सर्व प्रेषितांपैकी प्रेषित इब्राहीम (अ.) यांचे व्यक्तिमत्त्व एका वेगळ्या प्रकारचे आहे. इतर प्रेषित किंवा पवित्र कुरआनात ज्या ज्या प्रेषितांविषयी जी थोडीफार माहिती दिली गेली आहे त्यांच्याविषयी स्वयं अल्लाहने जसा परिचय दिला आहे त्यामध्ये प्रेषित इब्राहीम (अ.) यांच्याविषयी तो असाधारण आहे.
पहिला परिचय सुरू होतो जेव्हा हजरत इब्राहीम (अ.) या विश्वाविषयी गहन विचार करतात. कुणीतरी असणार या ब्रह्मांडाला निर्माण करणारा, या चंद्र-सूर्याला, ताऱ्यांना किंबहुना हेच तर ईश्वर नाहीत? पवित्र कुरआनमधील याचा सारांश अशा प्रकारे आहे. इब्राहीम (अ.) आपल्या पित्याला- आजर यांना विचारतात, “तुम्ही पूजा करता या मूर्तींची, मला तर वाटतं तुम्ही आणि तुमचे लोक पार मार्गभ्रष्ट झाले आहेत.” या वेळी आजर काही उत्तर देत नाहीत. पण पुढे जाऊन पिता-पुत्रांदरम्यान संभाषण होते. इब्राहीम (अ.) फक्त एक प्रश्न आपल्या पित्यासमोर सोडून जातात. उत्तर मागत नाहीत. कारण ते स्वतः ह्या विश्वाच्या निर्मात्याच्या शोधात होते. अल्लाह त्यांना या विश्वाची व्यवस्था दाखवत होता.
जेव्हा रात्र झाली तेव्हा त्यांनी आकाशात एक तारा पाहिला आणि म्हणाले, “हा माझा विधाता आहे.” पण जेव्हा त्या ताऱ्याचा अस्त झाला तेव्हा इब्राहीम (अ.) म्हणाले, “मला नाही आवडत असे गायब होणारे.” नंतर जेव्हा त्यांनी आकाशात चमकत असलेल्या चंद्रास पाहिले तेव्हा ते म्हणाले, “हा माझा विधाता आहे.” पण जेव्हा त्याचासुद्धा अस्त झाला तेव्हा इब्राहीम (अ.) म्हणाले, “हे माझ्या विधात्या! तूच मला मार्ग दाखव. मीं मार्गभ्रष्ट होईन.” नंतर त्यांनी आकाशात सूर्य पाहिला. त्यावर ते म्हणाले, “हा माझा विधाता.” पण जेव्हा तोही मावळला तेव्हा प्रेषित इब्राहीम (अ.) म्हणाले, “हे माझ्या लोकांनो, ईश्वराच्या भागीदारांशी माझा कसलाच संबंध नाही.” म्हणजे त्यांची अशी खात्री झाली होती की चंद्र, सूर्य आणि विविध तारे ज्यांची ते लोक पूजा करीत होते, आजही करतात ते स्वतः या विश्वाचे विधाता नाहीत, तर लोकांनी त्यांना विधात्याचे भागीदार केले आहे. आणि इब्राहीम (अ.) यांनी जाहीर केले की, “मी त्या अस्तित्वाकडे वळलो ज्याने हे आकाश आणि धरतीची निर्मिती केली. तुम्ही ज्यांना विधात्याचे भागीदार बनवले त्यांना मी भीत नाही.” अशी घोषणादेखील त्यांनी करून टाकली.
ही एक प्रकारे अल्लाहने ह. इब्राहीम (अ.) यांची कसून घेतलेली परीक्षा होती. आणि ते या परीक्षेत यशस्वी झाले तेव्हा अल्लाहने त्यांना या जगाचा नेता बनवला. इब्राहीम (अ.) आणि अल्लाहच्या दरम्यान जी मैत्री होती ती अनन्यसाधारण होती. पवित्र कुरआनमध्ये ज्या इतर प्रेषितांचा परिचय आहे, त्यांचा आणि अल्लाहचा आणि इब्राहीम (अ.) यांचा अल्लाहशी जशा प्रकारचा संबंध होता तो इतर प्रेषितांच्या तुलनेत एक वेगळ्या प्रकारचा होता. म्हणूनच जेव्हा अल्लाहने त्यांना सांगितले की “मी तुम्हाला जगातील मानवतेसाठी नेता बनवतो.” तेव्हा लगेच इब्राहीम (अ.) यांनी विचारले, “आणि माझ्या संततीचे काय?” ही गोष्ट मनुष्याच्या स्वभावातली आहे. स्वतःला काही मिळाल्यास तो लगेच आपल्या मुलाबाळांविषयी विचार करतो. त्यांच्यासाठीही तेच हवंय जे त्याला स्वतःसाठी ईश्वराने दिले. म्हणून इब्राहीम (अ.) यांनी लगेच विचारले, “माझ्या मुलांचे काय?” अल्लाहने उत्तरात असे म्हटले नाही की “मी त्यांना काहीही देणार नाही.” अल्लाहने म्हटले होते, “जर ते अन्यायी-अत्याचारी निघाले तर मी त्यांच्या बाबतीत वचन देत नाही.” इब्राहीम (अ.) ते प्रेषित आहेत ज्यांनी जगात तीन प्रमुख धर्मांची स्थापना केली त्या धर्मांना ‘इब्राहिमी धर्म’ म्हटले जाते – इस्लाम, ख्रिश्चन आणि ज्यू. इब्राहीम (अ.) यांच्याच संततीने या तिन्ही धर्माचे नेतृत्व केले आहे.
जेव्हा अल्लाहने काबागृहाला जगभरातील लोकांसाठी शांततेचे केंद्र बनवले तेव्हा ही आज्ञा दिली की “जिथे इब्राहीम (अ.) उपासनेसाठी उभे राहत त्या जागेला नमाजचे स्थळ बनवा.” नंतर इब्राहीम (अ.) यांनी दुआ केली, “या शहराला (मक्का) शांततेचे शहर बनव आणि त्या शलराच्या लोकांना जे अल्लाह आणि परलोकावर श्रद्धा ठेवतील, त्यांना मुबलक जीविका दे.” त्यावर अल्लाहने इब्राहीम (अ.) यांना सुनावले की, “जे लोक श्रद्धा ठेवणार नाहीत, मी त्यांनाही देईन या जगात काही काळ.” म्हणजे अल्लाहने इब्राहीम (अ.) यांना हे स्पष्ट केले की श्रद्धा ठेवणे आणि इन्कार करणे ही वेगळी गोष्ट आहे. त्यासाठी लोकांना शिक्षा वा मोबदला दिला जाईल, पण अल्लहने ज्या मानवांना जन्म दिला आहे त्यांना उपजीविका देणे हे अल्लाहचे कार्य आहे. अशी इब्राहीम (अ.) आणि अल्लाहची एक प्रकारची अत्यंत जवळीक होती. त्यांना ‘खलीलुल्लाह’ची उपाधी दिली गेली आहे याचा अर्थ ‘जीवलग मित्र’ असा केला जाऊ शकतो.
इब्राहीम (अ.) अल्लाहजवळ आपल्या सर्व समस्या मांडत असत. उदा. एकदा इब्राहीम (अ.) यांनी अल्लाहला विचारले होते, “तू मयतांना (मेलेल्यांना) कसे जिवंत करतो हे मला पाहायचंय. पला पाहायचंय.” त्यावर अल्लाहने त्यांना सांगितले, “का तुझी श्रद्धा नाही?” त्यावर इब्राहीम (अ.) म्हणाले, “आहे श्रद्धा, पण मनाचे समाधान करू इच्छितो.” मग अल्लाहने त्या चार मृत पक्ष्यांविषयी त्यांना काय करायचे ते समजावले. नंतर ते जीवंत झाले.
ह. इब्राहीम (अ.) असे प्रेषित आहेत ज्यांची अल्लाहने कसून परीक्षा घेतली होती. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांना इस्माईल (अ.) रुपी संतती दिली. पण त्यांचा जन्म होताच इतक्या कष्टानंतर, इतकी वर्षे विनासंतती राहिल्यानंतर ही जी संतती झाली त्यांच्याविषय़ी अल्लाहने आदेश दिला की त्यांना आणि त्यांच्या आई – हाजरा यांना अरबस्थानच्या वाळवंटात सोडून द्यावे. अल्लाहच्या आज्ञेप्रमाणे इब्राहीम (अ.) ते वास्तव्य करीत असलेल्या इराकमधील उर (बाबुल) नामक शहरातून अरेबियाच्या वाळवंटाकडे निघाले. आणि सध्या जे मक्का शहर आहे ते अजून अस्तित्वात आलेले नव्हते. अशा ठिकाणी आई आणि मुलाला सोडले. जीवंत राहण्यासाठी कोणतीच वस्तू त्या ठिकाणी नव्हती. ते हाजरा (र.) आणि बाळ इस्माईल यांना सोडून परत निघाले तेव्हा हाजरा (र.) यांनी विचारले, “कुणाच्या भरवशावर तुम्ही आम्हाला सोडून जात आहात?” त्यावर इब्राहीम (अ.) यांनी उत्तर दिले, “अल्लाहच्या आज्ञेने मी तुम्हाला इथेसोडून जात आहे.” त्यावर ह. हाजरा (र.) म्हणाल्या, “मग अल्लाह पुरेसा आहे आम्हाला.” अशा प्रकारे इब्राहीम (अ.) यांनी आपल्या बाळाला व त्याच्या आईला एका अशा ठिकाणी सोडून दिले होते जिथे काहीच उगवत नव्हते. या परीक्षेतून ते यशस्वीपणे बाहेर पडले.
नंतर जेव्हा इब्राहीम (अ.) यांच्या म्हातारपणी आपल्या मुलाला लहानपणी सोडले होते तो मोठा झाला. म्हातारपणासाठीचा आधार ठरला. ते परतले आपल्या मुलाकडे, पण त्यांची परीक्षा होणार होती. इब्राहीम (अ.) आपल्या मुलाला म्हणाले, “मी स्वप्न पाहिले ज्यात मी तुला जुबह करत आहे. तुझा बळी देत आहे.” त्यावर ज्या मुलाने प्रथमच आपल्या वडिलांना पाहिले होते तो म्हणाला, “तुम्ही जे स्वप्न पाहिले आहे त्यानुसार तुम्ही ते करून टाका. मी तुम्हाला संयमी आढळेन.” इब्राहीम (अ.) डोंगरात घेऊन गेले आणि त्यांच्या मानेवर सुरी ठेवली. तेवढ्यात अल्लाहने हाक दिली, “थांबा, थांबा! हे इब्राहीम. तुम्ही सत्य करून दाखवले.”
तिसरी परीक्षा- इब्राहीम (अ.) यांनी एकदा मंदिरात तिथल्या मूर्तींची नासधूस केली. त्या अगोदर त्यांनी आपल्या पित्याला विचारले होते, “तुम्ही यांच्यासमोर का बसून राहता.” त्यांच्या पित्यांनी उत्तर दिले, “आमचे वाडवडील तसेच करत आलेत.” इब्राहीम (अ.) म्हणाले, “तुमचे वाडवडील उघडउघड मार्गभ्रष्ट होते तर मग.” पित्याने विचारले, “तू खरे बोलतो की चेष्टा करतो?” इब्राहीम (अ.) यांनी सांगितले, “मी काहीतरी करणार.” मग त्यांनी मूर्ती फोडल्या. गावातील लोकांनी हे सर्व पाहिल्यानंतर हे सगळे प्रकरण राजा नमरुदकडे गेले. त्याने आदेश दिला, “इब्राहीम (अ.) यांना जाळून टाका.” मग जेव्हा भलीमोठी आग तयार केली गेली आणि त्यामध्ये इब्राहीम (अ.) यांना फेकून देण्यात आले. तेवढ्यात अल्लाहने अग्नीला आदेश दिला, “तू थंड हो. इब्राहीम (अ.) यांना शांतता प्रदान कर.”
अशा प्रकारे ह. इब्राहीम (अ.) यांची वेगवेळ्या प्रकारे परीक्षा घेण्यात आली. इतर प्रेषितांचीही परीक्षा घेतली गेली, पण इब्राहीम (अ.) यांच्या बाबतीत ती कठोर परीक्षा म्हणावी लागेल.
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक,
मो.: 9820121207
Post a Comment