समुद्र सपाटी पासून लांब, डोंगराच्या पायथ्याशीच या पऱ्याचा उगम व्हावा हे अलौकिक!
पंचनदी हे गाव अनेक वाड्यांनी सजले नटलेले आहे. पंचक्रोशीतील प्रत्येकास पंचनदी ह्याच नावाने ओळखली जाणारी नदी प्यायचे पाणी तसेच इरिगेशन करितां कॅनल द्वारे पाणी पुरविते. ही नदी पंचक्रोशीतील जनजीवनाची ‘हार्ट लाईन’ समजली जाते. सुमारे दोन चौरस किलोमीटर व्यासाचे एक भलेमोठे धरण शासनाने बांधले आहे. या धरणाची खोली आकड्यात किती असेल ही नक्की नाही सांगता येणार, मात्र भला मोठा बाणवली जातीचा उंचपुरा माड (नारळाचे झाड) आत बुडून राहिला आहे, हे मी स्वतः पाहिले आहे. हे विशेष!
पाच नद्यांचे जेथे मिलन होते ते आहे पंचनदी धरण, अनेक पर्यटक येथे येतात. परिसरातला मनस्वी गारवा अनुभवतात. पाण्याचा उत्सर्ग जेथून होतो तेथील संगीत लहरींचा आनंद घेतात.उर्वरित पाण्याचा लोट नदी पात्रातून वाहत अनेक वाड्या, बागा, शेतांमधून जात असतो. अनेक वाड्यांना वाहत्या भेटी देत शेवटी अरबी समद्रास जाऊन मिळते तीच ही पंचक्रोशितली सर्वांत मोठी नदी...पंचनदी! पंचनदी ह्याच नावाने येथे टपाल कार्यालय आहे. जिल्हा परिषदेची मराठी प्राथमिक शाळा आहे. पंचायत कार्यालय आहे. अशा या नावलौकिक मिळविलेल्या नदीवर आपसुक एक कविता नकळत मला सुचली. धुन अर्थातच त्यासमवेत आली. काही वर्षांपूर्वी कुट्रेकर हायस्कुलमध्ये दहावीच्या मुलांना निरोप समारंभ आयोजित केला गेला होता ज्यामध्ये मी निमंत्रित होतो. कोकण माझे गाव हे गीत मी समोर बसलेल्या मुलांसमोर गाऊन सादर केले. कालांतराने त्याचे ध्वनी मुद्रण झाले. व माझ्या मनमोहना नामक म्युझिकल एलबम मध्ये त्याचा समावेश झाला. पंचनदी गावाच्या प्रमुख नदीवर अजरामर झालेले हे मधुर गाणे सोशल मीडियावर आजही रसिक आवडीने ऐकतात, हे विशेष!
गाडी रस्त्याला भेदून जाणाऱ्या नदीवर पूर्वी लाकडी साकव असायचा. आम्ही लहान असतांना पावसाळ्यात अशा साकवावरून गेल्याचे आठवते. कालांतराने शासनाने त्यावर ओतकामी सिमेंटचा पक्का पूल बनविला. अलिकडे ढगफुटीचे प्रमाण वाढल्यामुळे पूर्वीच्या पुलावरून आऊराचा लोंढा जायचा. पुन्हां दळणवळणाची पंचाईत व्हायची. म्हणूनच शासनाने आता पुलाची पुनरबांधणी तर केलीच शिवाय आधीच्या उंची पेक्षा पुलाची उंची सुद्धा वाढविली. ज्यावरून गाड्यांची येजा सुरळीत होऊ शकेल. अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत नाही होणार.
अनेक पिढ्यांचा संसार या नदीच्या दोन्ही तीरावर वर्षानुवर्षे स्थिरावला आहे. गवतारु घरांच्या जागी स्लॅबची घरे आली आहेत. स्थानिकांची गृहस्थी सजली, नटली. आतां पर्यटन या एकाच विषयावर संपूर्ण पंचक्रोशी हळूहळू कूस बदलत आहे. ओळखी वाढत आहेत. रस्ते बऱ्यापैकी सुधारित केले गेले आहेत. कांहीं ठिकाणी शासन लक्ष देत आहे. सर्वत्र ध्वनी भ्रमण टॉवर्स उभे दिसतात. वादळी वारे, अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी रेंजचा त्रास जाणवतो. फयान नामक वादळी तुफान आम्ही गावातल्यानी अनुभवले आहे. अशी ज्यांची तयारी असेल तर समुद्र किनारी येऊन जगण्यात खूप गंमत आहे. पर्वतांच्या कुशीत वसलेली घरे म्हणजेच आपले कोकण, एकदातरी या आणि अनुभव घ्याच.
कोकण माझे गाव मुलांनो
कोकण माझे गाव...
जीवन फिरती नाव मुलांनो
कोकण माझे गावं...
शेतकऱयांच्या, बागकऱयांच्या
ध्यानीमनी जे नाव मुलांनो
पंचनदी हे गाव...
- इकबाल शर्फ मुकादम
निमुर्डे वाडी, पंचनदी - दापोली
मोबाईल - 99206 94112
Post a Comment