Halloween Costume ideas 2015

ठोस निर्णय घेण्याची वेळ

कोरोना थांबता थांबेना; शिथिलतेचा गैरफायदा : 17 मे नंतरचे चित्र स्पष्ट करा : सोनिया गांधी

कोरोनामुळे देश गेल्या 40 दिवसांपासून लॉकडाउन आहे. या कालावधीत देशाचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आदी क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले आहे. सद्याच्या स्थितीत देशाच्या जीडीपी 4.8 टक्क्यांनी घसरेल असा अंदाज युएनच्या अहवालात नमूद करण्यात आला आहे. ज्याचा गंंभीर परिणाम होणार असल्याचेही त्यात म्हटले आहे. त्यामुळे 17 मे नंतर देशातील परिस्थिती सामान्य करायची असेल तर केंद्र सरकारला ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा देश रसातळाला जाईल, असा अंदाज अर्थतज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्याची बैठक बोलाविली. यावेळी त्यांनी केंद्रसरकारवर टिकास्त्र सोडत 17 मे नंतरचे चित्र प्रधानमंत्री मोदी यांनी स्पष्ट करावे, असे आवाहन केले.
    लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्पा 4 मे पासून सुरू झाला आहे. या फेजमध्ये रेड झोन वगळता आँरेज आणि ग्रीन झोनमध्ये आस्थापने सुरू करण्यात आली. हॉटेल्स, शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे वगळता इतरांना कमी अधिक प्रमाणात सूट देण्यात आली आहे. 4 मे रोजी आस्थापने उघडणार असे कळाल्यानंतर रस्त्यावर नागरिकांची मोठी वर्दळ वाढली. आश्‍चर्य तर तेव्हा झाले जेव्हा लोक दारूच्या दुकानांसमोर रांगा लावून दारू घेऊ लागले. ते ही भर उन्हात. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसला. दारूंच्या दुकानांसमोरची मद्यपींची झुंड पाहून कोरोना संपला की काय, अशी स्थिती वाटू लागली. पोलिसांनी कमी अधिक प्रमाणात बळाचा वापर करून मद्यपिंना ताळ्यावर आणण्याचे काम केले मात्र काहीजण मार खावून रांगेतच थांबल्याचे दृश्य राज्यात ठिकठिकाणी पहायला मिळाले. त्यामुळे काही ठिकाणी मद्यविक्री बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी घेतला.
40 दिवसांपासून घरात कोंडमारा झाल्याने अनेकजण खास सफरीसाठी घराबाहेर पडले. त्यामुळे बाजारात गरजूंपेक्षा बघ्यांचीच गर्दी झाली होती. या कारणास्तव लॉकडाऊनची शिथिलता अंगलट येते की काय? अशी स्थिती शासन, प्रशासनाची झाली.
    कोविड -19 चे थैमान जगभर सुरूच आहे. जगभरात बुधवारपर्यंत जवळपास 37 लाख 10 हजार कोरोनाबाधित रूग्ण आढळले. त्यातील 2 लाख 56 हजार 556 जणांचा मृत्यू झाला. 12 लाख 28 हजार 106 बरे झाले. आज या क्षणापर्यंत देशात 49 हजार 400 कोरोनाबाधित आहेत. 1693 जणांचा मृत्यू झाला असून, 14 हजार 142 बरे झाले आहेत. महाराष्ट्रात 15 हजार 525 कोरोनाबाधित आहेत तर 617 जणांचा मृत्यू झाला आहे. देशाची अर्थव्यवस्था लॉकडाऊनच्या आधीच आयसीयूत गेली होती. त्यामुळे लाखोंवर बेरोजगारांची संख्या वाढली होती. उद्योगधंदे बंद पडू लागले होते. अशातच 23 मार्च पासून सुरू झालेल्या लॉकडाऊनने तर बेरोजगारांची संख्या कोटींवर जाऊन धडकली. ज्यांचे हातावरचे पोट आहे ते तर चक्क पिळवटून गेले.
    भारतात एका अंदाजानुसार 200 ते 300 रूपयांवर दिवसभर काम करणार्‍यांची संख्या 46 टक्क्यांच्या जवळपास आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये जवळपास अर्धा भारत बेरोजगार झाला. तरी परंतु, नागरिकांनी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला साद देत जीवनमरणाच्या प्रश्‍नावर साथ दिली. मात्र जसजसे दिवस वाढू लागले तशी-तशी लोकांची मानसिकता खराब होऊ लागली. नवरा-बायकोचे भांडण वाढू लागले, कुटुंब तुटू लागली, माणुसकीची धार बोथट होऊ लागली, स्वार्थ वाढू लागला, मना-मनात भेदाभेद निर्माण होऊ लागला.
    लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळताच एका दिवसात देशात 3 हजार 900 रूग्ण वाढले. त्यामुळे लॉकडाऊन उठविणे किती धोक्याचे आहे जर आरोग्याच्या पुरेशा व्यवस्था केल्या नाहीत तर हे दिसून आले.
    17 मे नंतर जर लॉकडाऊनची स्थिती कायम राहत गेली तर देशाची परिस्थिती हाताबाहेर जाण्याची दाट शक्यता अभ्यासक वर्तवित आहेत. जीडीपीचा दर -1 मध्ये जाईल असे वर्तविले जात आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा तगडी करण्यापलिकडे शासनाकडे सध्या पर्याय नाही. लॉकडाऊन पूर्णत: उठवून, कामकाज सुरळीत करणे आजच्या परिस्थितीत गरजेचे आहे. नागरिकांनी स्वत:हून मात्र फिजिकल डिस्टन्स आणि प्रतिबंधात्मक उपाय जर केले नाही तर कोरोनाला हरविणे कठीण आहे. 
    काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 17 मे नंतर काय आणि कशी वाटचाल असणार? 17 मे नंतर लॉकडाऊनबाबत मोदी सरकारची काय रणनीती आहे? अशी विचारणा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारकडे केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कोरोना आणि लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी बुधवारी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या बैठकीमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.  
    यावेळी काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही आपली मते मांडली. कोरोनाचा सामना करत असताना वयस्कर, मधुमेह आणि हृदयविकार असलेल्या व्यक्तींची काळजी घेणेही गरजेचे आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. तर माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी राज्यांच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली. कोरोनामुळे राज्यांसमोरील आर्थिक संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. तसेच या परिस्थितीतीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडूनही कुठल्याही प्रकारची मदत उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. या बैठकीला उपस्थित असलेल्या राजस्थान, पंजाब, छत्तीसगड आणि पुदुचेरीच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारने राज्यांना मदत पॅकेज देण्याची मागणी केली.  ‘ जोपर्यंत व्यापक मदत पॅकेज दिले जात नाही, तोपर्यंत राज्य आणि देश कसा चालेल. आम्ही 10 हजार कोटींचा महसूल गमावला आहे. राज्य सरकारांना मदतीबाबत पंतप्रधानांना वारंवार विनंती केली. पण पंतप्रधानांनी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सांगितले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनीही केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘सोनियाजी म्हणतात त्याप्रमाणे लॉकडाऊन 17 मे नंतर काय? सरकारकडे पुढच्या परिस्थितीबाबत काय योजना आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यानंतरच्या धोरणाबाबत माहिती असले पाहिजे.’
    दरम्यान, या बैठकीस उपस्थित असलेल्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारच्या दृष्टीकोनावर टीका केली आहे. तर राज्याला गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितले. तर पंजाबप्रमाणेच पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री नारायणसामी यांनी कोरोनाच्या झोननुसार विभागणीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. एकंदर केंद्र सरकारच्या हाताबाहेर कोरोनाची परिस्थिती जात असल्याचे चित्र आहे. येणारा काळच यश आणि अपयश ठरविल.
    देशात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर परेदशातील नागरिकांना आपल्या देशात आणण्यासाठी सर्वसुविधा प्रारंभी उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र देशांतर्गत मजूर आपापल्या गावी जाण्यासाठी तरसत होते. सर्व वाहने बंद होती. त्यासाठी काही लोक आपल्या गावी पायी निघाले. ज्यामध्ये लहान मुले, वृद्ध, महिला मजुरांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. काही लोक तर जीवनावश्यक वस्तू वाहतूक करणार्‍यां वाहनात बसून प्रवास करताना आढळून आले तेही दाटीवाटीने.  मध्यप्रदेशच्या सीमेवर तर कहर झाला. पोलिसांना एका सीमेंटच्या मिस्क्सरमधून 18 मजूर जीव मुठीत धरून प्रवास करताना मिळून आले. यामुळे सरकारची गरीब व श्रीमंताकडे बघण्याचा दृष्टीकोण स्पष्ट दिसून आला. आजही हजारो मजूर आपल्या गावी जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे अनेकजण गोंधळात आहेत. सरकार सध्या गाड्या सोडून नागरिकांना आपल्या गावी पाठविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र आतापर्यंत भरपूर फरपट झाली. तूर्तास मात्र नागरिकांनी स्वत:ची आणि इतरांची काळजी घेणे आवश्यक आहे. माणुसकीचा झरा आटता कामा नये, यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.

- बशीर शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget