Halloween Costume ideas 2015

जीवघेण्या मद्याचा कुठपर्यंत पुरस्कार

वक्त-ए-फुरसत है कहां काम अभी बाकी है
नूर-ए-तौहिद का इत्माम अभी बाकी है

मागच्या आठवड्यात कोरोनामुळे दोन गोष्टी ठळकपणे लक्षात आल्या. एक म्हणजे अगदी अलिकडेच म्हणजे अडीच तीन महिन्यांपूर्वी अफगानिस्तान, बांग्लादेश आणि पाकिस्तानमधील लाखो विदेशी नागरिकांना सीएए अंतर्गत नागरिकत्व देण्यासाठी सज्ज झालेल्या केंद्र सरकारला वेगवेगळ्या राज्यात अडकलेल्या आपल्याच मजुरांना स्वगृही परत जाण्यासाठी रेल्वेचे मामुली भाडे घेण्याची पाळी आली.
दोन म्हणजे देशातील लोकांची स्थिती वरवर वाटते तितकी चांगली नाही. देशातील लोक मोठ्या प्रमाणात दारूमुळे आतून पोखरून गेलेले आहेत. दोन दिवसाच्या दारू विक्रीच्या परवानगीवरून उडालेली जीवघेणी झुंबड पाहून हे सत्य लक्षात आले. म्हणून आज आपण मद्य या विषयाचा आढावा घेऊया.
व्याख्या - कोणत्याही शर्करायुक्त धान्य, फळ किंवा फुलातल्या शर्करेचे रूपांतर इथाईल अल्कोहोल म्हणजे  C2H5OH मध्ये करून त्यापासून तयार करण्यात येणार्‍या झिंग आणणार्‍या द्रव्य पदार्थाला दारू म्हणतात.

दारूचा इतिहास
    जगात दारूची निर्मिती नक्की कधी व कुठे झाली याबद्दल ठाम अशी माहिती जरी उपलब्ध नसली तरी अंदाजे 9 हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये आंबवलेल्या तांदळाच्या पाण्यात मध मिसळून ते द्रवण पिण्यास जेव्हा सुरूवात झाली तीच पृथ्वीवरील पहिली दारू असावी, असे इतिहासकारांचे मत आहे. युरोपमध्ये पुरातत्व खात्याकडून केल्या गेलेल्या उत्खननामध्ये दोन हजार वर्षापूर्वीची दारू बनविताना वापरली जाणारी भांडी आढळून आली. यावरून एक गोष्ट तर सिद्ध झाली की दारू ही प्राचीन काळापासून उपयोगात आणले जाणारे रसायन आहे. एवढे मात्र खरे की, दारूची सवय जगाला चीनने लावली. भारतात ही प्राचीन काळापासून दारूचा वापर होत असल्याचे अनेक दाखले इतिहासामध्ये नमूद आहेत. प्राचीन भारतात ’सोमरस’ नावाने जे पेय वर्णीले गेले आहे ते मद्यच आहे, असा बहुतेकांचा विश्‍वास आहे.

दुष्परिणाम
    मद्याचे शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक असे चौफेर नुकसान आहे. मद्याचे अल्पसे फायदे असल्याचा स्पष्ट उल्लेख कुरआनमध्येही आलेला असून, अ‍ॅलोपेथिक वैद्यक शास्त्रातील अनेक औषधांमध्ये मद्याचा वापर एक औषधीय द्रव्य म्हणून केला जातो. मात्र कुरआनने स्पष्ट केल्याप्रमाणे या द्रव्याचे फायदे कमी, तोटे जास्त असल्याचा अनुभव मात्र सर्वत्र सारखाच आहे. 4 आणि 5 मे 2020 रोजी देशभरातील दारू दुकानांवर उडालेल्या झुंबडीवरून एक विचार मनात आला की दारू पिणार्‍यांची संख्या देशात किती असावी? याची माहिती घ्यावी. थोडासा प्रयत्न केल्यावर एक माहिती अशी समोर आली की, भारताची लोकसंख्या जेव्हा 115 कोटी 17 लाख होती तेव्हा 67 टक्के प्रौढ व्यक्ती वार्षिक 2.6 लिटर शुद्ध अल्कोहोलचा वापर करीत होते. (संदर्भ : दै. लोकसत्ता चतुरंग पुरवणी 22 मार्च 2014)
    वारंवार तोल जावून पडणे, त्यामुळे इजा होणे, रक्ताच्या उलट्या होणे, लिव्हर सोरायसीस (जलोदर), वारंवार कावीळ होणे, उलट्या होणे, अपचन होणे, रक्तदाब वाढणे, हृदयरोग होणे यासह अनेक शारीरिक रोग दारूमुळे होतात. वाहन चालविताना होणार्‍या जीवघेण्या अपघातामधील मोठ्या संख्येने अपघात दारू पिऊन वाहन चालविण्यामुळेच होतात.
    दारूचे एक वैशिष्ट्ये म्हणजे तीची सवय चटकन लागते व पिण्याचा कोटा सातत्याने वाढत जातो. घरादाराच्या नासाडीसह प्रतिष्ठेची हानी होते. प्रत्येक गंभीर गुन्हा करण्यासाठी ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून बहुतेक गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक अगोदर दारू पितात व नंतर गुन्हे करतात. हा पोलिसांचा साधारण अनुभव आहे. शौकिन मद्यपानांचे रूपांतर अल्कोहोलिक मद्यपानामध्ये होण्यासाठी जास्त काळ वाट पहावी लागत नाही. येथेच्च दारू पिऊन झोपल्यावरही सकाळी उठताच पुन्हा दारू पिण्याची तीव्र इच्छा होते. म्हणून कोणत्याही शहरात प्रथम उघडली जाणारी दुकानेही साधारणपणे दारूची असतात.

सरकारी उत्पन्न
    महाराष्ट्र सरकारपुरता विचार केला असता जीएसटी आणि स्टॅम्पड्युटी वगळता उत्पादन शुल्क या गोंडस नावाखाली दारूविक्रीतून सरकारला मिळणारे उत्पन्न हे तिसर्‍या क्रमांकांचे उत्पन्न होय. आजमितीला महाराष्ट्रामध्ये 11 हजार 203 दारूची अधिकृत दुकाने आहेत. केवळ दोन दिवस तेही 9 जिल्हे वगळून उर्वरित महाराष्ट्रात दारू विक्रीची परवानगी देण्यात आली होती. तेव्हा 62 कोटी 55 लाखाची दारू या दोन दिवसात विकली गेली असल्याचे वृत्त ऑनलाईन लोकमतने 6 मे च्या अंकात दिलेले आहे. 2019 ते 2020 या साली दारू विक्रीतून 15 हजार 428 कोटी रूपयांचे उत्पन्न राज्य सरकारला झाले असे याच बातमीमध्ये म्हटलेले आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या म्हणण्याप्रमाणे एका दिवसात 24 लाख लिटर दारूची विक्री महाराष्ट्रात होते. केवळ महाराष्ट्रात एवढी दारू विक्री होते तर पूर्ण देशात ती किती होत असेल आणि त्यापासून किती सामाजिक नुकसान होत असेल याचा तर अंदाज लावणेही शक्य नाही.

दारूबंदी आणि इस्लाम
    पती-पत्नीमधील पवित्र नात्याला तसेच घररूपी किल्ल्याच्या सुरक्षेआड येणार्‍या प्रत्येक गोष्टीला इस्लामने हराम केलेले आहे म्हणून इस्लाममध्ये दारू हराम आहे, हे ओघानेच आले. म्हणून मुस्लिम व्यक्ती दारूचा द्वेष करतात अगदी पिणारेसुद्धा. मनामध्ये अपराधबोध घेऊन पीत असतात. इस्लामी धर्माचरण करणारी प्रत्येक मुस्लिम व्यक्ती दारूपासून आपोआपच सुरक्षित राहते, ही अल्लाहची फारमोठी मेहरबानी मुस्लिम उम्माहवर आहे. पृथ्वीवर अरबस्थान त्यातल्या त्यात सऊदी अरब एकमेव असा देश आहे जेथे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी दारूबंदी यशस्वी करून दाखविली. दारूबंदीच नव्हे तर सर्व प्रकारची नशाबंदी करून दाखविली जी की 1441 वर्षानंतरसुद्धा कायम आहे व प्रलयाच्या दिवसापर्यंत कायम राहील, असा विश्‍वास आहे. या देशाशिवाय पृथ्वीवर असा कोणताच देश नाही जिथे दारू नाही.
    अनेक देशांनी दारूबंदी करण्याचा अनेकवेळा प्रयत्न करून पाहिलेला आहे जो की त्यांच्या अंगलटी आलेला आहे. या ठिकाणी फक्त एक उदाहरण घेऊ. मोठा गाजावाजा करून नैतिकतेचा आव आणून 1920 साली अमेरिकेमध्ये समग्र दारूबंदी करण्यात आली. मात्र अवैध दारू विक्रीचा उच्चांक, दारू माफियांचा उदय, सिक्रेट बारची वाढती संख्या, लाचखोरीत झालेली कमालीची वाढ व महसुलातील घट, वाढलेले गुन्हे व विषारी दारू पिल्यामुळे वाढत असलेला अमेरिकी नागरिकांचा मृत्यूदर इत्यादी कारणामुळे 1933 साली ही बंदी मागे घ्यावी लागली. भारताच्या संविधानाच्या भाग 4 मध्येही मार्गदर्शक तत्वामध्ये एक तत्वे सामील करण्यात आलेले आहे, ज्यात घटनाकारांनी भविष्यात येणार्‍या सरकारांना समग्र दारूबंदी करण्याचे उद्देश्य ठरवून दिलेले आहे, जे की स्पष्ट आहे; आजपर्यंत पूर्ण करण्यात आलेले नाही.

दारूबंदीच्या विरोधातील तरतुदी
    1. ”हे प्रेषित मुहम्मद (सल्ल.)! लोक तुम्हाला विचारत आहेत दारू आणि जुगारासंबंधाने काय आदेश आहे? म्हणा ! त्या दोन्ही गोष्टींमध्ये मोठे नुकसान आहे. हे खरे आहे की, लोकांना त्याच्यामधून थोडासा फायदाही होतो. मात्र त्यातील होणारे नुकसान फायद्यांपेक्षा फार जास्त आहे.” (सुरे बकरा आयत नं. 219.).
    2. ”हे लोकांनो ! ज्यांनी इस्लामी श्रद्धा स्विकारलेली आहे ! ही दारू आणि जुगार आणि वेदी आणि शकून हे सर्व वाईट सैतानी कृत्य आहेत. यांच्यापासून दूर रहा. आशा आहे की तुम्ही यशस्वी व्हाल.” (सुरे मायदा आयत नं. 90) .
    3. ”सैतानची तर अशी इच्छाच आहे की, दारू आणि जुगाराच्या माध्यमातून तुमच्या दरम्यान वैर आणि तिरस्कार टाकायची आणि तुम्हाला अल्लाहच्या आठवणीपासून आणि नमाज अदा करण्यापासून प्रतिबंध करावयाचा. मग काय तुम्ही या गोष्टींपासून दूर राहणार नाही?” (सुरे मायदा आयत नं.91).
    वरील आयातींव्यतिरिक्त प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या अनेक हदीस दारू सेवनाच्या विरोधात असून, माणसांना दारूच नव्हे तर प्रत्येक नशेपासून दूर ठेवण्यासाठी प्रेरित करतात. त्यापैकी विस्तार भयामुळे एकच हदीस या ठिकाणी नमूद करून थांबतो. प्रेषित सल्ल. यांनी म्हटले आहे की, ’दारू ही तमाम वाईट गोष्टींची जननी (आई) आहे.’ यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही. 
    वरील सर्व विवेचनावरून वाचकांना एव्हाना लक्षात आलेलेच असेल की इस्लाम आपल्या अनुयायांच्या मनामध्ये प्रत्येक प्रकारच्या नशेच्या विरूद्ध तिरस्कार ठासून भरतो. म्हणूनच पावलोपावली आकर्षक दारूचे बार आणि खिशात पैसा असून व घरी कोणी विचारणारा नसून सुद्धा बहुतेक मुस्लिम लोक हे केवळ आपल्या इस्लामी श्रद्धेमुळे दारू सारख्या उध्वस्त करणार्‍या व्यसनापासून सुरक्षित आहेत.
    ज्याप्रमाणे अंधारावर टिका केल्याने अंधार जात नाही, कोणी तरी उठून दिवा लावावा लागतो, त्याचप्रमाणे दारू वाईट आहे म्हणून मुस्लिमांनी सांगून व स्वत: तिच्यापासून दूर राहून जमणार नाही. आपले देशबांधव किती मोठ्या प्रमाणात दारूच्या आहारी गेलेले आहेत, हे 4 आणि 5 मे 2020 रोजी लक्षात आल्यानंतर मुस्लिमांना गप्प राहून जमणार नाही. सरकार आणि परंपरा या दोन मोठ्या शक्ती जरी दारूच्या समर्थनार्थ उभ्या असल्या तरी नेक नियतीने ’यथा-शक्ती-निरंतरम्’ या तत्वाप्रमाणे मुस्लिमांनी जमेल तेव्हा व जमेल तसे नशाबंदीविरूद्ध जनजागरणाची मोहिम नियमितपणे सुरू ठेवली पाहिजे. कारण मुस्लिम समाजच नव्हे तर प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनासुद्धा चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचविण्याचीच जबाबदारी दिलेली होती. जबरदस्ती करून कोणामध्ये चांगूलपणा निर्माण करण्यास इस्लाममध्ये मज्जाव आहे. म्हणून आपण नशाबंदीचे आपले काम शुद्ध हेतूने यापुढे सातत्याने करावे, ही भारतीय मुस्लिमांची धार्मिक आणि राष्ट्रीय अशी दुहेरी जबाबदारी आहे.  ज्याप्रमाणे सातव्या शतकात अरबस्थानामध्ये शुन्य शक्यतेमधून प्रेषित सल्ल. आणि त्यांच्या जानीसार (जीव ओवाळून टाकण्यास सज्ज) सहाबा रजि. यांच्या प्रयत्नामुळे अरबस्थान नशामुक्त झाले तसेच भारतीय मुस्लिमांच्या प्रयत्नामुळे भारताची सुबुद्ध जनता नशामुक्त झाल्यास किमान मलातरी आश्‍चर्य वाटणार नाही. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, नशाबंदीचे हे कठीण कार्य करण्याची आम्हाला समज आणि शक्ती तर त्याचा स्विकार करण्याची देशबांधवांना सन्मती दे. (आमीन)

- एम.आय.शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget