Halloween Costume ideas 2015

मीच मज राखण झालो....

मन वोळी मना। बुध्दी बुध्दी क्षण क्षणा।।१।।
मीच मज राखण झालो। ज्यांने तेथेचि धरिलो।।२।।
जे जे जेथे उठी। ते ते तया हातें खुंटी।।३।।
भांजणी खांजनी। तुका साक्ष उरला दोन्ही।।४।।
जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आपण स्वत:ची राखण स्वत:च कशी करावी, याचे मूर्तिमंत उदाहरण वरील अभंगात दिले आहे. सध्या आपल्या देशावर कोरोना विषाणूंचे  महाभयंकर संकट आ वासून उभे आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर संत तुकोबारायांचा वरील अभंग फार मार्गदर्शक ठरणारा आहे. रात्रंदिवस आपली राखण करायची असेल, तर आपले  मन आणि बुद्धी सावध असणे आवश्यक असते.
बाहेरून येऊन कुणी राखणं करीत नसते. स्वत:ची राखण स्वत:च सावधपणे करायची असते.शेतकरी पाखरांपासून, तसेच वन्यपशूंपासून आपल्या शेताची राखण करतो. त्याच पध्दतीने कोरोनाचे संकट आपल्या देशातून परतवून लावायचे असेल तर प्रत्येकांनी रात्रंदिवस सुरक्षितपणे घरातच थांबून आपण आपली राखण केली पाहिजे. प्रत्येकांने विविध प्रकारच्या  विकारांपासून, तसेच विघातक आचारविचारांपासून स्वत:च स्वत:चे रक्षण करणे आवश्यक आहे.
वरील अभंगात संत तुकाराम महाराजांनी आपण स्वत:ची राखण स्वत:च कशी करतोय, याचा जणू आलेखच रेखाटला आहे. ते म्हणतात, माझ्या मनात काही अनिष्ट, तसेच अनुचित  भाव उमटू लागले, तर ते दूर सारण्याचे काम माझे मनच करते. मनाला योग्य वळण लावण्याचे काम मनच करते.मन चंचल असते, ते जेव्हा सैरभैर होते, तेव्हा आपल्या बुद्धीला योग्य  त्या सूचना देऊन त्याला वळणावर आणण्याचे काम बुध्दीच करते. हे कार्य अधूनमधून करून चालत नाही, चुकून केंव्हा तरी केले तरी चालेल असे होत नाही, तर ते क्षणोक्षणी चालू  असते. याचा अर्थ प्रत्येक पावलावर मी सावध असतो. क्षणोक्षणी मी जागा असतो, दक्ष असतो. प्रत्येक कृती करताना विवेकाचा वापर करतो. सदैव जागरूक असतो. या पध्दतीने मी  स्वतःच स्वतःचा राखणदार झालो आहे. एखादा माणूस शेत-मळ्याची राखण करीत असताना कोणी तरी चोर वगैरे तेथे शिरला, तर तो त्याला तेथे जाग्यावरच पकडून धरतो, त्या  पध्दतीने स्वत: चे काही चुकल्याचे दिसल्यावर मी स्वतःच राखणदार बनून चुकणाऱ्या स्वतःला पकडण्याचे काम करतो.
मनामध्ये किंवा बुध्दीमध्ये ज्या ज्या वेळी काही तरी गैर अशी भावना व विचार यांचा उद्भवत होतो, त्या वेळी तिथल्या तिथे तो खुंटवून टाकतो. आपल्या अंतःकरणात जे काही चढ-  उतार (भांजणी-खांजनी) होतात, त्या सगळ्यांना स्वत: मीच साक्षीदार असतो. आपल्या आत खोलवर जे काही चाललेले असते, ते माझ्या नजरेतून सुटत नाही, त्याकडे मी बिलकूल कानाडोळा करत नाही. एखादे चुकार पाखरू शेतात घुसले, तरी शेतकऱ्यांच्या ते लगोलग लक्षात येते, त्यांच्या नजरेतून ते सुटत नाही, तसेच स्वत:च्या व्यक्तिमत्वात उठणारा प्रत्येक  तरंग आपल्याला दिसत असतो. त्याचे चांगले वाईट परिणाम काय होतील हे आपण तपासतो. त्यात काही विकारसदृश असेल, काही अनिष्ट तसेच विघातक असेल तर त्यांच्यापासून   स्वत:च्या निकोपपणाचे रक्षण करण्यासाठी आपण स्वत:चे राखणदार बनून स्वत: भोवती एक संरक्षक कवच ऊभा करतो.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉक डाऊन लागू केले आहे, प्रत्येकांने घरीच रहावे व सुरक्षित रहावे, असा संदेश विविध माध्यमांतून नागरिकांपर्यंत पोहोचवला जात आहे,  तरीही नागरिकांच्या मध्ये गांभीर्य दिसून येत नाही. लोकांना स्वत:च्या आरोग्याबद्दल सोडाच पण इतरांना संसर्ग होईल म्हणूनसुध्दा आपण प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन  करावे असे वाटत नाही. या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराजांच्या वरील अभंगात स्वत:च्या व देशाच्या ही हितासाठी आपण कसे स्वत:ला जपावे व सुरक्षित रहावे, या विषयावर  मार्गदर्शन केले आहे. जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या आकाशाला भिडण्या इतक्या उंचीच्या अभंगवाणी ची खरच आजच्या काळात ही गरज आहे,यात संदेह नाही.

– सुनीलकुमार सरनाईक
(मो.: ७०२८१५१३५२)
(लेखक भारत सरकारच्या वतीने स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित आहेत.)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget