Halloween Costume ideas 2015

नैतिक पत्रकारितेचा ऱ्हास

करोना व्हायरसविरोधी लढ्यात संपूर्ण जग होरपळून निघत आहे. या दरम्यान वृत्तवाहिन्यांना आपला टीआरपी वाढविण्याची अगदी सुवर्णसंधीच चालून आली. पत्रकारितेच्या मूल्यांमध्ये माहितीचा वा बातमीचा स्रोत तपासणे अधिक महत्त्वाचे समजले जाते. टीआरपीसाठी माहितीचा चोळागोळा करून भडक, खुसखुशीत, एक्सक्लुझिव्ह असे आवरण चढवून दाखवले जातात. वांद्रे येथे घडलेल्या घटनेनंतर ‘एबीपी माझा’पाठोपाठ हिंदी मराठी अशा अनेक वृत्तवाहिन्यांनी ‘पेâक न्यूज’चे रूपांतर ‘ब्रेकिंग पेâक न्यूज’मध्ये करून टाकले. रजत शर्मांच्या टीव्हीने तर २०००-३००० मजूर मस्जिदसमोर का जमले’ अशा मथळ्यांनी आपल्या टीव्हीचा स्क्रीन भरून ‘धार्मिक’ करून टाकला. ‘न्यूज नेशन’च्या वृत्तवाहनिीच्या अँकरलादेखील सामान्य मजुरांचा जमाव ‘धार्मिक’ वाटला आणि त्याने आपले ठरलेले प्रोपोगंडा पसरवणे चालूच ठेवले. याच करोना व्हायरस युद्धाच्या दरम्यान मुस्लिम समाजाचे ‘पेâक व्हिडिओ’ आणि बातम्या व्हायरल झाल्या. अशा प्रकारची ‘धार्मिक अशांतता’ माजविण्याचा एजेंडा चालविणाऱ्या इंडिया न्यूज, एबीपी हिंदी न्यूज, न्यूज नेशन यांच्यावर कारवाई का करायला नको? ते तर यापेक्षा अधिक मोठा गुन्हा करीत आहेत. लोकशाहीचा चौथ्या आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेतील अर्नब गोस्वामीसारख्या एका विशिष्ट वृत्तीद्वारे आज असंख्य माथी भडकवली जात आहेत. आक्रमकता म्हणजे आततायीपणा वा उद्धटपणा, स्पष्टवक्तेपणा म्हणजे वाचाळवीरता, स्वातंत्र्य म्हणजे उन्माद, हे या पत्रकारांचे व्यवच्छेदक लक्षण बनले आहे. त्यातून देशाच्या सुरक्षिततेलाच धोका निर्माण होत आहे. संपूर्ण देश करोनासारख्या संकटाशी सामना करत असताना काही वृत्तवाहिन्या मात्र हिंदू आणि मुस्लिमांमधील दरी वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या षड्यंत्राला यश मिळालेच तर सरकार करोनाशी लढेल की धार्मिक दंगली मिटवेल, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. पालघरमधील घटनेला धार्मिकतेचा मुलामा देण्याचे पद्धतशीरपणे काम या वाहिन्या करीत होत्या. सातत्याने हिंदू-मुस्लिम असा भेद करून त्यासंदर्भातील बातम्या देण्याचे आणि चर्चा घडवून आणण्याचे काम येथे सातत्याने सुरू असते. पत्रकारितेच्या नितीमूल्यांचा बळी टीआरपी मिळविण्याच्या स्पर्धेमुळे दिला जात असल्याचे जाणवू लागले आहे. सध्याच्या कोरोनाच्या संवेदनशील वातावरणात लोक भीतीने मृत्युमुखी कसे पडतील याचीच जणू तजवीज या वाहिन्या करत आहेत. आर्थिक विकास, शिक्षण सुधार, बेरोजगारी, सामाजिक-बौद्धिक विकास यासारख्या भविष्यवेधी बाबींवर पत्रकारांची बुद्धी खर्च व्हावी अशी अपेक्षा असते, पण सध्या या बुद्धिजीवी म्हणवणाऱ्यांची क्षमता अनेक उथळ, भोंगळ, धर्मवादी, अवैज्ञानिक विधानांचा आणि कृत्यांचा प्रतिवाद करण्यात खर्च पडत आहे. समाजही आपल्या समस्यांवरील उत्तरे शोधण्याऐवजी या वैचारिक भाऊगर्दीत सापडत दिशाहीन होत आहेत. त्यात राष्ट्रीय महत्त्वाचे अनेक विषय विरून जाताना दिसतात. ‘लोकशाही म्हणजे संवाद’ असे लोकशाहीचा ब्रिटनमधील भाष्यकार जॉन स्टुअर्ट मिल्स यांनी म्हटले आहे. मात्र, हा संवाद सभ्यपणा आणि सुसंस्कृतपणाची पातळी ओलांडणारा नसावा. हे भान सुटले की मग तो संवाद राहत नाही. विसंवाद होतो. विशेषत: करोनासारख्या संकटकाळात संवेदनशील विषय अतिशय सावध आणि समंजसपणे हाताळत राष्ट्रीय एकात्मता टिकून राहाण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे, पण या मूल्याला पायदळी तुडवून जातीयवादी आणि धर्मवादी विश्लेषण आज सर्रास सुरू आहे. राजकारणाला जेव्हा समाजाच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविता येत नाहीत तेव्हा समाजापुढे आभासी असे धार्मिक प्रश्न अशा कट्टरवादी विचारसरणींच्या माध्यमातून निर्माण केले जातात. निरपेक्ष वार्तांकनापेक्षा आरडाओरड, आकांडतांडव, आरोळी, किंकाळी, डरकाळी आणि हंबरडा यांच्या साहाय्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणे एवढाच बहुसंख्य न्यूज चॅनल्सचा आवडता कार्यक्रम आहे. त्यातून प्रेक्षकांना विचार करण्याला प्रवृत्त करण्याऐवजी विचार कसा करायला हवा हे वारंवार ठसवून त्यांच्या विचार प्रक्रियेवरही नियंत्रण मिळवले आहे. मानवानेच वाढवून मोठा केलेला हा माहितीचा भस्मासूर आज मानवालाच भस्मसात करण्याच्या स्थितीत पोचला आहे. आज न्यूज चँनल्स द्वेषाचे पीठ दळून, धार्मिक ध्रुवीकरण करत धर्मांध राजकारण्यांचे पोषण करत आहे. सध्या न्यूज चँनल्सच्या जात्यात मुस्लिम आहेत म्हणून आनंदी होणारांना हे माहीत नाही सुपात कोण कोण आहेत. उद्या दलित, आदिवासी, दक्षिण भारतीय आणि काही दिवसांनी खिस्ती, शिख, जैन वा मारवाडी, कोणताही अल्पसंख्य समाज जात्यात असू शकतो. कारण प्रत्येकाकडे एक स्वतंत्र जाते असू शकेल. आणि एकदा नरभक्षणाची सवय लागली की, मग मांस महत्त्वाचे असते कोणाचे आहे हे नव्हे! म्हणून हा भस्मासूर रोखायला हवा! काळ माणसाला सावध होण्याच्या खूप संधी देत असतो. पण आपण सावध होणार की न्यूज चँनल्सच्या खेळात पारध होणार हे ठरविण्याची वेळ या महामारीच्या काळात आपल्या समोर आली आहे. डॉक्टर, नर्स, पोलीस यांच्यासारखे पत्रकारदेखील जीवावर उदार होऊन आपले कार्य करत आहेतच. काळोखात अडकलेल्या बाजारीकरण झालेल्या अशा अंधकारमय, बदनाम झालेल्या या माध्यम व्यवसायाला कदाचित केवळ ‘नैतिक पत्रकारिता’ या चिखलातून बाहेर काढेल.

- शाहजहान मगदुम

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget