लोकसभा निवडणुकीचा नुकताच निकाल लागला. या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले. त्यातच लोकसभेत महाराष्ट्रात 45 च्या पुढे जागा जिंकणार असल्याचा दावा करणाऱ्या महायुतीला मोठा धक्का बसल्याचे दिसून आले. भाजप तर एक अंकी जागेवर आल्याचे दिसून आले. राज्यात महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीने 30 जागांवर मुसंडी मारली आहे. त्यामध्ये सर्वाधिक 13 जागा या काँग्रेसने पटकावल्या आहेत. काँग्रेसच्या या यशामध्ये विदर्भाचा मोठा वाटा असून विदर्भात काँग्रेसला पाच जागा मिळाल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना ठाकरे गट असून त्यांना 9 जागा मिळाल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर शरद पवारांची राष्ट्रवादी असून त्यांना 8 जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने फक्त 10 जागा लढवल्या असून त्यापैकी आठ जागांवर विजय मिळवलाय.
गेल्या वेळी 42 जागा मिळवणाऱ्या भाजप-शिवसेना युतीला या वेळी भाजपप्रणित महायुतीला फक्त 18 जागा मिळाल्या आहेत. त्यामध्ये भाजपला 9 जागा, शिंदे गटाला 7 जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील यंदाची लढत निर्णायक होती. राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर जनता अजित दादांना साथ देते की शरद पवारांसोबतच राहते हे या निवडणुकीतून स्पष्ट झालं.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तीन जागांवर विजय मिळाला असून त्यापैकी बारामतीमधील विजय हा सर्वात लक्षवेधी ठरला. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांची पॉवर असल्याचं पाहायला मिळालं.
राज्यातील सर्वांत प्रतिष्ठेच्या बनलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भाऊजय आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पवारांचे होमग्राउंड कुणाच्या बाजूने याचं उत्तर या निवडणुकीतून मिळालं असून अजित पवारांसाठी हा धक्का असल्याचं मानलं जातंय.
अयोध्येत राम मंदिर उभारण्याचं आश्वासन पूर्ण केलं. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या विरोधी पक्षांमधील नेत्यांना ईडीची कारवाई करण्याचा धाक दाखवून आपल्या पक्षात सामावून घेतलं. यानंतर ही लोकसभा निवडणूक आपणास सहजसोपी जाईल, असा भाजपचा होरा होता. पण इंडिया आघाडीनं जी काही कडवी झुंज दिली त्यावरून ही निवडणूक भाजपसाठी सोपी राहिली नाही, असेच हाती आलेल्या निकालांवरून दिसत आहे. ‘अब की बार, चारसौ पार’चा दिलेला जोरदार नारा पाहता भाजप लोकसभा निवडणुकीत स्वबळावर बहुमत गाठू शकलेलं नाही, हेच प्रकर्षानं जाणवते.
प्रधानसेवकाचा चेहरा पुढं करून प्रभावीपणे प्रचार करणारा भाजप राम मंदिर निर्माण, जम्मू आणि काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम 370 हटवण्याचा निर्णय, ट्रिपल तलाक, नागरिकत्व कायदा असे अनेक मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे गेला होता. शिवाय देशात विकासकामांची गंगा आणण्याचे आश्वासन होतंच. ‘इंडिया’ आघाडीकडे फक्त संविधान वाचवण्याचाच मुद्दा होता.
अन्य पक्षांमधील नेते आयात करून आपल्या जागांमध्ये वाढ होईल, हा भाजपचा भ्रमच होता, हेही या निकालांवरून स्पष्ट झालंय. शिवसेना आणि राष्ट्रवादीसारखे पक्ष फोडल्यानंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बिनशर्त पाठिंबा मिळवल्यानंतर आणि शेवटच्या टप्प्यात काँग्रेसचे अशोक चव्हाण, मिलिंद देवरा यांना फोडल्यानंतर भाजपला जे यश अपेक्षित होतं ते मिळालेलं दिसत नाही. नेत्यांनी पक्षांतर केलं तरी कार्यकर्ते आपल्या पक्षातून हलतीलच असे नव्हे, असा संदेश मतदारांनी सर्वच पक्षांना दिलेला दिसतोय. राजकीय पक्षांनी चारित्र्यहीन उमेदवारांची पाठराखण करत त्यांना उमेदवारी देण्याचे प्रकारही मतदारांना रुचलेले दिसत नाहीत.
विशेष म्हणजे या निवडणुकीत मतदानोत्तर चाचण्या स्पष्टपणे फोल ठरल्याचं चित्र आहे. त्यामुळे एक्झिट पोलवर कितपत आणि का विश्वास ठेवावा, हा प्रश्न मतदारांसमोर उभा ठाकला आहे. या पोलस्टार्सनी आपल्या चाचण्यांच्या पद्धतीबाबत अंतर्मूख होण्याची गरज आहे. दबक्या पावलांच्या या परिवर्तनाची चाहूल या चाचण्यांना लागलीच नाही, असेच म्हणावं लागेल.
राज्यातील भाजपच्या आक्रमक प्रचाराच्या तुलनेत इंडिया आघाडीचा प्रचार काहीसा प्रभावहीन वाटत होता. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. पण निकालानं आता इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढल्याशिवाय राहणार नाही. त्यांचा हा वाढलेला आत्मविश्वास येत्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळू शकतो. राज्यात अनेक जागांवर भाजपचे दिग्गज नेते गारद झाले आहेत. ते पाहता येत्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीला चांगलीच तयारी करावी लागेल हे नक्की. कारण त्या निवडणुकीत महायुतीला नरेंद्र मोदी यांचा चेहरा वापरता येणार नाही, तर राज्याच्या विकासाचा मुद्दाच पुढे न्यावा लागणार आहे. राज्याचे प्रश्न पूर्णत: वेगळे आहेत. नागरिकांसमोर अनेक ज्वलंत प्रश्न आ वासून उभे आहेत. त्यांची उत्तरे आपण कशी शोधणार आहोत हे महायुती आणि महाआघाडी या दोघांनाही नागरिकांना पटवून द्यावे लागणार आहे.
मुंबईतील लोकसभेच्या चार मतदारसंघांकडे तमाम मुंबईकरांचे लक्ष लागलेलं होतं. कारण मुंबई नेमकी कुणाची? या प्रश्नाचे उत्तर त्यातून मिळणार होते. मुंबई ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचीच असल्याचे उत्तर मतदारांनी दिलंय. मुंबईतील उद्योगधंदे गुजरातला नेऊन मुंबईचं महत्त्व कमी करण्याबाबतच्या आरोपामुळे मराठी माणसाच्या मनात आधीपासून कमालीचा रोष होताच. शिवाय मराठी उमेदवारांना नोकरी नाकारण्याचा मुद्दा असो वा मराठी माणसाला सोसायटीत घर देण्यास नकार देण्याचा प्रकार असो, मराठी माणसाच्या मनात असलेली खदखद या मतदानातून बाहेर पडलीय. सहापैकी चार जागा महाविकास आघाडीनं जिंकल्या.
या निवडणुकीत बऱ्याच उमेदवारांना आपल्याच पक्षातील घरभेद्यांचा सामना करावा लागला हेही नाकारता येत नाही. म्हणूनच काही जागांचे निकाल हे कमालीचे अनपेक्षित लागले आहेत. परिवर्तनाच्या लढाईत असे फॅक्टरही पुढील काळात मोठी भूमिका साकारतील. सर्वच पक्षांना त्याबाबत काळजी घ्यावी लागणार आहे.
महाराष्ट्रात राहुल यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत मोट बांधली. पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला वारं कोणत्या दिशेनं वाहत आहेत, हे अचूक कळतं. लढाया सेनापतीच्या व्यूहरचनेवर आणि सामान्य सैनिकांच्या जोरावर लढवल्या जातात आणि त्याच लढाया जिंकल्याही जातात. ‘इंडिया’ आघाडीनं नेमकं तेच केलं. दहा वर्षांच्या सत्तेमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सत्तेचा अभिमान आणि फाजील आत्मविश्वास होता.
काँग्रेसची परंपरागत मतपेढी, ठाकरे यांनी स्वीकारलेला प्रबोधनकारांचा मार्ग आणि शरद पवार यांनी जागावाटपापासून उमेदवार निश्चितीपर्यंत प्रत्येक बाबतीत घातलेलं लक्ष, दोन्ही मित्रपक्षांसाठी या वयातही घेतलेल्या सभा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना हात घालून त्यांना आपलेसं करण्याचा प्रयत्न या सगळ्याच गोष्टी यशस्वी झालेला दिसतो. भारतीय जनता पक्षानं जेवढे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला, तेवढे ते काँग्रेसच्या पथ्यावर पडत गेलं. हिंदू, मुस्लिम, शेतकरी, कष्टकरी हे शोषित घटक महाविकास आघडीशी जोडले गेले. त्याचबरोबर महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर कितीही नाकारले तरी महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले अनेक उद्योग, बिझनेस सेंटर, सागरीकिनारा दल, व्याघ्र प्रकल्प गुजरातला चालले होते. त्यातच महाराष्ट्रातून उत्तर भारतीयांविरोधात आंदोलन करणाऱ्या राज ठाकरे यांचीच मदत घेण्याची वेळ भाजपवर आली. त्यामुळे ‘उत्तर भारतीय संघ’ महाविकास आघाडीबरोबर आला. मराठा, धनगर, लिंगायत आदींना दाखवलेली आश्वासनांची गाजरं भाजपनं मोडून खाण्याचा प्रयत्न केला. त्याची प्रतिक्रिया या समाजघटकांमध्ये उमटली. भाजपचा विदर्भातील हक्काचा मतदार म्हणजे कुणबी समाज. तोही यावेळी महाविकास आघाडीकडे आला.
हजारो वर्षे एकत्रित राहणाऱ्या समाजांमध्ये, धर्मांमध्ये विद्वेषाचे बीज पेरलेलं कुणालाच आवडलं नाही. हेच या निकालांमधून दिसले.
- शाहजहान मगदुम
मुंबई
8976533404
Post a Comment