Halloween Costume ideas 2015

राजर्षी शाहू महाराज आणि हिंदू - मुस्लिम ऐक्य

२५ जून शाहू महाराज जयंतीनिमित्त...



समाजातील सर्व घटकांचा सर्वांगीण विकास व्हावा हा राजर्षी शाहू महाराजांचा उद्देश होता. त्यासाठी त्यांनी सर्व जातीच्या व धर्माच्या लोकांनी शिक्षण घ्यावे म्हणून वसतीगृहांची निर्मिती केली. मुस्लिम समाज हा या देशातील भारतीय समाजाचा एक अविभाज्य घटक आहे आणि राष्ट्राची प्रगती व्हायची असेल तर मुस्लिम समाजातील मागासलेपण नष्ट झाले पाहिजे असे त्यांचें मत होते. मुस्लिम समाजातील अज्ञान नाहीसे होऊन त्याला गती मिळाली पाहिजे, आणि त्याकरिता हा समाज शिक्षणाभिमूख झाला पाहिजे; अज्ञानाच्या डबक्यात अडकलेला मुस्लिम समाज बाहेर पडावा व तो शिकावा,सवरावा यासाठी आवश्यक ती धोरणे डोळ्यासमोर ठेवून आपल्या राज्याचा कारभार करणारा हा पहिला राजा होय.

कोल्हापूर संस्थानाचा कारभार आपल्या हाती घेतल्यानंतर दिनांक २ एप्रिल १८९४ रोजी त्यांनी हिंदू - मुस्लिम ऐक्याविषयीचे मुलभूत विचार मांडले असल्याचे दिसून येते. राजर्षी शाहू महाराजांचा राज्यारोहन झाल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांचे सत्कार आयोजित करण्यात आले होते. पुणे येथील ‘ ‘सार्वजनिक सभा ‘ या संस्थेच्या वतीने ही हिरा बागेत भव्य सत्कार सोहळा पार पडला होता.यावेळी शाहू महाराजांना मानपत्र देण्यात आले होते. यावेळी मानपत्राचे वाचन बॅरिस्टर गोपाळ कृष्ण गोखले यांनी केले होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना शाहू महाराजांनी नुकत्याच उद्भवलेल्या हिंदू - मुस्लिम दंगली संदर्भात म्हटले होते की, “ या दोन समाजांत सलोखा आणि शांतता निर्माण केली जावी. हिंदू व मुस्लिम या दोन्ही समाजातील नेते त्या दृष्टीने प्रयत्न करत असतीलच. पण त्याचबरोबर सार्वजनिक सभेच्या नेते मंडळींनी हिंदू - मुस्लिम सलोखा व्हावा, म्हणून प्रयत्न करावेत.”

राजर्षी शाहू महाराजांनी हिंदू - मुस्लिम सलोखा संदर्भातील विचार सातत्याने अनेक वेळा व्यक्त केले आहेत, त्यांनी सामाजिक ऐक्य, धार्मिक सहिष्णुता व राष्ट्रीय एकात्मता ही तत्वे नजरेसमोर ठेवून आपल्या अनेक भाषणांतून हिंदू - मुस्लिम एकतेविषयीच नव्हे तर सर्व धर्मियांच्या एकतेचे विचार जाणीवपूर्वक व्यक्त केलेचे दिसून येते.

हुबळी येथे जुलै 1920 मध्ये भरलेल्या ‘कर्नाटक ब्राम्हणेत्तर सामाजिक परिषदे’च्या अध्यक्षपदी राजर्षी शाहू महाराज होते, यावेळी बोलताना महाराज म्हणतात... “मुसलमान हे नेहमी मराठ्यांप्रमाणे क्षात्रकर्म करितात. त्यांच्या चालीरीती ही बहुतेक मराठ्यांप्रमाणे आहेत. मराठ्यांच्या फौजेत मोठ मोठे मुसलमान सरदार होते त्याचप्रमाणे मुसलमानांच्या फौजेत मराठी सरदार होते.  हल्ली इंग्रज सरकारचे फौजेत मराठी व मुसलमान खांद्यास खांदा भिडवून लढले आहेत” अशाप्रकारे मुसलमान समाज हा या देशात कोणी परका नसून तो इथल्या बहुजन समाजाचाच एक भाग आहे, हे वास्तव समाजमनावर ठसविण्याचा प्रयत्न राजर्षी शाहू महाराजांनी जाणीवपूर्वक केलेला दिसून येतो.

हिंदू - मुस्लिम ऐक्याचे विचार फक्त भाषणांतून मांडून ते स्वस्थ बसले नाहीत, तर त्यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात हिंदू व मुसलमान या दोन्ही समाजांस समान न्यायाने वागविले, अनेक मुस्लिम समाजातील व्यक्ती त्यांच्या खाजगी बैठकीत आवर्जून उपस्थित असत. तर अनेक मुस्लिम समाजातील व्यक्तींना त्यानी महत्वाची पदे व वतने देऊन संस्थानात आपल्या पदरी ठेवले होते. मुस्लिम समाजातील अनेक दर्गे, मशिद व देवस्थानच्या निगराणीसाठी त्यांनी उदार अंतःकरणाने व सढळ हाताने मदत केल्याचे अनेक दाखले दिसून येतात. तसेच मुस्लिम समाजातील कवी, चित्रकार, गायक,पैलवान अशा गुणीजनांच्या गुणांचा गौरव करून त्यांना उदार राजाश्रय दिल्याचे दिसून येते.रमजानच्या महिन्यात सामुदायिक नमाजपठणसाठी जागा उपलब्ध करून देणे, पिण्याच्या पाण्याची सोय करून देणे, यांसारख्या संस्थानच्या वतीने सोयीसुविधा उपलब्ध करून देत, शिवाय मुस्लिम समाजातील कवी, चित्रकार, गायक,पैलवान व नेहमीच्या आपल्या खाजगी बैठकीतील मुस्लिम समाजातील व्यक्तींना खीर कुर्मा साठी लागणारी खजूर,खारीक, खोबरं, बदाम, पिस्ते यांसारख्या वस्तू व नवीन कपड्यांसाठी संस्थानमधून मदत देण्याचा आदेश देत असत.

स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात ही देशात अनेक ठिकाणी हिंदू - मुस्लिम समाजात जातीय दंगली होत असताना कोल्हापूरात मात्र हिंदू - मुस्लिम हे दोन्ही समाज सलोख्याने व एकोप्याने रहात आले आहेत, हा इतिहास आहे; तमाम बहूजन समाज मोहरमचा सण साजरा करण्यात अग्रभागी असतो, करवीर नगरीची भूमी राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या पुरोगामी विचारांनी सुपीक केलीय, त्यामुळेच या भूमीत हिंदू मुस्लिम समाजातील सलोखा व ऐक्य आजही अबाधित आहे.

संदर्भ: १) राजर्षी शाहू पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ, संपादक: डॉ.जयसिंगराव पवार, डॉ.मंजुश्री पवार.

२) श्री शाहू महाराजांच्या आठवणी,: भाई माधवराव बागल )


- डॉ. सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी : ९४२०३५१३५२

(सदर लेखात व्यक्त करण्यात आलेले विचार छत्रपती शाहू महाराज आणि लेखकाचे वैयक्तिक आहेत.)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget