Halloween Costume ideas 2015

अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(६९) त्याच्या हिशोबातील कोणत्याही गोष्टीची जबाबदारी पापभीरू लोकांवर नाही, परंतु त्यांना उपदेश करणे तुमचे कर्तव्य आहे कदाचित ते दुर्वर्तनापासून वाचू शकतील.४५
(७०) सोडा त्या लोकांना ज्यांनी आपल्या धर्माला खेळ व तमाशा बनवून टाकले आहे आणि ज्यांना ऐहिक जीवनाने भुलविले आहे. होय, त्यांना हा कुरआन ऐकवून उपदेश व ताकीद देत  राहा की एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती स्वत: केलेल्या कृत्यांच्या आपत्तीत सापडू नये. आणि जर अशा अवस्थेत सापडली तर अल्लाहपासून वाचविणारा कोणी समर्थक व सहाय्यक  आणि कोणी बाजू मांडणारा तिच्यासाठी नसेल. आणि वाटेल ती वस्तू मोबदल्यात देऊन सुटू इच्छित असेल तर तीसुद्धा स्वीकारली जाणार नाही. कारण असे लोक तर स्वत: आपल्या  कर्माच्या परिणामस्वरूप पकडले जातील. त्यांना तर सत्याच्या आपल्या इन्काराच्या मोबदल्यात उकळते पाणी पिण्यास मिळेल आणि दु:खदायक प्रकोप भोगावयास मिळेल.
(७१) हे पैगंबर (स.)! त्यांना विचारा, काय आम्ही अल्लाहला सोडून त्यांचा धावा करावा जे आम्हाला लाभही पोहोचवू शकत नाहीत व नुकसानही नाही? आणि ज्याअर्थी अल्लाहने  आम्हाला सन्मार्ग दाखवून दिला आहे तर काय आम्ही परत पावली मागे फिरावे? काय आम्ही आपली दशा त्या माणसासारखी करून घ्यावी ज्याला शैतानांनी वाळवंटात भटकविले  असावे आणि तो हैराण व विक्षिप्तपणे फिरत असावा. वास्तविकपणे त्याचे सोबती त्याला हाका मारीत असतील की इकडे ये, हा सरळमार्ग अस्तित्वात आहे. सांगा, ‘‘वस्तुत: खरे  मार्गदर्शन तर केवळ अल्लाहचेच मार्गदर्शन आहे आणि त्याच्याकडून आम्हाला हा आदेश मिळाला आहे की सर्व सृष्टीच्या स्वामी पुढे आज्ञाधारक होऊन नतमस्तक व्हा.
(७२) नमाज प्रस्थापित करा आणि त्याच्या अवज्ञेपासून दूर राहा, त्याच्याकडेच तुम्ही एकत्र केले जाल.’’

४५) म्हणजे जे लोक अल्लाहच्या अवज्ञेपासून स्वत: दक्ष राहून काम करतात; अशा लोकांवर अवज्ञाकारींच्या कोणत्याच कृत्याची जबाबदारी नाही. मग ते का याला आपल्यावर अनिवार्य  करतात की या अवज्ञाकारींशी वादविवाद करून त्यांना अवश्य मान्य करायलाच लावू? त्यांच्या प्रत्येक निरर्थक आक्षेपांचे जरूर उत्तर देऊ व ते मान्य करीत नसतील तर त्यांना  काहीएक करून मान्य करायला लावू. यांचे कर्तव्य तर फक्त इतकेच आहे, की जे मार्गभ्रष्ट आढळतात त्यांना उपदेश द्यावा आणि सत्य त्यांच्यासमोर ठेवावे. यावर त्यांनी मान्य केले  नाही आणि भांडण-तंटे, वादविवाद आणि तर्कवितर्क करू लागले तर सत्यवादीचे हे काम नव्हे की त्यांच्याबरोबर बौद्धिक वादविवाद करण्यात आपला वेळ आणि सामर्थ्य व्यर्थ घालवावा.  मार्गभ्रष्ट लोकांच्या व्यतिरिक्त त्यांनी आपला वेळ आणि सामर्थ्य त्या लोकांच्या प्रशिक्षण व शिक्षण तसेच सुधारकार्यावर आणि उपदेश देण्यासाठी खर्च करावयास हवा जे स्वत: सत्यप्रिय आहेत.
४६) कुरआनमध्ये ही गोष्ट अनेकदा सांगण्यात आली आहे, की अल्लाहने जमीन व आकाशांना सत्याधिष्ठित निर्माण केले आहे. या कथनाचा अर्थ व्यापक आहे. याचा पहिला अर्थ  म्हणजे जमीन व आकाशांची निर्मिती फक्त मनोरंजनासाठी झालेली नाही, किंवा ही एखाद्या देवीदेवताची लीलासुद्धा नाही. हे एखाद्या लहान मुलाचे खेळणे नव्हे की ज्याच्याशी तो मन  रमण्यासाठी खेळत राहील आणि खेळता खेळता शेवटी तोडून देईन! वास्तविकपणे हे एक मोठे गंभीर निर्मितीकार्य आहे, ज्याला बुद्धीविवेकाच्या व तत्त्वदर्शितेच्या आधारावर निर्माण  केले आहे. एक महान उद्देश त्यात सामावलेला आहे आणि याचे एक युग संपल्यानंतर अनिवार्यत: निर्माणकर्ता त्या सर्व निर्मितीकार्याचा आढावा घेईल, जे या युगात केले गेले आणि  त्यांच्याच आधारावर पुढील युगाचा पाया ठेवील. कुरआनमध्ये हेच अशा पद्धतीने दुसरीकडे सांगितले, ``हे आमच्या पालनकर्त्या प्रभु! हे सर्व काही तू व्यर्थ निर्माण केले नाही.'' आणि  ``आम्ही जमीन व आकाशांना आणि त्यांना जे जमीन व आकाशांमध्ये आहेत, खेळ तमाशा म्हणून निर्माण केले नाही.'' तसेच ``तर काय तुम्ही समजून बसला आहात का आम्ही  तुम्हाला असेच निरर्थक जन्माला घातले आणि तुम्ही आमच्याकडे परत फिरविले जाणार नाहीत?''
दुसरा अर्थ हा आहे की अल्लाहने सृष्टीची ही संपूर्ण व्यवस्था सत्याच्या ठोस आधारशिलेवर स्थापित केली आहे. न्याय, तत्त्वदर्शिता, बुद्धीविवेक आणि सत्य नियमांवर याची प्रत्येक बाब  आधारित आहे. खरे तर या व्यवस्थेत असत्याचे मूळ रूजण्यास व त्याची वृध्दी होण्यास मुळीच वाव नाही. ही वेगळी गोष्ट आहे की अल्लाहने असत्यवादींना संधी द्यावी की ते जर  आपला खोटेपणा, अन्याय व असत्यतेला वृद्धिंगत करू इच्छित असतील तर आपल्यापरीने प्रयत्न करून पाहावा आणि शेवटच्या हिशोबात प्रत्येक असत्यवादी हे पाहील की त्याने या विषारी रोपांची शेती व सिंचन करण्यात जे अथक प्रयत्न केले होते ते सर्व व्यर्थ गेले. तिसरा अर्थ हा आहे की अल्लाहने या समस्त सृष्टीला सत्याधिष्ठित निर्माण केले आहे आणि  आपल्या व्यक्तिगत अधिकारातच तो सृष्टीवर शासन करीत आहे. त्याचा आदेश येथे यामुळे चालतो की तोच आपल्या निर्माण केलेल्या सृष्टीवर पूर्ण अधिकार बाळगून आहे. दुसऱ्यांचा  आदेश प्रत्यक्षात वरकरणी लागू होतांना दिसत ही असेल तरी त्यापासून धोका खाल्ला जाऊ नये. खरे तर दुसऱ्या कोणाचाच आदेश चालत नाही आणि भविष्यातही चालणार नाही कारण   सृष्टीच्या कोणत्याच वस्तूवर त्यांना अधिकार प्राप्त् नाही जेणेकरून तिच्यावर त्यांनी आपला हुकूम चालवावा.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget