गेल्या काही वर्षांपासून पुण्यामध्ये प्रतिकात्मक (आर्थिक) कुर्बानी करावी अशी चळवळ सुरू आहे. या चळवळीत सहभागी लोकांचे असे म्हणने आहे की आर्थिक कुरबानी मुळे त्याग केल्याचे समाधानही मिळेल आणि जनावरांचे जीवही वाचतील आणि तो पैसा शैक्षणिक किंवा इतर समाजोपयोगी कामासाठी वापरताही येईल. नाहीतरी कुरआनमध्ये म्हटलेलेच आहे की, ’ईश्वराला जनावराचे रक्त पोहोचते ना मांस.’
सुरूवातीला हा प्रकार दखल घेण्यासारखा वाटला नाही परंतु अलीकडे ही चळवळ फोफावते आहे आणि काही तथाकथित उच्चशिक्षित मुसलमानांनी प्रत्यक्षात केक कापून कुर्बानीकरून कुर्बानीच्या जनावरांची रक्कम सामाजिक संस्थांना दान केल्याच्या बातम्या मागच्या वर्षी कानावर आल्या. विशेष म्हणजे पुण्याच्या बाहेरही अशी प्रतिकात्मक कुर्बानी करण्यासाठी काही मुस्लिम स्वतःच पुढाकार घेत आहेत, असे आढळून आले आहे. यामुळे प्रतिकात्मक कुर्बानीचे वास्तव काय आहे, यासंबंधी चर्चा करणे गरजेचे झालेले आहे. या चळवळीत सामील लोकांवर आगपाखड करून उपयोग नाही ते अज्ञानी आहेत व त्यातूनच ही चळवळ फोफावते आहे. त्यांचे म्हणणे लॉजिकली खोडून काढल्यास ही चळवळ आपोआप संपुष्टात येईल यात शंका नाही.
2024 ची ईद-उल-अजहा अर्थात कुर्बानीची ईद तोंडावर आलेली आहे. 17-जून-2024 रोजी साजरी होणार आहे. अशावेळेस सर्वप्रथम वाचकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवणे गरजेचे आहे की प्रतिकात्मक कुर्बानीची कुठलीच तरतूद इस्लाममध्ये नाही आणि प्रतिकात्मक कुर्बानीने कुरआनने कुर्बानीचा जो हेतू स्पष्ट केलेला आहे तो साध्य होत नाही. ते कसे? याचेच विवेचन करण्यासाठी हा लेखन प्रपंच. माणूस हा एक संवेदनशील आणि भावना असणारा जीव आहे. तो अनेक गोष्टींमधून प्रेरणा घेतो. अनेक गोष्टी त्याला निराश करतात. आपल्या भावनांच्या समाधानासाठी तो अनेक वेळा मोठ्या प्रमाणात अनुत्पादक असा खर्च करतो. उदा. ब्रिटनच्या वर्चस्वाखाली शेकडो वर्ष राहिलेल्या देशांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची परंपरा सुरू केलेली आहे. या स्वातंत्र्यदिनानिमित्त अशा देशात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. रोषणाई केली जाते. सरकारी इमारतींवर सजावट केली जाते. परेड आयोजित केली जाते. या सर्वात कोट्यावधी रूपये खर्च होतात. मग हा खर्च अनाठायी आहे म्हणून तो बंद करून सामाजिक कार्यात तो वापरावा, असे म्हणता येईल का?
आई-वडिल अत्यंत वृद्ध झालेले आहेत. ते सतत आजारी राहतात. त्यांच्या उपचारावर हजारो नव्हे लाखो रूपये खर्च होतात. एवढे रूपये खर्च करूनही ते वाचणार नाहीत याची खात्री असते. म्हणून का तो खर्च वाचवून इतर सामाजिक कामांना द्यावा, हे बरोबर राहील का? देशात दरवर्षी लाखो नागरिक देश विदेशात पर्यटन करत असतात पर्यटन केल्याने काय पोट भरते काय हा प्रकार थांबून तो पैसा शिक्षणासाठी वापरल्यास कसे राहील? स्पष्ट आहे या तिन्ही प्रश्नांची उत्तरं नकारार्थी आहेत. त्याचप्रमाणे कुर्बानीचा खर्च वाचवून तो सामाजिक कार्यात द्यावा का? या प्रश्नाचे उत्तरही नकारार्थी आहे.
हा प्रश्न का उद्भवला?
ज्याप्रमाणे स्वातंत्र्याची कुठलीच किंमत नसते ते अमुल्य असते. त्याप्रमाणे माणसाचा अल्लाहशी असलेल्या संबंधांना कुठलीच किंमत नसते ते अमुल्य असते. म्हणून स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेला खर्च जरी सकृत दर्शनी वाया जात असलेला दिसत असला तरी त्यातून स्वातंत्र्याच्या भावनेला जी उर्जा मिळते ती अमुल्य असते. अगदी याच प्रमाणे ईश्वराने कुर्बानीचा आदेश दिलेला आहे आणि मी कुर्बानी करतोय मग तो खर्च सकृतदर्शनी वाया जात असतांना दिसत असला (खरे पाहता तो वाया जातच नाही त्यातून गरीबांंचे पोषण होते) तरी त्यातून मुसलमानांचे अल्लाहशी असलेले नाते दृढ होत असते व त्यातून माणसाला जी उर्जा मिळते ती अमुल्य असते. त्यामुळे प्रतिकात्मक कुर्बानी हा प्रकार खोडसाळपणाचा आहे. हे ते लोक आहेत ज्यांचा स्वतःचा ईश्वराशी संपर्क कमकुवत आहे. ज्याचे ईमान दृढ आहे तो अशा खुळचट कल्पनेला भीक घालत नाही.
शेतकऱ्यांचा सर्वात मोठा फायदा
देशात 20 कोटी मुसलमान राहतात, त्यांच्यापैकी दहा कोटी मुसलमानांनी जरी दरवर्षी कुर्बानी केली असे गृहीत धरले तरी दर साल दहा कोटी जनावरे मुसलमान खरेदी करतात. कारण चोरून, बळजबरीने हिसकावून जनावरांची कुर्बानी करता येत नाही. एक जनावराची किंमत 15 हजार जरी धरली तरी मुस्लिम समाज किती रूपये गरीब शेतकरी आणि पशुपालन करऱ्यांना वार्षिक लाभ करून देतात याचा विचार वाचकांनी स्वतः करावा. विशेष म्हणजे हा लाभ बहुसंख्य हिंदू शेतकरी आणि पशुपालकांना होतो. अनेक शेतकरी तर वर्षभर आपली भाकड जनावरे या आशेवर पोसत असतात की बकरी ईदच्या मुहूर्तावर किंमत जास्त येते. तेव्हा ते विकू आणि मुलीचे लग्न करू. हा फायदा सरकारी फायद्यापेक्षा ही जास्त आहे हे लक्षात ठेवा.
शिवाय लेदर उद्योगाला प्रचंड प्रमाणात चामडा लागतो त्याचा पुरवठा देखील या ईद च्या निमित्ताने होत असतो व त्यातून किती कुटुंबांचे उदरनिर्वाह होत असतील आणि लेदरच्या वस्तू एक्सपोर्ट करून किती परकिय चलन देशाला मिळत असेल याची कल्पना प्रज्ञावंत वाचकांनी स्वतःच करावी. केवळ विरोध करायचा म्हणून विरोध करून काही साध्य होणार नाही. ईदुल अजहाच्या दिवशी जेवढी जनावरे कापली जातात त्याच्या कितीतरी पटीने जास्त जनावरे वर्षभर रोज कापली जातात. देशाची 90% टक्के जनता मांसाहारी आहे. मग या सर्वांनी शाकाहार स्विकारून, वर्षभर होणाऱ्या जनावरांच्या या कत्तली बंद करून तो पैसा सामाजिक कार्यामध्ये वापरणे कसे राहील.? याचे उत्तर या प्रतिकात्मक कुर्बानीच्या समर्थकांना देता येईल काय? याचा विचार सुजान वाचकांनी स्वतःच करावा.
- एम. आय. शेख
लातूर
Post a Comment