्राण घेतले आहेत.

जवळपास 75 टक्के लोक मानसिक आजाराने किंवा दबावाने तात्पुरता आराम मिळावा म्हणून अंमली पदार्थांचा वापर करताना दिसतात. युवकांत अंमली पदार्थांची सेवन एक फॅशन बनलेली आहे. अंमली पदार्थांच्या सेवनाची सुरुवात सिगारेट ओढण्याने होते आणि गुटखा खाल्ल्याने. हे युवक मित्रांना खुश करण्यासाठी हे सर्व करतात. अशा तऱ्हेने त्यांना अंमली पदार्थांची लत लागते.

बलात्कार, घटस्फोट, कायमस्वरूपी आजार, बेरोजगारी, आणि जॉब सुटून जाणे असे दुष्परिणाम अंमली पदार्थांच्या सेवनामुळे समाजात होताना दिसतात.

अंमली पदार्थांचे उपयोग डान्स पार्टीमध्ये, देशातील मेट्रो सिटीज, पॉश आणि मोठमोठ्या इमारतींमध्ये होताना दिसतात. ज्यामध्ये फक्त कपल सामील होतात. या पार्ट्यांमध्ये किंवा रेव पार्ट्यांमध्ये महागडी आणि सुंदर मॉडेल्स बोलावल्या जातात. डान्सरांना देखील आमंत्रित केले जाते. यामध्ये संपूर्ण रात्र धूमधडाका व घाणेरडे कामं तसेच नाच गाणे होतात, आणि इथे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा वापर केला जात असल्याचे समोर आलेले आहे. 

नशा करणे किंवा अंमली पदार्थांच्या वापराला तसेच व्यापार व तस्करी या सर्वांना इस्लाम पसंत करीत नाही. दारूला इस्लामने उम्मुल खबायीस म्हणजे सर्व वाईट कामांची जननी म्हटले आहे.

अंमली पदार्थामुळे वा दारू पिल्याने आपसात शत्रुत्व निर्माण होते, भांडणे होतात, अस्वच्छ वातावरण निर्माण होते, भ्रष्टाचार, अत्याचार वाढतात, खून देखील होतात, कुटुंब उध्वस्त होते, बलात्काराच्या घटना वाढतात, दरोडे आणि चोरीचे प्रमाण क्षणोक्षणी वाढत राहते. राग आणि क्रूरतेमध्ये वाढ होते. दया करुणा, आपुलकी, आई-वडिलांचा सन्मान राहत नाही. बेरोजगारी वाढते. -(पान 7 वर)

घरातील सुख उध्वस्त होते.  एक असा समाज निर्माण होण्यास सुरुवात होते ज्याला विनाशापासून कोणीही सुरक्षित करु शकत नाही. परंतु इस्लामच्या शिकवणीत ती शक्ती आहे ज्यामध्ये या सर्व समस्यांचे समाधान आहे. जो इस्लामच्या सच्चा मनाने स्विकार करून त्यावर अमल करतो, तोच या सर्वांपासून दूर राहू शकतो. मग ते कोणीही असो.

इस्लामची तत्वे अशी आहेत की या सर्व समस्यांवर मात करू शकते. जर इस्लामची शिकवण आम्ही अंमलात आणली तर नशेडी लोक या जगात आम्हाला दिसणार नाही. अंमली पदार्थांमुळे होणारे दुष्परिणाम संपुष्टात येईल. बलात्कार होणार नाही,आदर सन्मान करणारा समाज निर्माण होईल. चोरी, दरोडे, मर्डर होणार नाहीत. युवकांमध्ये जीवन जगण्याची नवीन ऊर्जा निर्माण होईल. एक आदर्श समाज रचनेची प्रेरणा जागृत होईल. हरामखोरी होणार नाही. कोणाचे हक्क मारले जाणार नाहीत. अब्रूची रक्षा होईल. राष्ट्रात आणि जगात शांतता निर्माण होईल. कारण इस्लाम या विश्वासाठी शांती प्रस्थापित करण्यासाठी आलेला आहे.  इस्लामचा अर्थ शांती होतो.

अल्लाह दिव्य कूरआन मध्ये आदेश देतो की,

हे श्रद्धावंतांनो, ही दारू आणि जुगार व वेदी आणि शकून ही सर्व अमंगल सैतानी कामे होत, यांच्यापासून दूर राहा, आशा आहे की तुम्हाला यश मिळेल.(5:90)

सैतानाची तर अशीच इच्छा आहे की दारू व जुगाराद्वारे तुमच्यात शत्रुत्व व कपट निर्माण करावे आणि तुम्हाला अल्लाहचे स्मरण व नमाजपासून रोखावे. मग काय तुम्ही या गोष्टीपासून अलिप्त राहाल?(5:91)

इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद (स.अ.) सांगतात की,

ज्या तऱ्हेने कुण्या झाडाला फांद्या निघतात त्याच तऱ्हेने दारूपासून  दुष्कर्म. (सनन ईबने माजा)

