Halloween Costume ideas 2015

कोरोनानंतरची जागतिक व्यवस्था

कोई तो जुर्म था जिसमें सब मुलव्विस थे
तभी तो हर शख्स मुंह छुपाये फिरता है
जगाने आपली लय सोडली होती, अन्याय वाढला होता, विषमता वाढली होती, अमेरिका आणि त्याचे सहकारी राष्ट्र मस्तवाल हत्तींच्या झुंडीप्रमाणे एकानंतर एक राष्ट्र बेचिराख करीत सुटले होते. त्यांना रोखणे तर दूरची गोष्ट बाकींची राष्ट्रे एक तर त्यांची साथ देत होती किंवा गप्प होती. संयुक्त राष्ट्र संघही त्यांच्यासमोर निष्प्रभ झाले होते. पर्यावरणाची अपरिमित हानी होत होती. त्याची कोणाला परवा नव्हती. अनैतिकतेचा उत्कर्ष बिंदू कुठल्याही एककामध्ये मावत नव्हता. स्त्रीच्या अवहेलनेने सार्‍या मर्यादा ओलांडल्या होत्या. रोज बलात्कार होत होते. तरूण पीढि उच्छश्रृंखल झाली होती. लग्नाची गरज संपली होती. कुटुंब व्यवस्था विस्कळीत झाली होती. दारू आणि ड्रग्जनी जगातल्या जवळ-जवळ प्रत्येक शहराचा ताबा घेतला होता. मनोरंजनाच्या नावाखाली अश्‍लिलतेचा नंगानाच सुरू होता. वैद्यकीय क्षेत्रानेही अविश्‍वसनीय अशी झेप घेतली होती. श्रीमंत लोकांना सर्वप्रकारच्या वैद्यकीय सुविधा प्राप्त होत्या तर त्या गरीबांच्या कुवतीबाहेर गेल्या होत्या. शिक्षणाचा बोजवारा उडाला होता. विद्यापीठे शिक्षणेत्तर कामाचे अड्डे झाले होते. मीडियाने चव सोडली होती. कृषी क्षेत्राची अवनती पहावत नव्हती. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे बातमीमुल्य हरवले होते. व्याजाचा विळखा गरीबांच्या गळ्याभोवती आवळला जात होता. काही मुठभर लोकांनी जगाला वेठीस धरले होते. त्यांची प्रगती डोळे दिपवणारी होती. त्यांनी जगाला एवढी गती दिली होती की, अनेक घटकं मागे पडत चालली होती याची त्यांना तमा नव्हती. जे त्या गतिशी लय मिळवू शकत नव्हते ते वृद्धाश्रमात पाठविले जात होते.
    प्रत्येकाची जणू खात्रीच झाली होती की, ”़जमाने की इस रफ्तार को रोकना मुश्किल ही नहीं नामुम्कीन भी है” पण तेवढ्यात चीनच्या एका अपरिचित अशा वुहान नावाच्या शहरामधून एक असा व्हायरस, जो डोळ्याने दिसत सुद्धा नव्हता पसरल्याची बातमी आली. सुरूवातीला वेगवान जगाला त्याची दखल घेण्याचीही गरज वाटली नाही. पण मार्च उजाडला आणि वेगवान जगाच्या रथाच्या चाकामध्ये कोणीतरी अचानक सब्बल घालावा आणि ते चाक कडाड ऽकट ऽकट ऽ असे आवाज करून वाकडे तिकडे होवून थांबावे असे झाले. अवघ्या दोन महिन्यात दोन लाखांपेक्षा जास्त माणसं मेली. 30 लाखांपेक्षा जास्त रूग्णालयात गेली. बाकी राहिलेली माणसं घरात कैद झाली. माणसं घरात कैद झालेली पाहून जनावरांना कोण आनंद झाला. मोर रस्त्यावर उतरून थुईथुई नाचू लागले. आता जगाला कोविड-19 ने आपल्या मगरमिठीत घेतले होते. आता ही मिठी कधी सैल होईल व जगाची गती पुन्हा पूर्ववत कधी होईल, हे कोणालाही सांगता येण्यासारखे नाही. जेव्हा कधी जग पूर्ववत होईल तेव्हा सर्व गोष्टी बदललेल्या असतील एवढे मात्र नक्की. आजपर्यंत जगाची मांडणी नोहा (नूह अलै.) च्या जगबुडीच्या पूर्वीचे जग व नोहाच्या नंतरचे जग अशी केली जात होती. आता जगाची नव्याने मांडणी कोविड-19 पूर्वीचे जग आणि कोविड-19 नंतरचे जग अशी होईल. कोविड-19 चे सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे याचा फटका जगाचे नेतृत्व करणार्‍या राष्ट्रांना सर्वाधिक बसला. युरोप आणि अमेरिकेची अवस्था, ”साला एक व्हायरस कई देशों को भिकारी बना देता है” अशी झाली. अमेरिकेसारख्या राष्ट्रावर भारताकडे औषधांची भीक मागण्याची वेळ आली.
    एकदा का कोरोना संपला की, प्रत्येक देशाला आणि समाजाला काय गमावले याचा तटस्थपणे हिशोब करावा लागेल. तेव्हा जग दोन विभागात विभागले जाईल. काहीच्या लक्षात येईल की कोविडने त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा दिली आहे तर काहीच्या लक्षात येईल की, ही आत्मचिंतन करावयाची वेळ आहे आणि ते चिंतन करायला सुरूवात करतील. दोन्ही गटातील बहुतेक माणसांना नैतिकता व माणुसकीचा अर्थ कळेल व त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल झाल्याशिवाय राहणार नाहीत. मानवी मुल्यांची आणि पर्यावरणाची हानी करणार्‍यांना गतीपेक्षा मानवी मुल्यांची जोपासणा करत जगाला पुढे नेण्याची गरज भासू लागेल. पर्यावरणाकडे लक्ष देण्याची जाणीव लोकांमध्ये निर्माण होईल आणि एका नव्या जगाची सुरूवात होईल. ज्यांची मनुष्यहानी झाली त्यांच्या वारसांच्या लक्षात येईल की, जगाच्या गतीवर त्यांचा जो विश्‍वास होता तो किती फोल होता? प्रत्येक देशाला, समाजाला भविष्यातील आपल्या वाटचालीची आखणी नव्याने करावी लागेल. व्याजाधारित भांडवलशाही अर्थव्यवस्था हीच कल्याणकारी अर्थव्यवस्था असल्याची शेखी मिरविणार्‍या राष्ट्रांना आपणच ’सर्वश्रेष्ठ‘ आहोत, या मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल आणि हीच नेमकी वेळ असेल, जेव्हा जगाला नवीन दिशा देण्याची जबाबदारी प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्या अनुयायांच्या खांद्यावर येऊन पडल्याची त्यांना नव्याने जाणीव होईल.
    व्याजयुक्त अर्थव्यवस्था कशी समाजघातकी आहे व व्याजमुक्त अर्थव्यवस्था कशी समाजहिताची आहे, हे जगाला समजून सांगावे लागेल.त्या दिशेने नवीन अर्थव्यवस्थेची उभारणी करण्याचे आवाहन 57 मुस्लिम राष्ट्रांना स्वीकारावे लागेल.
    जागतिक महासत्ता म्हणून मिरविणार्‍या अमेरिकेला एका सुक्ष्म व्हायरसने कसे पछाडले याच्या कथा लोक येत्या शंभर वर्षापर्यंत नवीन पीढिला सांगत राहतील. अमेरिका नावाची महासत्ता इतकी हतबल झाली होती की तिचा आर्थिक डोलारा एका महिन्यात कोसळून पडला व कोट्यावधी लोक बेरोजगार झाले. अन्नाच्या पाकीटांसाठी हजारोंच्या रांगा लागल्या. हे अजबच म्हणावे लागेल. जी गत अमेरिकेची झाली तीच सगळ्या जगाची झाली. भारताचे 5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न जे फेब्रुवारीमधील अर्थसंकल्पात दाखवले गेले होते ते किती चुकीचे होते, हे अवघ्या एका महिन्यात म्हणजे मार्चमध्ये कर्मचार्‍यांच्या वेतन कपात करण्यापर्यंतची पाळी आल्याने लक्षात आले. थोडक्यात भांडवलशाही अर्थव्यवस्था ही वरून जरी भक्कम वाटत असली तरी तो फक्त देखावा असतो, आतून ती पोकळ असते हे वास्तव कोविड-19 ने जगासमोर आणले आहे.
    भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील तोटे
    या व्यवस्थेतील सर्वात मोठा तोटा विषमता आहे. या व्यवस्थेमध्ये मुठभर श्रीमंत लोकांना आपले आर्थिक साम्राज्य उभारण्याची संधी असते. बाकीच्यांना फक्त कामगार म्हणून काम करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यातही शासन किंवा श्रीमंत व्यक्ती यांच्यापैकी कोणीही त्या लोकांची जबाबदारी घेण्यास तयार नसतात जे काम करण्यासाठी लायक असतांनासुद्धा त्यांना काम मिळत नाही. कुठल्याही देशात हा वर्ग फार मोठा असतो. 23 मार्चला लॉकडाऊन घोषित होताच याची प्रचिती आपल्या देशातही आली. लाखो लोक रस्त्यावर उतरून वेड्यासारखे आपल्या मूळ गावाकडे परतण्यासाठी पायी निघाले. अंतराची ही त्यांनी तमा बाळगली नाही. कधी काळी मुहम्मद तुघलकने तुघलकी फरमान काढून दिल्लीच्या जनतेला दौलताबादला कुच करण्याचा आदेश दिला होता, असे म्हणतात व त्या आदेशाचे पालन करतांना अनेक लोक पायी चालून मृत्यूमुखी पडले होते, असेही म्हटले जाते. अगदी तीच स्थिती 23 मार्चनंतर आपल्या देशात लॉकडाऊनच्या घोषनेनंतर निर्माण झाल्याचे याची देही याची डोळा पहावे लागले.
    कोरोनानिमित्त दिशाहीन भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या मर्यादा उघड पडलेल्या आहेत. एवढेच नव्हे तर दिशाहीन समाजाचे किती वाईट परिणाम होऊ शकतात, हे ही कोविड-19 निमित्ताने जगाच्या लक्षात आलेले आहे. या दोन्ही समस्यांवर उपाय फक्त कुरआनमध्ये आहे. गरज फक्त स्वत: कुरआनमधील संदेशाला समजून घेऊन जगापर्यंत पोहोचविण्याची आहे. ही महत्त्वपूर्ण जबाबदारी जागतिक मुस्लिम समाजावर येऊन पडलेली आहे. याची जाणीव मुस्लिम समाजामध्ये निर्माण होण्याची गरज आहे. शेवटी अल्लाहकडे प्रार्थना करतो की, ऐ अल्लाह! ही जाणीव आमच्यामध्ये निर्माण कर आणि दिशाहीन जगाला दिशा देण्याची समज व शक्ती दे. तसेच सर्व मानव समाजाला  तुझ्या या संदेशाला समजून घेण्याची शक्ती दे. (आमीन.)

- एम.आर.शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget