कोरोनाने जगाची फिरती चाके थांबविली आहेत. सुरूवात डिसेंबर 2019 पासून वुहान शहरातून झाली. बघता-बघता सारं जग कोरोनाच्या विळख्यात आलं. जे लोक म्हणत होते की, ते तर चीनला आहे आपल्याला काय? परंतु दुसर्याचं घर जळताना पहाणं मानवी स्वभावाचा दुर्गून. मात्र कोरोनानं जगाला दाखवून दिले की कुठलीही भूमी त्याला परकी नाही, त्याला कोणाचेही वैर नाही. धर्म, जात, पात त्याचा विषय नसून, त्याचा विषय फक्त माणूस आहे.
कोरोना व्हायरस काय आहे?
डब्ल्यूएचओ (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) च्या मते हा व्हायरस सेक फुडशी निगडीत आहे. हा व्हायरस फक्त मानवांनाच बाधा करतो असे नाही तर तो प्राण्यांतही आढळून येतो. एका अभ्यासात कोरोनाची अनेक रूपे समोर येत आहेत. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस निघाली तरी प्रत्येक व्यक्तीला ती लागू होईल का नाही, याची शाश्वती तज्ज्ञ देऊ शकणार नाहीत. कोरोनाची लक्षणे - तज्ज्ञांच्या मते डोकेदुखी, नाक वाहने, खोकला, घशात खवखव, ताप, शिंका येणे, धाप लागणे, निमोनिया, अस्वस्थ वाटणे आदी लक्षणे आहेत. तरी परंतु, महाराष्ट्रातील अनेक रूग्णांत सदरची लक्षणे नसली तरी तपासणीअंती रूग्णांचे रिपोर्ट हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या कोरोनावर लस उपलब्ध नाही. तरी परंतु, जागतिक आरोग्य संघटनेने जी उपचारपद्धती आखून दिलेली आहे त्यानुसार बरेच रूग्ण कोरोनामुक्त होत आहेत. भारतामध्येही मोठ्या प्रमाणात रूग्ण बरे होत आहेत.
उपाय
1. हात साबणाने धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, खोकताना आणि शिंकताना तोंड झाकणे, रूमाल, मास्क अथवा टिश्यू पेपर वापरणे, ज्या व्यक्तींमध्ये सर्दी आणि फ्लूची लक्षणे आहेत त्यांच्यापासून शारीरिक अंतर ठेवणे, जंगली जनावरांचा संपर्क टाळणे आदी. स्वत:ची इम्युनिटी पावर वाढविणे. चांगला सकस आहार घेणे, योगा, हलका फुलका व्यायाम करणे आदी.
कोरोना व्हायरस होणार्या मृत्यूदराचे प्रमाण
1. 9 वर्षापर्यंत 0 टक्के, 2. 10 ते 39 वर्षांपर्यत 0.2 टक्के, 3. 40 ते 49 वर्षांपर्यंत 0.4 टक्के, 4. 50 ते 59 वर्षांपर्यंत 1.3 टक्के, 5. 60 ते 69 वर्षापर्यंत 3.5 टक्के, 6. 70 ते 80 वर्षे 14.8 टक्के मृत्यूचे प्रमाण आहे.
जगभरात कोरोना संक्रमणाची स्थिती
28 एप्रिलपर्यंत जगभरात 30 लाख 46 हजार 213 रूग्ण आढळले. त्यातील 2 लाख 10 हजार 379 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 9 लाख 16 हजार 374 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात आत्तापर्यंत 29 हजार 450 रूग्ण आढळले. त्यापैकी 939 रूग्णांचा मृत्यू झाला तर 7 हजार 133 रूग्ण बरे झाले. महाराष्ट्रात 9 हजार 318 रूग्ण कोरोनाबाधित आहेत तर 400 जणांचा मृत्यू झालेला आहे.
देशभरात लॉकडाऊनची स्थिती आहे. ही स्थिती आपल्या भल्यासाठीच आहे. केंद्र शासन आणि राज्य शासनाने जे दिशानिर्देश दिले आहेत, त्याचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. तरी परंतु, काही लोक नियम तोडून बाहेर फिरत आहेत आणि पोलिसांचा मार खात आहेत. पोलिसांशीच हुज्जत घालत आहेत. हे एकदम चुकीचे आहे. आज सारं जग एका कुटुंबाप्रमाणे कोरोना विषाणूशी लढा देत आहे. त्यामुळे या कुटुंबातील सदस्य म्हणून आपण जबाबदारीने वागले पाहिजे. स्वच्छता पाळणे आणि शारीरिक अंतर ठेवणे सध्यातरी हाच उपाय आरोग्य संघटना सांगत आहे. मात्र लॉकडाऊनचा कालावधी दिवसेंदिवस वाढत असल्याने आर्थिक समस्या भेडसावत आहे. याला सरकारने जी उपाययोजना केली आहे, ती जरी मजबूत नसली तरी सरकारच्या उत्तरदायित्वाबरोबर आपण सामाजिक भान ठेवत गरजूंपर्यंत मदतीचा हात आणि अन्नाचा घास पोहोचविला पाहिजे. यासाठी सामाजिक संस्था, संघटना पुढे येवून जी गोरगरीबांची सेवा करत आहेत, त्याचे समाधान वाटत आहे.
लॉकडाऊनच्या काळात मानसिक हानीही मोठ्या प्रमाणात होत आहे. यापासून वाचायचे असेल तर आपणाला पुस्तके, धर्मग्रंथ वाचून स्वत:ला सावरावे लागेल. सध्या रमजानचा पवित्र महिना आहे. जो माणसाला संयम, शिस्त आणि ईश्वरी आज्ञेचे पालन करण्यास प्रवृत्त करतो. त्यामुळे वेळ काढून कुरआनचे अध्ययन करा.
रमजानमध्ये हे नियम पाळा.
रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या दृष्टीने रमजानमध्ये काय बदल करावे व काळजी घ्यावी याचे निर्देश दिले आहेत. देशभरातून उलेमा आणि डॉक्टरांनी याला मान्यता दिली आहे.
1) कोविड-19 चे निदान झालेले, निदान होऊन बरे झालेले व निश्चित निदान झालेल्या रूग्णांच्या संपर्कात येऊन सध्या होम क्वारंटाईनचा सल्ला दिलेल्यांनी रोजा ठेऊ नये..
2) 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्यांनी तसेच 60 पेक्षा कमी वय असले तरी मधुमेह, हृदयरोग, कॅन्सरचा त्रास असलेल्यांनी शक्यतो रोजा टाळावा.
3) पवित्र कुराणमध्येही आजारी व्यक्तींना रोजा करण्यातून सूट देण्यात आली आहे. या संकेताशिवाय अजून काही गोष्टी रमजानदरम्यान पाळण्यात हरकत नाही. मधुमेह नियंत्रित असणारे काहीजण या काळात रोजा ठेवतात. अशांनी रक्तातील साखर 70 च्या खाली व 300 च्या वर जाणार नाही. याची काळजी घ्यावी. स्वस्थ व्यक्तींनी रोजा करत असताना खोकला, ताप, सर्दी असल्यास रोजा करणे थांबवावे, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
4) या वर्षी रमजानदरम्यान प्रार्थना, नमाज घरीच अदा करावी. एकत्रित इफ्तारचे कार्यक्रम टाळावे. काही कारणास्तव रोजा ठेवता आला नाही तरी कुरआनमध्ये कफ्फाराची तरतूद सांगितलेली आहे.
5) कफ्फारा म्हणजे गरजवंतांना पैसे किंवा जेवणाचे दान, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक दान करून आपण रोजा न करता कफ्फाराचे पालन करू शकता.
- आदिबा रियाज शेख, उस्मानाबाद
Post a Comment