(५९) आणि आम्हाला निशाण्या पाठविण्यास प्रतिबंध केला नाही, परंतु याने की यांच्या पूर्वीच्या लोकांनी त्यांना खोटे लेखले आहे.२९ (म्हणून पाहा) समूद लोकांना आम्ही जाहीररीत्या सांडणी आणून दिली आणि त्यांनी तिच्यावर अत्याचार केला. आम्ही निशाण्या याचसाठी पाठवीत असतो की लोकांनी त्या पाहून बोध घ्यावा व ईशभय बाळगावे.
(६०) स्मरण करा हे पैगंबर (स.)! आम्ही तुम्हाला सांगितले होते की तुझ्या पालनकर्त्याने या लोकांना वेढून टाकले आहे. आणि हे जे काही आम्ही तुम्हाला आता दाखविले आहे३० याला आणि त्या झाडाला ज्याला कुरआनमध्ये धिक्कारले गेले आहे,३१ आम्ही या लोकांसाठी केवळ एक फितना बनवून ठेवले आहे.३२ आम्ही यांना इशार्यावर इशारा देत राहिलो आहोत, परंतु प्रत्येक इशारा त्यांच्या शिरजोरीत वाढ करीत राहिला आहे.
२९) काफिरांची ही मागणी की पैगंबर मुहम्मद (स.) यांनी त्यांना एखादा चमत्कार दाखवावा, त्याचे हे उत्तर आहे. सांगण्याचा आशय असा की असा चमत्कार पाहिल्यानंतर जेव्हा लोक त्याला खोटे लेखतात, तेव्हा मग अपरिहार्यपणे त्यांच्यावर प्रकोप कोसळविणे आवश्यक होते व अशा लोकसमूहाला नष्ट केल्याविना सोडले जात नाही. आता ही अल्लाहची सर्वस्वी कृपाच आहे की तो असले कोणतेही चमत्कार धाडीत नाही. परंतु चमत्काराची मागणी करून समूद लोकांप्रमाणे स्वत:ची दुर्गत बनवू इच्छिता, इतके तुम्ही मूर्ख लोक आहात?
३०) संकेत ‘मेराज’कडे आहे. या ठिकाणी मूळ अरबी शब्द ‘रुअया’ स्वप्नाच्या अर्थाने नाही तर डोळ्यांनी पाहण्याच्या अर्थाने आहे.
३१) अर्थात ‘जक्कूम’ वृक्ष, ज्यासंबंधी कुरआनात सांगितले गेले आहे की तो नरकाच्या तळात उत्पन्न होईल व नरकवासींना त्याची कडू फळे खावी लागतील. त्याचा धिक्कार करण्याने, त्याचे अल्लाहच्या कृपेपासून दूर होणे अभिप्रेत आहे.
३२) म्हणजे त्यांच्या भल्यासाठी आम्ही तुम्हाला ‘मेराज’चे निरीक्षण घडविले, जेणेकरून तुमच्यासारख्या सत्यनिष्ठ आणि विश्वासार्ह माणसाद्वारे या लोकांना मूळ वास्तवतेचे ज्ञान प्राप्त व्हावे आणि सावध होऊन त्यांनी सरळमार्गावर यावे. परंतु या लोकांनी उलट यासाठी तुमचा उपहास केला. आम्ही तुमच्याकरवी यांना सावध केले की येथील हरामखोर्या सरतेशेवटी तुम्हाला ‘जक्कूम’चे घास चारल्याशिवाय राहणार नाही, परंतु त्यांनी याची टर उडविली आणि म्हणू लागले, जरा हा माणूस पाहा, एकीकडे म्हणतो की नरकात भयंकर अग्नी भडकत असेल तर दुसरीकडे माहिती सांगतो की तेथे झाडे उगतील.
Post a Comment