भारत महासत्तेच्या जवळ पोहचला आहे. हा ट्रक आणि तीन चाकी गाडी त्याच दिशेने चालली आहे. आता थोडंच अंतर शिल्लक आहे.तीन चाकीवर झोपलेल आणि ट्रकवर वडिलांच्या सहाय्याने चढणार बाळ महासत्तेकडे कूच करणाऱ्या भारताच नेतृत्व करत आहेत. कारण आपण नेहमी म्हणतो आजची लहान मूलं ही उद्याच्या भारताचे भविष्य आहेत. भारताच भविष्य कोणत्या स्थितीत आहे हे स्पष्ट दिसत आहे. खरं तर या लोकांनी भारताला महासत्तेच्या दिशेने नेण्याऐवजी हिंदुस्थानला न्यायला हवं. कारण केंद्रातील सत्ताधाऱ्यांना तेच अपेक्षित आहे. भारताऐवजी एकदा का हिंदुस्थान महासत्ता झाला की मग या मजुरांना हजार, दोन हजार मैल चालावं लागणार नाही... रस्त्यावर कुटुंबासह झोपावं लागणार नाही... अन्न पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही... हतबल व्हावं लागणार नाही... रोजगार बुडणार नाही... ट्रेनखाली चिरडून मरावं लागणार नाही... रेल्वेच्या रुळावर झोपावं लागणार नाही... लाख मोलाचा जीव कवडी मोलात रुळावर टाकावा लागणार नाही... म्हाताऱ्या आईवडिलांना खांद्यावर घेऊन उन्हातून प्रवास करावा लागणार नाही... गरोदर महिलेच रस्त्यावर बाळंतपण करावं लागणार नाही... पोटाचा प्रश्न होता म्हणून मजूर शहरात आला... आता कारखानेच बंद झालेत... मग आता जीव राहील का याची शाश्वती नाही... पण या जिवापेक्षा इतर अनेक मुद्दे महत्त्वाचे आहेत... आता लॉकडाऊन विसरण्यासाठी दाऊद येईल... मशीदीचे मुद्दे येतील... दहशतवादाचे अर्थातच अल्पसंख्याकांच्या दहशतवादाचे मुद्दे येतील. नक्षलवाद्यांच काही शिल्लक असेल तर तेही येईल... ही तीन चाकी, हा ट्रक महासत्तेपर्यत पोहचयाच्या आत आपण या विषयावर चर्चा करू या. खूपच गरज वाटलीच तर या चिमुकल्यांना उठवू या. त्यांचा प्रवास मध्येच थांबवू या. महासत्ता होऊन कुणाचं भलं आहे? या मुलांना ही मग राम मंदिराच्या कामावर जुंपू या. मजुरांची कमतरता भासता कामा नये. भाजपच्या स्वप्नातील हिंदू राष्ट्र बनायला हवं. त्यातच सर्व काही आहे. हिंदू राष्ट्र बनलं असत तर हे प्रश्नच निर्माण झाले नसते. उत्तर प्रदेश, बिहार येथून मजुरांना दुसरीकडे जावं लागलं नसत. मग असा लॉकडाऊन झाल्यावर त्यांना हतबल व्हावं लागलं नसत. मजुरांच्या नोकरीपेक्षा, मजुरांच्या जिवापेक्षा, इथल्या उद्योगधंद्यापेक्षा, देशाच्या जीडीपीपेक्षा, भाजपचा अजेंडा महत्त्वाचा आहे.
- सुधाकर कश्यप
वरिष्ठ पत्रकार, मुंबई.
- सुधाकर कश्यप
वरिष्ठ पत्रकार, मुंबई.
Post a Comment