नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत नेहमीप्रमाणेच मुस्लिम समाज हाच घटक केंद्रस्थानी होता. या निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे मुस्लिमांविरूद्ध दुष्प्रचाराच्या सार्याच सीमा ओलांडल्या गेल्या. स्वतः पंतप्रधानांनी मुस्लिमांना, घूसखोर ते ज्यास्त मुलं जन्माला घालणारे आणि इतर विशेषणांनी संबोधून जनतेला भ्रमित करण्याचा भरपूर प्रयत्न केला. अशा परिस्थितीत मुस्लिमांविषयी बहुसंख्य समाजाच्या दक्षिणपंथी गटामध्ये एवढी घृणा का आहे? याचा मागोवा घेणे अनुचित ठरणार नाही.
इंग्रजीमध्ये ’झेनोफोबिया’ याचा अर्थ अपरिचित लोकांविषयी स्थानिक लोकांना वाटणारी भीती असा होतो. मुस्लिम समाज तर भारतात शेकडो वर्षांपासून गुन्यागोविंदाने राहत आलेला आहे म्हणजे तो बहुसंख्य बांधवांसाठी अपरिचित नाही. मग त्यांच्याविरूद्ध घृणा का? या प्रश्नाचे उत्तर असे की, ही भीती अनाठायी नाही. फक्त भारतातच नाही जगातील जवळ-जवळ प्रत्येक देशात मुस्लिम समाजाविषयी एक अनामिक भीती असते. यालाच इंग्रजीमध्ये, इस्लामोफोबिया असे म्हणतात. इस्लाम म्हणजे इस्लाम धर्म आणि फोबिया म्हणजे भीती. म्हणजे इस्लाम विषयी वाटणारी भीती असा या शब्दाचा अर्थ होतो. अर्थात ही भीती खोटी आहे, असेही नाही. परंतु या भीतीचे कारण इस्लाम किंवा मुस्लिम नसून इस्लामी आर्थिक, सामाजिक आणि नैतिक व्यवस्था आहे. इस्लाम व्याजविरहित अर्थव्यवस्थेचा समर्थक आहे. भांडवलशाही या उलट व्याजाधारित अर्थव्यवस्थेची समर्थक आहे. याशिवाय, इस्लाम एका उच्च नैतिक जीवन व्यवस्थेचे समर्थन करतो या उलट भांडवलशाही व्यवस्था ही अनैतिक जीवन व्यवस्थेचे समर्थन करते.
भारतात भांडवलशाही व्यवस्थेचा स्वीकार केला गेलेला असल्यामुळे इस्लाम आणि मुसलमानांचा द्वेष केला जातो. या शिवाय, इस्लाम मूर्तीपूजा विरोधक असून, बहुसंख्य समाज मूर्तीपूजक आहे, हे सुद्धा एक मोठे कारण अल्पसंख्यांकांचा द्वेष करण्यामागे आहे. ही झाली समस्या. आता ये समस्येचे निराकरण कसे करता येईल, या विषयी आपण विचार करूया.
इस्लामोफोबिया विरूद्ध लढण्याचे उपाय
इस्लामी व्यवस्थेचा ज्या ठिकाणी उल्लेख केला जातो त्या ठिकाणी प्रस्थांपितांकडून पहिल्यांदा विरोध होतो. मक्का शहरामध्ये सुद्धा सातव्या शतकात मक्काच्या प्रस्थापितांकडूनच विरोध झाला होता आणि आजही प्रस्थापितांकडूनच विरोध होतो आहे. विरोध फक्त भारतातच होत नाही तर जगभरात होतो. याचे कारण हेच की, इस्लाम एक नैतिक आणि समतावादी आदर्श समाजाची रचना करू इच्छितो तर भांडवलशाही ही मुक्त लैंगिक, आर्थिक आणि सामाजिक व्यवस्था प्रस्थापित करू इच्छिते. या दोन जीवन पद्धतीतील द्वंद्व प्रेषित सल्ल. यांच्या काळापासूनच सुरू आहे आणि ते प्रलयाच्या दिवसापर्यंत सुरू राहील, यात शंका नाही. माणसाला अनैतिक जीवनशैली आणि गुन्हेगारीकडे ढकलण्याचा रात्रंदिवस प्रयत्न सैताना कडून केला जातो. म्हणून प्रत्येक मुस्लिम व्यक्तीचे हे कर्तव्य आहे की, रात्रंदिवस या सैतानी प्रयत्नांना हानून पाडण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. हा लढा सोपा नाही. या लढ्याची कल्पना ईश्वराने खालील आयातीमध्ये दिलेली आहे.
मुसलमानांनो...! तुम्हाला प्राण व वित्त या दोन्हीच्या परीक्षा द्याव्याच लागतील, आणि तुम्ही ग्रंथधारक व अनेकेश्वरवाद्याकडून पुष्कळशा त्रासदायक गोष्टी ऐकाल. जर या सर्व स्थितीत तुम्ही संयम आणि ईशपरायणतेच्या वर्तनावर दृढ राहाल तर हे मोठे धाडसाचे कार्य होय. ( सुरे आले इम्रान 3: आयत क्र. 186).
या आयातीमध्ये एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की, इस्लामच्या विरोधकांकडून मुस्लिमांना त्रास दिला जाईल. नित्य नियमाने त्यांच्यावर टिका केली जाईल. म्हणजे पंतप्रधानांनी केलेली टिका ही काही पहिल्यांदा झालेली टिका नाही. भारतीय मुस्लिमांनी हे गृहितच धरलेले आहे की, आम्ही ज्या नैतिक जीवन व्यवस्थेची गोष्ट करतोय त्याचा तर विरोध अशा प्रकारे होणारच. याच आयातीच्या पुढच्या भागात या स्थितीला कसे सामोरे जावे, याचेपण मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. अशा त्रासदायक गोष्टी जेव्हा मुस्लिमांच्या कानावर येतील तेव्हा संयम आणि ईशपारायणतेच्या वर्तनावर दृढ राहायला हवे. हे ते मार्गदर्शन आहे.
धैर्याने अशा टिका सहन करून ईश्वराने दिलेल्या मार्गावर चालत राहून स्वतःला इतर समाजासाठी उपयोगी सिद्ध करण्याची जबाबदारी भारतीय मुस्लिमांची आहे. जर भारतीय मुस्लिमांनी समजूतदारपणे कुरआनच्या या मार्गदर्शनावर चालत आपल्याला बहुसंख्य नागरिकांसाठी उपयोगी जनसमुह बनविण्यामध्ये यश प्राप्त केले तर इस्लामोफोबियाच्या रूपाने होणारा हा विरोध काही वर्षातच गळून पडेल, यात किमान माझ्या मनात तरी शंका नाही.
दुसऱ्या एका ठिकाणी कुरआन आपल्याला मार्गदर्शन करताना म्हणते की, आणि हे पैगंबर (स.), भलाई आणि दुष्टता एकसमान नाहीत. तुम्ही दुष्टतेचे त्या भलाईद्वारे निरसन करा जी अत्युत्तम असेल. तुम्ही पाहाल की तुमच्याशी ज्याचे शत्रुत्व होते, तो जिवलग मित्र बनला आहे. (सुरे हामीम सज्दा 41 : आयत नं. 34).
पंतप्रधानांनी जी टिका केलेली आहे त्या टिकेचा प्रमुख उद्देश बहुसंख्य बांधवांच्या नजरेमध्ये अल्पसंख्यांकांना परके ठरविणे हा आहे. जेणेकरून दोन्ही समाजाचे संबंध दुरावतील आणि बहुसंख्य गटातील बहुसंख्य मते त्यांना मिळतील. त्यांचा हा डाव ओळखून अल्पसंख्यांकांनी आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये बहुसंख्य बांधवांशी संपर्क वाढवावा. त्यांच्या आयुष्यात घडणार्या चांगल्या आणि वाईट घटनांमध्ये त्यांची साथ द्यावी. त्यांना परकेपण वाटेल असे फटकून वागू नये. हिंदू-मुस्लिम समाज देशात असा एकजीव झालेला समाज आहे, जसे दोन नद्यांचे पाणी संगमावर एक होवून जाते. दैनंदिन व्यवहारात इस्लामी शिष्टाचारांचा उपयोग करत बहुसंख्य बांधवांच्या मदतीसाठी सदैव तत्पर रहावे. खिदमते खल्क (समाजोपयागी कार्य) करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत.
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे बहुसंख्य समाज हा व्याजामुळे त्रस्त झालेला समाज आहे. त्यांना या संकटातून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्याजविरहित पतपेढ्यांची स्थापना करावी. वर नमूद आयातीमध्ये म्हटल्याप्रमाणे आपण जर त्यांच्या टिकेचे उत्तर प्रेमाने दिले तर एक दिवस नक्कीच असा येईल की, त्यांची टिका प्रभावहीन होवून जाईल आणि देशामध्ये सलोखा वृद्धींगत होईल. नाहीतरी याची सुरूवात 4 जून 2024 पासून झालेलीच आहे. पंतप्रधान आणि भाजपने एवढे द्रविडी प्रयत्न करून सुद्धा भाजपला स्वतःच्या बळावर बहुमत गाठता आले नाही. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे द्वेषाच्या पायावर रचले गेलेले राजकारण फार दिवस चालत नाही. मुस्लिम समाजाला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की, प्रेम, सद्भावना, सहकार्य आणि करूणा ही मूल्य शाश्वत असून, ईर्ष्या, द्वेष आणि घृणा ही मूल्य शाश्वत नाहीत. या निवडणूक निकालांपासून एवढा जरी बोध वाचकांनी घेतला तरी पुरे आहे. जयहिंद !
- एम. आय. शेख
लातूर
Post a Comment