आजच्या स्थितीत सैतानाने मानवाचे रूप धारण केलेले दिसते. ते सर्व अंमली पदार्थांचे तस्करी करणारे व्यापारी आहेत ज्यांनी अंमली पदार्थांचे जाळे संपूर्ण जगात पसरविले आहे. यामागे त्यांचा उद्देश हाच आहे की लोकांना अंमली पदार्थाचा वापर करण्यास भाग पाडून त्यांना देशोधडीला लावावे. त्यांना कंगाल करुन सोडावे.  त्यांनी आजारी व नशेडी बनून जीवन जगावे. अंमली पदार्थ, दारू आणि जुगार यांना म्हणूनच जागतिक स्तरावर प्रोत्साहित केले जात असताना आम्ही बघत आहोत. तशी जाहिरात आणि कल्चर निर्माण केले जात आहे. कारण हे अंमली पदार्थांचे व्यापारी व तस्करी करणारे, मानवाच्या जीवन मृत्यूचे निर्दयी व्यापारी आहेत. त्यांची हीच इच्छा आहे की लोकांची संपत्ती काही मोजक्या व्यापाऱ्याजवळ असली पाहिजे. उरलेले सर्व लोक त्यांचे गुलाम झाले पाहिजेत, जेणेकरून ते ऐश व आरामाने जीवन व्यतीत करतील, आणि जनतेचे जीवन हालकीचे, गरीबीचे व गुलामीचे बनतील. इस्लाम अशा तस्करी व्यापाऱ्यांना, सैतानांना पसंत करीत नाही, जे लोकांच्या संसाराशी व जीवनाशी खेळतात. म्हणून इस्लाम अशा व्यवसायाला लगाम घालतो. दारू, जूगार, सट्टा, पैज व्याजवस्था ही सर्व इस्लाममध्ये निषिद्ध आहेत. जर या सर्वांवर बंदी घातली गेली तर हे अंमली पदार्थाचे व्यापार व तस्करी करणारे , रस्त्यावर येईल. त्यांचे ऐश आराम संपुष्टात येईल. म्हणून ते इस्लामला बदनाम करण्याचे षडयंत्र रचत असतात. काही पाश्चात्य राष्ट्रातील तसेच इतर काही संघ,परिषद,दल किंवा संघटन असे काम करताना दिसतात, ज्यामुळे  इस्लामला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. ते इस्लामची छवी एकदम क्रूरतेची, आतंकाची, दहशतवादी निर्माण करण्याची दाखवण्याच्या प्रयत्नात असतात आणि त्यामध्ये काहीच कसर ठेवत नाहीत. साधारण लोकांच्या मनात इस्लामबद्दल घृणा, द्वेष, नफरत निर्माण करणे त्यांचे एकमात्र काम उरलेले दिसते. असे का? याचे एकच उत्तर आहे की, जे सर्व अंमली पदार्थांचे व्यापारी व तस्करी करणारे आहेत त्यांना असे वाटते की जर दारू, जुगार आणि अंमली पदार्थांच्या वापरावर बंदी घातली गेली तर आमचे दुकान बंद होईल. आमच्या तिजोरीत येणारा पैसा साधारण जनतेच्या खिशात जाईल, आणि आमचे हे फसवणुकीचे अंमली पदार्थाचे व्यापार व तस्करीचे विशाल साम्राज्य कोसळेल. म्हणून ते इस्लामचे शत्रू बनलेले आहेत, परंतु सत्य तर सत्य आहे. एक दिवस विजय तर सत्याचेच होईल.अंमली पदार्थांच्या या तस्करीच्या साम्राज्याचे पतन सत्य धर्म करेल, कारण त्याच्यात अशी शक्ती आहे की तो या सर्वांचा सामना करू शकतो. आपण पाहत आपले शासक दारू दुकाने, बिअर व अन्य अल्कोहोल मिश्रित पेयांना परवानगी देतात व मोठा महसूल जमा करतात. यांच्याकडून काय अपेक्षा केली जावू शकते की हे नशाबंदी करतील. 

मी ईश्वर दरबारी प्रार्थना करतो आणि सर्व सज्जन नागरिकांना विनंती करतो की त्यांनी अंमली पदार्था विरोधात उभे राहावे आणि या चक्रव्यूहात न अडकता अंमली पदार्थांचे विद्रोही बनून समाजात चळवळ निर्माण करावी, तरच एक आदर्श समाज निर्माण होईल, आणि आपल्या राष्ट्राच्या आणि जगाच्या नवयुवकांना त्यांचे जीवन योग्यरित्या जगता येइल.अल्लाह आम्हा सर्वांना सद्बुद्धी देवो हीच अल्लाह दरबारी प्रार्थना. 


- आसिफ खान,

धामणगाव बढे

9405932295


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget