Halloween Costume ideas 2015

गोष्टी गावाकडील वदता मी गड्या रे...!

"शहर जाने वाली हर सड़क
मुड़ गई गाँव की तरफ
और शहर को गुमां था
अपनी उंची उंची इमारतों पर।""

आज कोरोनाच्या भयानं लोकं गावाकडे निघाली आहेत. भारत गावांचा देश आहे आणि गावांना भारताचा आत्मा म्हंटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. शरीर कितीही सुदृढ असलं तरी त्या शरीरात आत्मा नसेल तर त्या शरीराला अर्थ नसतो. तसे देशातून गाव वजा केलं तर खाण्यापिण्याचे वांदे होेतील, कारण गावात उभ्या जगाचा पोशिंदा या देशासाठी रात्रंदिस राबतोय तो म्हणजे शेतकरी. आज मात्र एक गोष्ट कळाली की शहरात सुविधा आहेत सुख नाही. गावात सुख आहे सुविधा जेमतेम आहेत. जर शहरात सुख-सुविधा असत्या तर माणसांच्या जत्थ्यांची ओढ गावाकडे नसती. आज शहर बिमार आहे व गाव राबतंय.
आपण सर्व आज संक्रमणाच्या काळात वावरत आहोत. आपल्या देशाचा जर इतिहास पाठीमागे वळून पाहिला तर आपल्या देशाचा भूतकाळ फार खडतर होता. उद्याच्या भविष्यात काय वाढून ठेवलंय याची कल्पना आपण करू शकत नाही. भयाच्या गडद अंधारात देश बुडालाय. आपण काय कमवलं काय गमवलं तसेच उद्याची स्वप्नं पाहाण्यापेक्षा आज आपण कसं जगू शकतो, याचा विचार जनता करतेय. त्यामुळे वर्तमानाला प्रत्येक क्षण आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याला आपण खबरदारीनं सामोरं गेलो तर शासन आपली जबाबदारी घ्यायाला तयार आहे व आपली भूमिका ते चांगल्या पध्दतीने पार पाडतंय.
""इंसान की इंसानियत उस वक्त खत्म हो जाती है
जब इसे दुसरों के दु:ख पर हँसी आने लगे।""
माणूसपण पांगत चाललंय. महानगरात लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसते, त्यात मात्र दर्दी दिसत नाही. माणूस आपल्या संकुचित विश्वात वावरतोय. स्वत:च्या दु:खाची जाणीव होणं हे जिवंत असण्याचं लक्षण आहे. इतरांच्या दु:खाची जाणीव असणे, हे माणूस असल्याचं लक्षण आहे. कोरोनाच्या या कालखंडात आपण करूणा दाखवण्याचे दिवस आहेत. आपण माणूस आहोत हे सिद्ध करण्याची वेळ आलीय. लोक फक्त शरीरानं जवळ आहेत. मनानं कोसो दूर आहेत. लोक एकमेकांच्या हृदयांनी जवळ असली असती तर न कोणाबद्दल राग न द्वेष, सगळेच एकमेकांवर प्रेम करत असले असते. जीवनात कोणाला एकटेपणा जाणवला नसता. गर्दीतही माणूस एकटा राहिला नसता. आज लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दुरावा आलाय. लोकांच्या मनामध्ये एकमेकांना समजून घेणं तर दूरच एकमेकांचा द्वेष कसा करावा हाच विचार असतो.
""कोई ऐसा सॅनिटायजर भी बनाओ... जिससे
मन का मैल और दिल की नफरत भी धूल जाय
आखिर कब तक हम जात-पात में उलझे रहेंगे।""
अशा या भीतीच्या कालावधीत काही पुढारी लोकं आपली राजकारणाची वांगी भाजताना दिसताहेत, ही खेदजनक बाब होय. इतकं चिल्लर व खिल्लर खालच्या पातळीवरील राजकारण की बोलता सोय नाही. परंतु असल्या राजकारणाचा रिपोर्ट निगेटिव्हच येतो, हे मात्र नक्की!
रोग जेव्हा येतो तो कोणता देश, धर्म, जात, पंथ वा पक्ष पाहात नाही. त्याच्याकडे कोणताच भेद नाही. आज संपूर्ण जग हे कोरोनाशी लढतंय. भारतात मात्र या विषाणूला धार्मिक रंग देण्यात आलाय. कोरोनापेक्षा धार्मिक विषाणूनं मोठ्या प्रमाणात थैमान घातलंय व त्याला आपल्या अंगाखांद्यावर खेळवण्याचा फाजीलपणा काही सांप्रदायिक मीडिया आणि सोशल मीडियावाल्यांनी केलाय. आपला टीआरपी कशी वाढविता येईल याची संधी त्यांनी सोडलेली नाही. जगण्याचं असं नैतिक भागभांडवल तयार करा की ज्यानं लोकांच्या चुली पेटतील, घरे नव्हे. कोरोनामुळे लॉकडाऊन झालेले लोक भाकरी कशी मिळेल या व्यथेत चिंतातूर झालेत, बेकारी वाढलीय, जगण्यामरण्याचे प्रश्न निर्माण झालेत. हे पण दाखवत चला की काही लोकांचा भाकरीचा प्रश्न सुटलेला नाही. प्रत्येक गोष्टीला धर्माशी जोडू नये. प्रत्येक व्यक्तीचा धर्म ही वैयक्तिक बाब आहे. त्याला सार्वजनिक करण्याची गरज नाही. लोकांना धर्म कळाला असता तर आज जगात शांतता नांदली असती.
सोशल मीडियावर विश्वास ठेवताना आपल्यात डोळसपणा असावा. आपण पाहिलंय की काही सोशल मीडियावरील अफवांमुळे देशात अराजकता निर्माण झालीय. जेवढा धोका कोरोना विषाणूमुळे वाढला नाही त्यापेक्षा अधिक प्रमाणात काही सोशल मीडियामुळे वाढलाय. सोशल मीडिया म्हणजे विष आहे आणि विषाला आपण जर अमृत म्हणून प्राशन केलं तर त्याचे परिणाम आज आपल्याला व उद्या येणा­या पिढीला भोगावे लागतील. त्यामुळे आपल्या धडावर आपलचं डोकं आहे का याचा विचार करावा.
अशा संक्रमणकाळात सोशल मीडियावरील भूलथापांना बळी न पडता डॉक्टर, पोलीस व प्रशासनाला मदत करावी. आपल्याला देशासाठी काय चांगलं करता येईल ते करावं.
आज आपण वृत्तवाहिन्या पाहात असताना कोणती वृत्तवाहिनी पाहावी व कोणती पाहू नये या संदर्भात आपल्या हातात रिमोट कंट्रोल असतो. मित्रांनो, तो रिमोट कंट्रोलसुद्धा आपला राहिला नाही. त्यांना ज्या पद्धतीनं दाखवयाचंय त्याच प्रकारच्या बातम्या प्रत्येक चॅनलवर असतात, काही अपवाद असू शकतात. त्यामुळे आपण जे पाहातो त्याच नजरेनं प्रत्येकाकडे पाहात असतो, त्यामुळे आपला मेंदू आपला राहात नाही. त्या वाहिन्यांप्रमाणे आपली विचारधारा बनत जाते. म्हणून या विश्वातून बाहेर या. जग फार सुंदर आहे. किती दिवस जातीधर्माच्या या बंदिस्त चौकटीत गुरफटून राहाणार. मानवतेशी नातं जोडा. एकमेकांशी संवाद साधा. संवाद हरपलाय. संवादातून सुखाचा आणि वैभावाचा जन्म होतो. देशात सुधारणा करण्यासाठी संवादाची सर्व दारं उघडी करावी लागतील. एकमेकांशी आपलेपणा ठेवावा लागेल. फेक न्यूज पसरविणा­या वृत्तवाहिन्या, फेसबूक, व्हाट्सअॅपच्या मायाजालातून बाहेर येऊ या. जवळच्यांशी संवाद साधू या. एकमेकांची काळजी घेऊ या. नातीगोती जपू या. यामुळे आहे त्या नात्यापेक्षा नवीन नात्यांचा शोध लागेल.
गावात आज कोरोनामुळे कामाची लगबग थंडावलीय. पारावर बसणारी मंडळी अचानक गायब झालीय. रोज ग्रामपंचायतीच्या ओट्यावर बसून गावगाड्यापासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणाचं गु­हाळ बंद झालंय. बेकारी वाढलीय. मजुरांच्या हाताला काम नाही, परंतु काही प्रमाणात गावात माणुसकी जिवंत आहे. गावात माणसं एकमेकांना समजून घेताना दिसतात. काही टवाळखोर असतात त्याकडे प्रत्येक जण दुर्लक्ष करत असतो. शासनाचे सोशल डिस्टनिं्सगचे नियम पाळण्याचा काटेकोरपणा ग्रामीण जनतेत आढळतो पण तेच चित्र शहरात पाहायला मिळत नाही व काही मोकाट लोकं शहरात व ग्रामीण भागात फिरताना दिसतात. त्यामुळे इतर लोकं अडचणीत येऊ शकतात.
कोरोनाला गावात व शहरात आजार म्हणून न पाहाता दोष म्हणून पाहिलं जाऊ लागलंय. त्यामुळे सामाजिक दूरी म्हणण्यापेक्षा दरी वाढतेय. साहजिक या आजारामुळे प्रत्येक माणून धास्तावलाय. आता गावात माणसामाणसांमध्ये अंतर वाढतंय. त्यात पुन्हा सोशल मीडियाची भर. प्रत्येक माणूस दुस­याकडे संशयाच्या नजरेनं पाहू लागलाय. हे सर्व चित्र का बदललं? याचं उत्तर वृत्तवाहिन्याच्या मानसिकतेत आहे. काही वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून अफवा पसरविल्या गेल्या, त्यात अनेक जण शिकार झालेले दिसतात.
जेव्हा जेव्हा माणसावर संकटं येतात, तेव्हा त्याला गावच आठवतो व गावच मदतीला धावून येतो. आज संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. प्रत्येकाची ओढ गावाकडे जाण्याची आहे. निसर्गाने आपली खरी जागा आपल्याला दाखवून दिलीय. शहरानं त्याला रोजगार, नोकरी दिली व समृध्दता दिली परंतु संकटाच्या वेळी त्याच शहरानंं त्याला त्याची जागा दाखवून दिलीय. अशा संकटाच्या काळात प्रत्येकाला आपला गाव साद घालतोय की माझ्या लेकरांनो, माझ्याकडे या!
प्रत्येक व्यक्तीला जन्मभूमी प्रिय असते. कारण त्या सुपीक भूमीत आपल्या बापलणीच्या आठवणींचा मळा फुललेला असतो. तिथं आपल्या बापजाद्यांच्या कित्येक पिढ्यांचा वसा मुरलेला असतो. त्या मातीत प्रेमाचा सुगंध असतो. परकेपणाचा लवलेश जाणवत नाही. म्हणून जेव्हा जेव्हा संकटं येतात तेव्हा ती माती पुन्हा नाती जपण्यासाठी बोलवत असते. परंतु जो व्यक्ती शिकला सवरला उद्योगधंदा, व्यवसाय, नोकरीमुळे समृद्ध झाला त्याला गावात दादा, भाऊ, तात्या, अण्णा, आबा म्हणून त्याची वेगळी ओळख असते. त्यामुळे त्यानं अंतर्मुख होऊन आपल्या काळजावर हात ठेवून विचार करावा की गावानं आपल्याला मानसन्मान दिला तर आपण गावाला काय दिलं? यावर सजग विचार करावा. असे समृद्ध नागरिक प्रत्येक गावात दोन टक्के असतात. माझ्या मते दोन टक्केच मदत गावाच्या विकासासाठी तुम्ही हातभार लावला व पुढे सरसावला तर गावाचा चेहरामोहरा बदलू शकतो.
संकटकाळात एकमेकांच्या मदतीला धावून जाणं हे आपल्याला शिकवलेलं आहे. त्यावर आचरण करावं. सोशल मीडियांच्या माध्यमातून गावाचे वारे फितूर होऊ देऊ नये. सौहार्दाचं वातावरण गावात आहे तसेच कसं टिकून राहील याची काळजी घ्या.
निसर्गाने आपली परीक्षा घेण्याचं ठरवलं आहे. त्यावर आपण खरे उतरावे. जातीपातीच्या कृत्रिम भेदातून बाहेर या. याचं अप्रतिम उदाहरण म्हणून आपण आपल्या गावाकडे बोट दाखवतो. कोरोनापासून आपण काही तरी शिकलं पाहिजे. नाती जपली पाहिजेत. आता आपणास माणुसकी दाखविण्याची वेळ आलीय. काही पुण्य कमवा, गरीब लाचारांना मदत करा. एकमेकांबरोबरचे वाद, पदाचा नि प्रतिष्ठेचा बेगडी अभिमान झटकून टाका. मनसोक्त जगा. उद्याचं उद्या पाहा, आजचा क्षण महत्त्वाचा आहे. हे उद्दिष्ट समोर ठेवून गावात लोकं मनमुराद जीवन जगतात. गावानं आपल्या समोर माणुसकीचा परिपाठ ठेवलाय. गावात दान देण्याची प्रथा आहे. जो तो आपल्या परिनं देत असतो. गावात माझी माय सुपानं दाणं देते, भुकेलेल्याला अन्न देते, तहानलेल्या पाणी देते, आपल्या ताटातला घास देते परंतु तिनं कधी सेल्फी काढली नाही. तर शहरात एक व्यक्ती एक केळी देतो व फोटो काढतो, त्याने जणू सर्व प्रॉपर्टीच दान केली. हे शहराचं व गावातील अंतर असतं. माणुसकीचं व आपलेपणाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून जग हे भारतातील गावाकडे पाहातो म्हणून प्रत्येकाच्या मुखात एकच वाक्य असते-
मेरा गाँव मेरा देश!

-प्रा. डॉ. आरिफ ताजुद्दीन शेख, औरंगाबाद
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget