(७८) ....परंतु तोही जेव्हा लयास गेला तेव्हा इब्राहीम (अ.) उद्गारला, हे माझ्या राष्ट्रबांधवांनो! मी त्या सर्वांपासून विरक्त आहे ज्यांना तुम्ही अल्लाहचा भागीदार ठरविता.५३
(७९) मी तर एकाग्र होऊन आपले मुख त्या आqस्तत्वाकडे केले आहे ज्याने जमीन व आकाशांना निर्माण केले आहे आणि मी कदापि अनेकेश्वरवाद्यांपैकी नाही.’’
(८०) त्याचे लोक त्याच्याशी भांडू लागले तर त्याने लोकांना सांगितले, ‘‘काय तुम्ही लोक अल्लाहच्या बाबतीत माझ्याशी भांडता? वास्तविक पाहता त्याने मला सरळमार्ग दाखविला आहे. आणि तुम्ही ठरविलेल्या भागीदारांना मी भीत नाही. होय, जर माझ्या पालनकर्त्याने काही इच्छिले तर ते अवश्य घडू शकते. माझ्या पालनकर्त्याचे ज्ञान प्रत्येक वस्तूवर पसरले आहे, मग काय तुम्ही शुद्धीवर येणार नाही?५४
(८१) आणि मग मी तुमच्या मानलेल्या भागीदारांना कसे भ्यावे जेव्हा तुम्ही अल्लाहबरोबर त्या वस्तूंना ईशत्वामध्ये भागीदार ठरविण्यास भीत नाही ज्यांच्यासाठी त्याने तुम्हांवर कोणतेही प्रमाण अवतरले नाही? आम्हा उभयपक्षांपैकी कोण निश्चिंतता व संतोषाला जास्त पात्र आहे? सांगा, जर काही तुम्हाला ज्ञान असेल तर.
५३) येथे आदरणीय पैगंबर इब्राहीम (अ.) यांच्या आरंभिक चिंतनाची स्थिती वर्णन केली गेली आहे जी ते पैगंबरत्वाच्या पदावर पोहोचण्यापूर्वी त्यांच्यासाठी सत्यापर्यंत पोहोचण्याचे साधन बनली. यात दाखविले गेले की एक बुद्धिमान आणि रास्त दृष्टीवान मनुष्य जो अनेकेश्वरवादी परिस्थितीत जन्माला आला, त्यास एकेश्वरत्वाची शिकवण त्या परिस्थितीत कोठूनही मिळूच शकत नव्हती. तेव्हा कशाप्रकारे सृष्टीतील निशाण्यांना पाहून आणि त्यांच्यावर चिंतन मनन करून ते सत्य जाणून घेण्यात सफल ठरले. वर पैगंबर इब्राहीम (अ.) यांच्या काळातील समाज जीवनाची स्थिती सांगितली गेली. त्याकडे पाहिल्याने माहीत होते की इब्राहीम (अ.) यांनी जेव्हा तारुण्यात पाय ठेवला तेव्हा ते विचार करु लागले. त्यांना दिसले की चहुकडे चंद्र, सूर्य व ग्रहांची पूजा होत आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे इब्राहीम (अ.) यांचा सत्यशोध कार्यारंभ याच प्रश्नाने झाला की, काय यापैंकी कोणी ईश्वर आहे? याच केंद्रिय
प्रश्नावर त्यांनी चिंतन मनन केले. शेवटी त्यांनी समाजातल्या सर्व प्रचलित ईश्वरांना एक अटल नियमात बद्ध गुलामाप्रमाणे पाहिले. त्यांनी निर्णय केला की ज्यांचा ईश्वर होण्याचा दावा केला जातो त्यांच्यापैकी कुणामध्येही ईशत्वाचा गुण दिसत नाही. ईश्वर फक्त तोच आहे, ज्याने या सर्वांना निर्माण केले आणि उपासनेसाठी बाध्य केले. या कथनांवरून लोकांच्या मनात एक शंका येते. ती म्हणजे पैगंबर इब्राहीम (अ.) यांनी हे चिंतन मनन प्रौढावस्थेत आल्यानंतरच केले असेल. मग ही घटना अशाप्रकारे का सांगितली गेली की जेव्हा रात्र झाली तर हे पाहिले आणि दिवस उजाडला तर हे पाहिले? जणू काही ही विशेष घटना पाहण्याचा त्यांना यापूर्वी योग मिळाला नव्हता. असे घडणे असंभव आहे. ही शंका काहींच्यासाठी इतकी बिकट झाली की त्यांनी पैगंबर इब्राहीम (अ.) यांच्या जन्माविषयी आणि पालनपोषणाविषयी एक विचित्र कहाणी रचली. त्यात सांगितले गेले की पैगंबर इब्राहीम (अ.) यांचा जन्म आणि संगोपन एका गुहेत झाले होते. तेथे प्रौढावस्था येईपर्यंत त्यांनी चंद्र सूर्य व ताऱ्यांना पाहिले नव्हते. या गोष्टीला समजण्यासाठी अशाप्रकारच्या खोट्या कहाणीची आवश्यकता नाही. न्यूटनच्याविषयी प्रसिद्ध आहे की त्याने बागेत एका सफरचंदाला खाली पडताना पाहिले आणि तो विचार करू लागला की वस्तू शेवटी जमिनीवरच का पडतात? चिंतन मनन करता करता गुरुत्वाकर्षणाच्या शोधापर्यंत पोहचला. स्पष्ट आहे की (या घटनेपूर्वी न्यूटनने अनेकदा वस्तूंना जमिनीवर पडतांना पाहिले असेल. मग कोणते कारण आहे की यापूर्वी तो विचार करू शकला नाही?) याचे उत्तर म्हणजे एक विचारी मन सदैव एकाच प्रकारच्या निरीक्षणाने एकाच प्रकारचा प्रभाव ग्रहण करत नाही. अनेकदा असे होते की एकाच वस्तूला मनुष्य अनेक वेळा पुन्हा पुन्हा पाहतो आणि त्याच्या मनात विचार येत नाही. परंतु एखाद्या वेळी त्याच वस्तूला पाहून अचानक त्याच्या मनात खटक निर्माण होते आणि त्याला रहस्य उलगडू लागते. असाच मामला आदरणीय पैगंबर इब्राहीम (अ.) यांच्याविषयी झाला होता. रात्र रोज येत होती, सूर्य, चंद्र आणि तारे डोळयादेखत उगवत आणि अस्त पावत होते. परंतु तो एक विशिष्ट दिवस होता जेव्हा एका ताऱ्याच्या निरीक्षणाने त्यांच्या मनाने त्यांना एकेश्वरत्वाच्या केंद्रिंबदूकडे जाण्यास प्रवृत्त केले. त्याविषयी आणखी एक प्रश्न निर्माण होतो की जेव्हा आदरणीय पैगंबर इब्राहीम (अ.) यांनी ताऱ्याला नंतर चंद्राला व सूर्याला पाहून सांगितले, ``हा माझा पालनकर्ता आहे'' मग काय त्या वेळी ते तात्कालिक का होईना अनेकेश्वरत्वात गुरफटले नव्हते का? याचे उत्तर म्हणजे सत्यशोधक आपल्या शोधकार्यात पुढे जात असताना मध्ये ज्या पायऱ्यांवर विचार करण्यासाठी थांबतो, तिथे त्याचे थांबणे व समजणे सत्य शोधनासाठी असते व ते निर्णय स्वरुपात मुळीच नसते. खरे तर हे थांबणे विचारविनिमय व सत्य शोधनासाठीच असते, निर्णायक रूपात नसते. शोधकर्ता यापैकी ज्या टप्प्यावर थांबून म्हणतो, ``असे आहे'' तर वास्तविकपणे त्याचा हा अंतिम निर्णय नसतो. त्याचा अर्थ असा होतो की ``असे आहे?'' आणि शोधांति त्याचे उत्तर ``नाही'' मिळते व तो पुढे आपले शोधकार्य चालू ठेवतो. म्हणून असा विचार करणे अगदी चुकीचे आहे की शोधकार्यात जिथे कुठे तो थांबत गेला तो तिथे अनेकेश्वरत्व (शिर्क) करत गेला.
५४) मूळ शब्द `तजक्कुर' प्रयुक्त झाला आहे. याचा अर्थ एक व्यक्ती गफलतीत आणि विसरभोळेपणात पडलेली आहे, तो अचानक अचंबीतपणे त्या गोष्टीची आठवण करतो ज्याविषयी तो आजतागायत अज्ञानी होता. म्हणूनच आम्ही ``अ-फ़- लात-त जक्करून'' चा हा अनुवाद केला आहे. आदरणीय इब्राहीम (अ.) यांच्या कथनाचा अर्थ हा होता, ``तुम्ही जे करता त्यापासून तुमचा खरा पालनकर्ता बेखबर नाही. त्याचे ज्ञान साऱ्या सृष्टीवर फैलावलेले आहे. मग काय या वास्तविकतेला जाणूनसुद्धा तुम्ही सावध होणार नाही?''
Post a Comment