Halloween Costume ideas 2015

लॉकडाऊनमधील रमजान

मित्रानों ! कोविड-19 च्या छायेखाली रमजान सुरू झालेला आहे. मानवी सभ्यतेच्या इतिहासामध्ये कदाचित असं पहिल्यांदा घडत असेल की संपूर्ण जग एका भयंकर आजाराच्या तडाख्यात सापडलेले आहे. याला संयोगच म्हणावे लागेल की अशा या वातावरणात रमजान सुरू झालेला आहे. एरव्ही या महत्त्वाच्या पर्वाला मुसलमान पूर्व तयारीनिशी सामोरे जातात. कुरआनमध्ये या महिन्यासंबंधी असा आदेश आलेला आहे की, ’हे लोकांनों ! ज्यांनी ईमान धारण केले आम्ही तुमच्यावर रमजानचे उपवास अनिवार्य केलेले आहेत. तसे जसे तुमच्या पूर्वीच्या लोकांवर अनिवार्य केले होते.’ आणि याचा उद्देश्य कुरआनमध्ये असा सांगितला गेला आहे की, तुमच्यामध्ये ईश्‍वराचे भय निर्माण व्हावे. आज जगात जी काही स्थिती आहे, त्यामुळे सरकारने दिलेल्या अनेक निर्देशांच्या आधीन राहून आपल्याला हा महिना साजरा करावयाचा आहे. जेव्हा एकीकडे कोविड-19 एक हानिकारक व्हायरस आहे तेव्हाच दुसरीकडे अल्लाहने याद्वारे आपल्याला एक चांगली संधी मिळवून दिलेली आहे की, इतर वर्षाच्या तुलनेत आपण आपल्या घरात राहून अधिक तन्मयतेने ईबादत करू शकू. कोविड- 19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमधून जगाला कोणकोणते लाभ मिळतील, हे आपल्याला आज कळणार नाहीत. मात्र जो वेळ आपल्याला या स्थितीमुळे -(उर्वरित पान 2 वर)
उपलब्ध झालेला आहे त्याचा सदुपयोग आपण रोजे, नमाज, जकात, नफील इत्यादीच्या मार्गाने करू शकतो. आपला संपर्क अल्लाहशी अधिक जवळचा करू शकतो. ही खूपच चांगली संधी साधून आलेली आहे. म्हणूनच या संदर्भात आपल्यासमोर काही गोष्टी ठेऊ इच्छितो.
    पहिली गोष्ट अशी की, प्रत्येक मुस्लिम व्यक्तीची ही मनोमन इच्छा असते की, रमजानच्या संपूर्ण महिन्यातील प्रत्येक नमाज बाजमात अदा करावी. आपण पाहतो की, एरव्ही वर्षभर रिकाम्या असलेल्या मस्जिदी रमजानमध्ये भरलेल्या असतात. एरव्ही वर्षभर नमाज न अदा करणारे लोकही रमजानमध्ये नित्यनियमाने नमाज अदा करतात. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे शारीरिक अंतर ठेवण्यासंबंधी शासनाचे जे आदेश आहेत ते रमजानमध्येही लागू होतात म्हणून नमाज आपापल्या घरातच अदा करावी लागेल. घरातही नमाज अदा करताना घरातील सर्व सदस्यांनी जमात बनवून नमाज अदा करावी मात्र त्यातही पुरेसे अंतर राखले जावे. तरावीह संबंधानेही उलेमांनी ती घरात अदा करण्याचे निर्देश दिलेले आहेत. कोविड-19 चा उपाय हाच आहे की, प्रत्येकाने घरात रहावे. अल्लाह यातूनही काही चांगले घडवून आणील, असा मला विश्‍वास आहे. रमजानमध्ये इफ्तारच्या वेळेस इफ्तारी करण्यासाठी गर्दी करण्याची व इफ्तार झाल्यानंतर रात्री एकत्रित गोळा होऊन गप्पा मारत बसण्याची आपल्यामधील अनेकांना सवय आहे. तरावीहच्या नमाज नंतर सुद्धा गोळा होऊन महेफिली सजविण्याची आपली सवय आहे. तिला सुद्धा लगाम लावणे गरजेचे आहे. संपूर्ण रमजानमधील एक क्षण सुद्धा गफलतीमुळे वाया जाणार नाही याकडे लक्ष द्यावे लागेल. रमजानमध्ये अनेक लोक रात्री जागून दिवसा झोपत असतात. ही शरियत आणि शरिराच्या दृष्टीने अतिशय चुकीची बाब आहे. आम्हाला दिवस आणि रात्रीचा शेड्युल तयार करावा लागेल व आपला रमजानमधील वेळ हा सकारात्मक आणि प्रोडक्टीव्ह कसा राहील याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.
    लॉकडाऊनचा उपयोग करून नवीन-नवीन गोष्टी शिकता येतील. आपल्या कुटुंबियांशी सकारात्मक संवाद वाढविता येईल. अल्लाहच्या कृपेने जमाअते इस्लामीने या लॉकडाऊनच्या काळामध्ये रमजानचा पूर्ण शेड्युल्ड तयार करून स्त्रिया, मुले आणि पुरूष यांना भरगच्च ऑनलाईन कार्यक्रम दिलेला आहे. त्याचा उपयोग करून आपण रमजान सार्थकी लावू शकतो. कुरआन शुद्ध उच्चारणासह वाचणे आणि त्याच्या निर्देशांवर चिंतन करणे हा कुरआनचा हक्क आहे. तो या काळात आपल्या व आपल्या कुटुंबियाकडून अदा केला जाईल, याकडे लक्ष द्यावे. आपल्या ऑनलाईन अ‍ॅक्टीव्हीटीज वाढवून इस्लामचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. रमजानमध्ये जे आपले नातेवाईक गरीब आहेत, शेजारी-पाजारी यांना मदत करण्याचा हा महिना आहे. याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. या काळात आपण केलेल्या खर्चाचा मोबदला अल्लाह आपल्याला कित्येक पटीने वाढवून देईल, यात शंका नाही. रोजा अल्लाहसाठी आहे, त्याचा मोबदला मी स्वत: आहे, असे फरमाविलेले आहे. यावर आपला ठाम विश्‍वास असावयास हवा. तरच लॉकडाऊनमधील रमजान सार्थक लावल्यासारखे होईल.

- रिजवानुर्रहमान खान,
अध्यक्ष, जेआयएच, महाराष्ट्र

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget