माणसांना ज्या गोष्टींमुळे प्रसन्नता लाभते, आनंद होतो, उत्साहित होतात अशा प्रसंगांची मर्यादा नाही. संपन्नता, धनदौलत, ज्ञान, महत्त्वाचे एखादे पद, विवाह, सण-उत्सव आणि शेकडो अशा प्रकारचे प्रसंग माणसांच्या दैनंदिन जीवनात येत असतात आणि अशा प्रत्येक प्रसंगांवर माणूस हर्षोल्हास, आनंद व्यक्त करतो, साजरा करतो. पण आनंद व्यक्त करण्यात अतिरेक होतो तेव्हा त्याचे कारण अहंकार आणि घमेंड असते. इतिहासातील सर्वांत श्रीमंत कारुन नावाच्या माणसाने ज्यास अल्लाहने अमर्याद धनदौलत, संपत्ती दिली होती, त्याने अहंकार केला तेव्हा त्याच्या लोकांनी त्याला सांगितले की घमेंड करू नकोस. अल्लाहला घमेंडी आवडत नाही. (सूरह अल कसस, पवित्र कुरआन) अल्लाहने तुम्हाला जे काही दिले आहे त्यावर चर्चा करू नका. कारण अल्लाहला गर्विष्ट लोक पसंत नाहीत. (सूरह अल हदीद, पवित्र कुरआन)
अल्लाहने मुस्लिमांची मने दुखविली नाहीत तर संतुलन कायम राखत आनंद साजरा करण्याची अनुमती दिली. मुस्लिमास जेव्हा प्रसन्नता लाभते तेव्हा त्याने अल्लाहचे आभार मानावे आणि अल्लाहसमोर नतमस्तक व्हावे जेणेकरुन माणसास ह्याचे भान असावे की ऐहिक जगात घमेंड आणि अहंकार करणे त्याला शोभत नाही. प्रेषित मुहम्मद (स.) यांना जेव्हा आनंद होत असे तेव्हा ते अल्लाहसमोर नतमस्तक होत असत.
मुस्लिमांचे हे नैतिक कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या मित्रांना, भाऊबंधांना एखादा प्रसन्नतेचा प्रसंग लाभल्यास आपल्या शुभेच्छा व्यक्त कराव्यात.
प्रवासाहून परतल्यावर माणसाला घरी परतल्याचा आनंद होत असतो. अशा वेळी आपल्या मित्रांना, नातेवाईकांना जेवणाचे आमंत्रण द्यावे. प्रेषित मुहम्मद (स.) एकदा एका प्रवासातून मदीनेस परतले तेव्हा त्यांनी आपल्या मित्रमंडळींना तसेच नातेवाईकांना जेवणाचे आनंत्रण दिले होते.
सामूहिकपणे एखाद्या विवाहप्रसंगी आनंदाचा प्रसंग येत असतो अशा वेळी इस्लाम धर्मात ढोल वाजवून गायन करण्याची अनुमती आहे जेणेकरून समाजात ह्या विवाहाची शुभवार्ता लोकांपर्यंत पोहोचली जावी. प्रेषितांनी एकदा सांगितले की वैध आणि निषिद्ध मधला फरक असा की एखाद्याच्या लग्नप्रसंगी ढोल वाजवून आणि गायन करून समारंभाचे आयोजन करुन लोकांना अशा विवाहाची सूचना दिली जाते जेणेकरून सर्वांना ही माहिती मिळावी की अमुक व्यक्ती आणि अमुक महिलेचा विवाह समारंभ संपन्न झाला आहे. त्याच वेळी व्यभिचार लपूनछपून केला जातो जेणेकरून कुणाला याची माहिती होऊ नये.
(सीरतुन्नबी, शिबली नोमानी, सुलैमान नदवी)
- संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment