Halloween Costume ideas 2015

मुस्लिमांनी नवीन प्रणाली आत्मसात करण्याची गरज?

USCIRF (अमेरिका) द्वारे नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालनुसार अल्पसंख्यकांच्या हक्कांसंदर्भात मोठे प्रश्नचनि्ह उभे केले असून भारताची TEAR 2 अर्थातच ‘विशेष चिंता असणारा देश’ असे संबोधले आहे. त्या निमित्ताने.....
आज, सर्व जग कोरोनाशी लढत असताना भारत हा एकमेव देश असेल जेथे कोरोनापेक्षा धार्मिक विषाणुंनी अधिक थैमान घातले आहे. मर्कजच्या घटनेने भारतात केवळ कोरोना तबलिक जमातीमुळेच फैलावला हे मीडियावाल्यांनी पद्धतशीर शहरीच नव्हे तर ग्रामीण भागापर्यंत पसरविले. आमचा खेड्यातील हिंदू-मुस्लिम जो क्षणात दुरावला गेला त्याची मने पुन्हा पूर्ववत होण्यास किती काळ लागेल? हे मात्र सांगणे आज मितीला अशक्यप्राय:च आहे.
मुस्लिमांसाठी मात्र येणारा काळ किती गंभीर असेल आणि त्यावर मुकाबला करण्यासाठी त्यांना सकारात्मक पद्धतीने पुढे यावेच लागेल. कोरोनाच्या काळात काही सकारात्मक घटना या मुस्लिमांकडून झालेल्या आहेत, त्यांना अल्प का असेना वेळोवेळी प्रसिद्धी मिळाली, हेही विसरून चालणार नाही.
सर्वप्रथम शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म अशा बाबींचा विचार करू या....

शॉर्ट टर्म इव्हेंट्स
आपल्या शेजारील / गावामधील मुस्लिमेतर जातीधर्मामधील अंत्ययात्रेसाठी सर्वप्रथम धावून जा.... त्यांना मदतीची अपेक्षा असल्यास ती पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारा. नुकतेच अंत्ययात्रेत मुस्लिम तरुण सहभागी होऊन पुढे आल्याचे सर्व माध्यम, सोशल मीडियाने कौतुक केल्याचे आपण पहिले असेल. त्यांनाही या मिळालेल्या अमाप प्रसिद्धीची कल्पना नसेल. त्यांच्या या कार्याची नोंद सर्व जगभराने क्षणात घेतली हे मात्र नवलच नव्हे का?
तसेच कर्नाटक येथील मंगलोर शहराजवळील अब्दुल रहमन गुद्दींनाबली या ५५ वर्षीय शेतमजुराने हजला जाण्यासाठी जमा केलेल्या पैश्यामधून चक्क कोरोनाच्या काळात ही पुंजी खेड्यातील गरजू गोरगरीबांना अन्नधान्याचे वाटप करून सत्कर्मी लावली आहे. किती हा उदात्तपणा... खरे तर हा हज त्यांचा न जाताच कबूल झाला, अन् पुण्य त्यांच्या पदरी. अर्थात हजसाठी जमा केलेला पैसा कोरोंनाच्या काळात दान करण्याचे सर्व माध्यमांनी तोंड भरून कौतुक केले. याचा अर्थ तुमच्या अद्वितीय कार्याची दखलही घेतली जाते.  मग तुम्ही मुस्लिम असला तरी?
रमजान व इतर काळातदेखील गोरगरीब त्यांचे अन्न-वस्त्र-रोजगार यासाठी जकातच्या माध्यमातून कायमस्वरूपी योजनेसाठी कटिबद्ध राहण्यासाठी मुस्लिम समाजाने क्रियाशील राहावे.
मदरशांकडे पाहाण्याचा दृष्टिकोन नेहमीच साशंकतेचा राहिला आहे. या मुलांना धार्मिक शिक्षणाबरोबर बाहेरील जसे की तांत्रिक, व्यवसायाभिमुख घडविले पाहिजे. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन बदलण्यास मोठा हातभार लागू शकेल. अन मदरशांतील ही मुले म्हणजे देवाघरची जणू फुले असा संदेश चोहोदिशांना जाऊ शकेल.  अन् बाहेरील वातावरणाचा त्यांना प्रत्यक्ष फायदा प्राप्त होऊ शकेल.
कुठलीही प्रसिद्धीची तमा न बाळगता मर्कज रिलिफ फंड, जमाअत ए इस्लामी हिंद या सामाजिक संघटनेने २० मार्च ते २० एप्रिल २०२० या एका महिन्यात तब्बल २३.७३ कोटींची (अन्न-धान्य, राशन, मास्क, सॅनिटायझर्स, आणि अर्थसाह्यच्या इ. स्वरूपात) मदत केली आहे. विशेष म्हणजे हे साह्य देशभरातील २५ राज्ये, शेकडो जिल्हे आणि हजारो गावापर्यंत पोहोचवले आहे. आपणही जकातच्या माध्यमातून मदत करण्याचा इरादा करू या आणि यातील काही रकमेचा- दानाचा उपयोग सुसज्ज, आधुनिक, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करता येऊ शकेल का?  यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू या रमजानबरोबरच इतरही ११ महिन्यांत मुस्लिम धनिकांनी जकातच्या २.५ टक्क्यांव्यतिरिक्त ऐपतीप्रमाणे रक्कम जमा केल्यास हा हॉस्पिटलचा इरादा पूर्णत्वास येण्यास फार वेळ लागणार नाही.

लाँग टर्म इव्हेंट्स
फावल्या वेळात सध्या लॉकडाऊन म्हणजे अभूतपूर्व संधीच चालून आल्यासारखी आहे- इतर धर्मांचे ग्रंथ- रामायण, महाभारत, बायबल- वाचन आणि सखोल ज्ञान प्राप्त करा. त्याचा ऐनवेळी भावी आयुष्यात केव्हाही उपयोग होऊ शकतो.
एका वर्षात किमान ६ ते ८ मुस्लिमेतर मित्र निस्वार्थी भावनेने जोडा. त्यांच्याशी महिन्यातून किमान एक वेळ भेट आणि कोणताही धार्मिक विषय न निवडता मनमोकळेपणाने चर्चा करा जसे की साहित्य, खेळ, रोजगार, शिक्षण एत्यादी आणि मैत्री वृद्धिंगत करत राहा. त्यांच्या अडीअडचणी अन् दु:खाच्या प्रसंगी धावून जा.
दबावगट निर्माण करा– प्रत्येक गावामध्ये सर्व क्षेत्रांतील अनुभवी, पारंगत जसे की शिक्षक, प्राचार्य, सामाजिक कार्यकर्ते, कॉर्पोरेट क्षेत्रातील वरिष्ट अधिकारी, उच्चशिक्षित युवावर्ग यांनी किमान महिन्यातून एकदा एकत्र येऊन वैचारिक मीटिंग पार पाडवी. एकत्र येणे शक्य नसल्यास झूम मीटिंग हा पर्याय उपलब्ध आहे, त्याचा जरूर उपयोग करावा. या दबावगटाने मशिदीतील धर्मगुरू आणि कार्यकारिणीशी विचारवनििमय करून चर्चा घडवून आणावी. बाहेरील जीवनातील एखादा सामाजिक उपक्रम किंवा समस्या या धर्मगुरूंना माहीत असतीलच असे नाही. अशा वेळेस समस्या आणि त्यवरील तोडगा याबाबत सकारात्मक चर्चा घडवून आणण्याची जबाबदारी आता बुद्धिजीवींवर येऊन ठेपली आहे. याबाबत एक सत्य घडलेली घटना नमूद करावीशी वाटते.
सुमारे १५ वर्षांपूर्वी १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २००५ दरम्यान प. महाराष्ट्र येथील सांगली हा पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यासाठी मी, जमात ए इस्लामी हिंद पुणे शाखेचे इम्तियाज शेख आणि प्रा. इलाही शेरकर भेट देण्यास गेलो असता मुस्लिम वस्तीत काही हिंदू धार्मिक संघटना मदत करत असल्याचे निदर्शनास आले. स्थानिक कार्यकर्त्यांकडे विचारणा केली असता काहींनी ही राजकीय बाब असल्याचे तर काहींनी स्वार्थ लपल्याचे स्पष्ट केले, पण त्या घडीला सदर बाब आम्हाला कौतुकाची वाटली,  भले काहीही स्वार्थ असेना. खण भाग, सांगलीमधील मशिदीतील मौलानांना भेटून तत्काल चर्चा करण्याचे ठरले. चर्चेपूर्वी असे ऐकिवात होते की ते कुणाचे ऐकून घेत नाहीत. आम्ही विचार केला काय होईल जास्तीतजास्त ते आमचे गाऱ्हाणे ऐकणार नाहीत. रात्री इशा नमाजनंतर आम्ही चौघे मौलानांना भेटलो. इम्तियाज सरांनी आमचा येण्याचा उद्देश आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे सविस्तर कथन केले. अन् काय आश्चर्य मौलनांनी मशिदीतील कार्यकारिणीला त्वरित बोलावले. अन् विचारले हे काय? सांगली शहर पाण्यात अन् तुम्ही कोणीही ब्र शब्द मला सांगितला नाही? कामाला लागा! लोकांना मदतीचे आवाहन करा! मशिदीच्या प्रवेशद्वाराजवळ लागलीच फलक लावण्यात आला. अन् काय आश्चर्य दुसऱ्याच दिवसी २ ट्रक कपडे, भांडी अन् रोकड जमा झाली. एवढे करून मौलाना थांबले नाहीत तर त्यांनी बजावले की या वस्तू अन् कपडे यावर हिंदू माता-भगनिींचाही तेवढाच अधिकार आहे. झाले! दुसऱ्या दिवसी हिंदू वस्तीत साडी–कपडे वाटप करण्यात आले. स्थानिक मीडियानेदेखील नोंद घेत पहिल्या पानावर प्रसिद्धी दिली. आम्ही ७ ऑगस्ट २००५ रोजी पुण्याला माघारी परतत असताना मौलानांना भेटण्यास गेलो असता या सर्व सत्कार्याचे श्रेय त्यांनी आम्हाला दिले आणि म्हणाले, ‘‘तुम्ही मला विचारलेच नसते तर मला कळाले नसते. अन् हे सत्कर्म घडलेच नसते. तुमच्यासारख्यांनी नेहमी बोलत राहा. आम्हाला जाब विचारा? शेवट जे काही घडणार ते अल्लाहच्या कृपेनेच.’’ एवढे बोलून त्यांनी आमच्यासाठी रात्री इशा नमाजनंतर जेवणाचे आमंत्रण दिले. किती हा मोठेपणा! आम्ही कृतकृत झालो. खरा खुलासा उलगडला प्रत्यक्ष भेटण्याने आणि स्पष्टपणा ठेवल्याने. ही छोटीशी बाबदेखील राष्ट्रीय एकत्मतेसाठी किती मोठी ठरू शकते, नाही का?

दृष्टिकोन बदला आणि नवीन प्रणाली आत्मसात करा
कार्पोरेट सेक्टरमध्ये एखादा गंभीर प्रश्न उद्भवला किंवा एकच समस्या वारंवार घडत असेल तर ‘८डी’ हे टेक्निक अवलंबिले जाते. यामध्ये वारंवार ‘का?’ हा प्रश्न विचारत समस्येच्या मुळापर्यंत जात नाही, जोपर्यंत संभाव्य उत्तर हाती लागत नाही. उदा. कोरोनाच्या निमित्ताने हिंदू फ्रूट स्टॉल उदयाला येत असून मुस्लिम फ्रूट विक्रेत्यांकडून न घेण्याचे फर्मान येत आहे. यावर मुस्लिमांनी लागलीच ही बाब गंभीर घेत जणू आता जीवन-मरण्याचा प्रश्न उद्भवणार की काय म्हणून एफआयआर देखील नोंदविला आहे. खरे तर मुस्लिम जेवढे रिऍक्ट होतील तेवढे त्यांना हवे आहे. अन् ही चाणक्य नीती आम्हास केव्हा उमजणार? मी लहानपणापासून पाहत आलो आहे बहुतांशी चिकन-मटण यांची दुकाने हलाल म्हणून मुस्लिम बांधवच चालवतात. तसेच हिंदूंच्या पूजेचे साहित्य, फळे-फुले विक्रेते मंडईजवळील बहुतांशी मुस्लिमच असतात. अन् हिंदू मोठ्या भावनेने खरेदी करतात. त्या वेळेस कुठलाही धर्म आड येत नाही, कारण एकमेकांवर असलेला परम-विश्वास! हा विश्वासच तुमचे जीवन फुलवितो. म्हणूनच हा विश्वास अधिक वृद्धिंगत करण्याची अन् तो कायम टिकवण्याची आज खऱ्या अर्थाने समाजाला गरज आहे.
कोरोनाचा सध्याचा आणि नंतरचा काळ मुस्लिमसाठी निश्चितच आव्हानात्मक असणार आहे. सतर्कपणा, सकारात्मकता, इतर समाजांशी जुळून घेण्याची आपली कार्यशैली, आपली बुद्धिमता आणि आपण त्यावर रिऍक्ट कसे होणार यावरच सर्व काही अवलंबून असणार, यात शंका नाही.
शेवटी एकच म्हणावेसे वाटते, साने गुरुजींनी म्हटले आहे~
खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे...

- अस्लम जमादार
९२२५६५६७६६

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget