Halloween Costume ideas 2015

‘नीट’ला सरकार नीट कधी करणार?

 विद्यार्थी, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण


नीट पेपर लीक प्रकरणावरून सीबीआय, एटीएस, पोलिस दररोज नवनवीन खुलासे करत आहेत. 26 जूनपर्यंत 27 जणांना अटक करण्यात आली आहे. रॅकेटचे केंद्र बिहार, गुजरात, दिल्ली, महाराष्ट्र आहे. नेटकडून सर्वात मोठा हलगर्जीपणा यंदा नीट2024 मध्ये दिसून आला. याचा फटका देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना बसला आहे. यामुळे रॅकेटच्या गळाला लागलेल्या काही हजार मुलांमुळे लाखो मुलांचे भवितव्य आजघडीला टांगणीला लागले आहे. त्यामुळे वैद्यकीय प्रवेशाबद्दल पालकांमध्ये चिंता दिसून येत आहे. सरकार नीटला नीट कधी करणार असा प्रश्न पालक, विद्यार्थी उपस्थित करत आहेत.  

अपयशाने खचलेल्या अथवा दोनदा परीक्षा देऊनही अपेक्षित यश न मिळालेल्या पालकांचा शोध घेऊन त्यांना गंडविणाऱ्या महाभागांची टोळी निर्माण झाली आहे. त्यात जे आमिषाला बळी पडले असतील, तेही चुकलेच. कठोरपणे यंत्रणा राबविण्याची ख्याती असलेली एनटीए 2024च्या परीक्षेत अपयशी ठरली. ज्या राज्यांमध्ये पेपरफुटीचे प्रकरण घडले, ज्यांना गुणांची खिरापत वाटली गेली त्यांना शिक्षा मिळेल नाही मिळायलाच पाहिजे. मात्र, जे मुख्य सूत्रधार आहेत, त्यांना विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचे मारेकरी ठरवून कायमचे कोठडीत पाठविले पाहिजे. नव्या पेपर लीक कायद्याने एक कोटीचा दंड आणि दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा आहे. आता ज्या तऱ्हेने विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे, ते पाहून दहा वर्षांची शिक्षाही कमीच वाटते आहे. सर्वोच्च न्यायालयात नीट प्रकरणावर 8 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. सीबीआय दिल्ली टीम नीट पेपर लीक प्रकरणाचा तपास करत आहे. सीबीआयने दिल्लीतच गुन्हा दाखल केला आहे. पाटणा येथे आर्थिक गुन्हे युनिट ने तपास अहवाल, केस डायरी आणि पुरावे सीबीआयकडे सुपूर्द केले आहेत. तपास अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे की, नीट युजीची प्रश्नपत्रिका लीक झाली.  पैशासाठी की व्यवस्था उध्वस्त करण्याचा कट...

नीट पेपर लीक प्रकरणाने विविध प्रश्नांना जन्म दिला आहे. यामध्ये तपासाअंती अटक केले जात असलेल्या गुन्हेगारांकडून या गोष्टीचा शोध घेतला जावा की, ते पैशासाठी हे सगळे करीत होते अथवा एनटीएची पारदर्शक व्यवस्था उध्वस्त करून ही केंद्रीय स्तरावरील परीक्षाच रद्द करायची आहे. नीटच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर सर्व   समाजघटकातील मुले वैद्यकीय परीक्षेत यश मिळवित आहेत. त्यामुळे काहीजणांना हे पहावतही नसेल. या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी सर्वस्तरातून होत आहे. 

ग्रेस गुणातील विद्यार्थी...

ग्रेस गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला सामोरे जाणे किंवा मूळ गुण स्वीकारणे, हा पर्याय होता. एकूण 1563 पैकी 813 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर इतरांनी मूळ गुण स्वीकारले. आता त्यांचा 30 जूनला निकाल येईल आणि पुन्हा गुणवत्ता यादीचा क्रम बदलेल. सध्या झारखंड, बिहार, गुजरात येथे दाखल गुन्हे व तेथील प्रतिबंधित असलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही येणाऱ्या निकालातून वगळली जाईल. मात्र, अजूनही सुरू असलेला तपास, महाराष्ट्रासह सर्व राज्यांतील प्रकरणांचा निपटारा झाल्यानंतर आणखी काही विद्यार्थी प्रतिबंधित होतील. त्यामुळे सध्याचा तपास आणखी गतीने पूर्ण करून निकालाची अंतिम यादी समोर आली पाहिजे. अन् फेर परीक्षेचा मुद्दा असेलच तर त्याची घोषणा तत्पर करून विद्यार्थ्यांना दोन-तीन महिन्यांचा वेळ दिला पाहिजे. या सर्व मुद्द्यांवर खुलासा होत नाही आणि रोजच नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालकांची चिंता वाढत आहे. सरकारने परीक्षासंबंधी लवकर निर्णय घ्यावा.

- बशीर शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget