Halloween Costume ideas 2015

पुण्य कमविण्याचा महिना - रमजान

इस्लामच्या जीवनपद्धतीमध्ये पवित्र व महत्त्वपूर्ण मानला जातो. पवित्र रमजानचे रोजे अर्थात उपवासाचे शुभागमन झाले आहे. चांद्रदर्शन झाल्यानंतर हा पवित्र महिना सुरू होतो. सर्वशक्तिमान परमकृपाळू, दयाळू ईश्वराकडून पवित्र रमजान महिन्याचे आगमन झाले आहे.
रमजान महिन्यात पवित्र कुरआन अवतरित झाले. जे मार्गदर्शन आहे अखिल मानवजातीसाठी आणि मार्गदर्शनाचे सुस्पष्ट प्रमाण आणि सत्य व असत्यादरम्यान फरक करणारी कसोटी आहे. पवित्र कुरआन ईश्वराकडून अखिल मानवजातीसाठी मोठी देणगी आहे. मानवी जीवन सुखी, समाधानी व आनंदी असावे हा कुरआनचा मुख्या उद्देश आहे. रमजान महिन्यात कुरआनचे अवतरण झाल्यामुळे या महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मूळ अरबी भाषेतील कुरआनचे मराठी, इंग्रजी, हिंदीसह जगातील अधिकांश भाषांमध्ये अनुवाद उपलब्ध आहेत.
आपले आचारविचार व व्यवहार आपल्या निर्माणकत्र्या ईश्वराच्या इच्छेनुसार आयुष्य घडविण्याचा आणि अखिल मानव समूहामध्ये प्रेम, बंधुत्व आणि मानवतेचा संदेश देणारा हा पवित्र रमजान आहे. या महिन्यात मानवाला सच्चरित्राचे प्रशिक्षण लाभते. मुस्लिम बांधवांकडून या महिन्यात पुण्यकर्म केले जाते. जणू एक पुण्यकर्म केले तर एक हजार पुण्यकर्म केल्याचे श्रेय मिळते. एक वेळची नमाज पठण कराल तर सत्तरपटीने त्याचे पुण्य ईश्वर देत असतो.
परमकृपाळू ईश्वराने रोजाची म्हणजेच उपवासाची आज्ञा दिली. इतर उपवासांपेक्षा या अनिवार्य उपवासाचे स्वरूप वेगळे आहे. उपवास फक्त पोटाचा नाही तर शरीरातील अवयवांचा आहे. डोळ्यांचा- कोणतीही वाईट गोष्ट पाहू नये, हाताने वाईट कृत्य करू नये, जिभेने वाईट संभाषण करू नये. कानाने वाईट शब्द ऐकू नये. पायाने वाईट मार्गावर चालू नये. अशा प्रकारे उपाशी राहून या पद्धतीने आचरण केले तर ईश्वराजवळ हा उपवास मंजूर होतो. उपवासामुळे अन्नपाण्याविना राहाव्या लागणाऱ्या वेदणेची जाणीव होते. भुकेलेल्यांना अन्नपाणी किती गरजेचे आहे कळते.
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, ‘रमजान सहानुभूतीचा, आपुलकीचा, दु:खनिवारण करण्याचा महिना आहे. मानवाची सेवा करून पुण्य मिळवा. मानवांची सेवा हीच ईश्वराची सर्वश्रेष्ठ सेवा आहे. निराधार विधवा स्त्री, अनाथ मुले, वृद्ध आईवडिलांची सेवा करा, तुम्हाला स्वर्गात स्थान मिळेल.’
ईश्वराने श्रद्धावंतांवर जकात अर्थात कर अनिवार्य केला आहे. आपल्या उत्पन्नाच्या अडीच टक्के हिस्सा जकातीपोटी दान करावा. दानामुळे मानवी मनातील स्वार्थ आणि लालसेला पायबंद घालण्याचा प्रयत्न आहे. जकातीची रक्कम गोरगरीब, अडलेले, निराधार विधवा स्त्री, अनाथ मुलामुलींच्या कल्याणासाठी वापरावी. दीनदलितांचे दु:ख दूर करणे ईश्वराला प्रसन्न करण्याचा मार्ग आहे. जकात अशी द्या एका हाताने दिले तर दुसऱ्या हाताला कळू नये. जकात देण्याची ऐपत असेल अशा श्रद्धावंतांनी जकात द्यावी. परंतु सदका-ए-फित्र हे अनिवार्य दान कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडून पावणे दोन किलो गहू किंवा त्याची रक्कम गरजू व्यक्तीला द्यावी. सदकारूपी दान हे पवित्र रमजान महिन्यामध्येच दिले जाते.
कोरोना विषाणूच्या वैश्विक महामारीच्या या काळात पवित्र रमजान महिन्यात श्रद्धावंतांनी उपवास, नमाज, तरावीह ही आपापल्या घरीच करावे जेणेकरून कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये. केंद्र व राज्य शासनाचे आदेश व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून शासनाला सहकार्य करावे. अखिल मानवजातीला या महाभयंकर आजारापासून ईश्वर मुक्त करेल.
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, ‘जर कुणी तुमच्याजवळ एखादी बातमी घेऊन आला तर तिची चौकशी करा. सत्यता पडताळा. अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्या मानवबंधूचे कोणत्याही प्रकारे नुकसान करू नका. कुणाचीही बदनामी करू नका. इतरांचे नुकसान करणारी व्यक्ती ईश्वराला अजिबात आवडत नाही.’
अखिल मानवजातीला ईश्वर कोरोनामुक्त करो, हीच प्रार्थना!

-जमीर नारदेकर,  
कसबे डिग्रज, (जि. सांगली)
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget