Halloween Costume ideas 2015

रमजान जगण्याचा खरा मार्ग दाखवितो

Ramazan
रमजान महिना खर्‍या अर्थाने जगण्याचा मार्ग दाखवितो. याच महिन्यात कुरआनचे अवतरण झाले आणि रोजे अनिवार्य केले गेले. कुरआन ईमानधारकांसाठी अशी देणगी आहे, जी सत्याचा मार्ग दाखवितेे आणि खर्‍या यशस्वीतेकडे घेउन जाते. मानवकल्याणाचा हा उपहार आमच्यासाठी सदैव मार्गदर्शक आहे. त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी कुरआनला समजून वाचन केले तर आयुष्यात सर्वांगीण समृद्धी आल्याशिवाय राहत नाही.-------------
इस्लाम धर्माची ईमान, नमाज, रोजा, हज आणि जकात ही प्रमुख पंचतत्वे आहेत. यापैकी रमजानचे रोजे करून गोरगरीबांना जकातचे वाटप करणे, गरजूंची आपल्या आर्थिक क्षमतेनुसार मदत करणे आवश्यक आहे. रमजानचा महिना शांततेतचा, मिळकतीचा व बरकतचा (भरभराट) महिना म्हणून प्रसिद्ध आहे. महत्त्वाचे म्हणजे बंधुभाव, मांगल्य व मानवतेचा संदेशवाहक म्हणूनही पवित्र रमजानकडे पाहिले जाते. ईतर महिन्यांच्या तुलनेत रमजानमध्ये प्रत्येक सत्कर्माचे फळ सत्तर पटीने वाढवून दिले जाते. म्हणूनच जकातचे वाटप रमजानमध्येच आवर्जून केले जाते. समाजात आर्थिक समता, स्थैर्य रहावे व धनिकांना, श्रीमंतांना गरीबांविषयी आपुलकी निर्माण होऊन त्यांच्या दु:खाची सदैव जाणीव रहावी हा जकात अनिवार्य असण्यामागील मुख्य उद्देश आहे.
रमजानचे तीन भाग - कृपा, क्षमा आणि मोक्ष. या महिन्यात अल्लाहच्या कृपेचा व क्षमेचा झरा ओसंडून वाहतो. रमजानचे रोजे अनिवार्य आहेत. कुरआनमध्ये अल्लाह आपल्या अनुयायांना उद्देशून म्हणतो की, ” हे ईमानधारकानों!, विहित केले तुमच्यावर उपवार जसे विहित केले होते तुमच्या पूर्वीच्यांवर जेणेकरून तुम्ही धर्मपरायण व्हाल.” (कुरआन : सुरह बकरा 183).
रमजानमध्ये ईशआराधनेत व्यत्यय आणणार्‍या उपद्वव्यापी सैतानास कैद केले जाते. रोजा या आराधनेला धार्मिक महत्व असण्यासोबतच वैज्ञानिक महत्वदेखील प्राप्त आहे. म्हणूनच तरूण वर्ग देखील रमजानच्या रोजांचे पालन हिररीने करतात. काही ठिकाणी तर शारीरिक समतोल राखण्यासाठी मुस्लिमेत्तर बांधवदेखील रोजाचे पालन काटेकोरपणे करतात.
कोणतेही आदेश मग तो शासकीय असो वा धार्मिक जोपर्यंत त्याविषयी आवश्यक असणारी माहिती आपणांस मिळत नाही तोपर्यंत आपण त्या आदेशाची अचुकपणे अंमलबजावणी करू शकत नाही. तर मग रमजानच्या रोजांचे अचुकपणे पालन करण्यासाठी -(उर्वरित आतील पान 7 वर)
काही मुख्य गोष्टी जाणून घेऊया. रोजा कसा करावा : सर्वप्रथम सुर्योदयापूर्वी जेवण (सहरी) करून सूर्यास्तापर्यंत अन्न, पाणी वर्ज्य करावे. दैनंदिन कामे सांभाळून नेहमींसारखे पाच वेळेची नमाज पठण करावी. सायंकाळी सूर्यास्तावेळी अल्लाहचे स्तुतीपठण (ईशस्तुती) करून खजूर खाऊन रोजाची सांगता करावी. रोजादरम्यान अन्नपाणी वर्ज्य करण्यास जितके महत्त्व आहे, तितकेच महत्व वाईट सवई व व्यसनं कटाक्षाने टाळण्याला आहे. शिवराळ भाषा न वापरणे व आपल्या तोंडून शत्रूंबद्दलही अपशब्द येऊ न देणे याला फार महत्व आहे. एरव्ही गप्पांच्या ओघात सहज तिसर्‍या व्यक्तींविषयी कुचाळक्या सुरू होतात. या सर्व वाईट सवयी निश्‍चितच रमजानमध्ये निषिद्ध आहेत. पण एरव्ही आयुष्यात या वाईट सवई टाळल्या गेल्या तर आयुष्य सुकर व शांततामय होईल. 
जाणीवपूर्वक काही खाल्याने, प्यायल्याने रोजा भंग होतो. रोजाची पूर्तता करण्यासाठी कोणाला सुट आहे - गरोदर स्त्री, स्तनपान करणारी स्त्री, गंभीर आजारी असणारे व्यक्ती, वेडसर व्यक्ती, वृद्धत्वास पोहोचलेले, लांबचा प्रवास करणारे. यांच्यासाठी सवलत आहे. प्रवासी व आजारी लोकांना सवड मिळाल्यानंतर ते रोजे पूर्ण करावयाचे आहेत. याला कजा रोजे भरपाई म्हटले जाते. हाच नियम गरोदर व स्तनपान करणार्‍या स्त्रियांसाठीही आहे. अतिशय निग्रहाने हे कजा रोजे करणे आवश्यक आहे. पण असे वृद्ध व्यक्ती ज्यांना दीर्घ वयोमानानुसार खूप थकवा, कमजोरी जाणवत असेल व यामुळे भविष्यातही त्यांना कधी सुदृढ स्वास्थ्य प्राप्त होणे शक्य नसेल अशांसाठी इस्लामने खूप सुंदर मार्ग दाखवला आहे. म्हणजेच अशा वयोवृद्धांतर्फे एक रोजाच्या बदल्यात एक गरीब, गरजुला 2 वेळेचे भरपेट जेवण देणे. किती सोपा व सुंदर मार्ग आहे. जेणेकरून गरीबास 2 वेळेचे पोटभर जेवणही मिळेल व वयोवृद्धांना रोजा करून पुण्यप्राप्तीचे समाधानही मिळेल.
रमजानचे आगमन दरवर्षी होते व अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात त्याचे स्वागतही केले जाते. परंतु यावर्षी परिस्थिती नेहमीसारखी नाही. कोरोनारूपी विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. यामुळेच रमजान व कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. पवित्र रमजानमध्ये तरावीहची नमाज रोज रात्री पठण केली जाते. ते ही मशीदीमध्ये सामुहिकरित्या. पण कोरोनामुळे रमजानपूर्वीच सर्वधर्मी प्रार्थनास्थळे प्रशासनाने बंद केली आहेत. जेणेकरून कोरोनाचा संसर्ग टाळला जाईल. महामारीच्या वेळेस प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी काही सूचना केल्या आहेत. ते म्हणाले, जर एखाद्या शहराविषयी, देशाविषयी तुम्हास माहिती प्राप्त झाली की, तिथे ’ताऊन’ (संसर्गजन्य साथीचा रोग) पसरला आहे. तर त्या शहरात, देशात अजिबात प्रवेश करू नका. जर का तुम्ही राहत असलेल्या प्रदेशात, परिसरात ताऊन पसरला असेल तर मग अजिबात बाहेर जाऊ नका. जिथे आहात तिथेच रहा. जेणकरून एकमेकांना होणार्‍या संसर्गाचा धोका टळेल’ (सही बुखारी, बाबे ताऊन). यावरून आमच्या लक्षात येते की, प्रेषित सल्ल. यांनी 1441 वर्षांपूर्वीच महामारीशी कशी लढावे याचे मार्गदर्शन केलेले आहे.
या पवित्र रमजान महिन्यातच कुरआनचे अवतरण झाले आहे. यामध्ये बुद्धिवंतांसाठी अनन्यसाधारण मार्गदर्शन आहे. जीवनाचा खरा मार्ग कोणाला शोधायचा असेल तर त्याने आयुष्यात एकदा तरी कुरआनला समजून वाचले पाहिजे. बंधूनों, आम्ही ऐहिक सुखासाठी रात्रंदिवस मरमर करतो. स्वत:च्या अस्तित्वाला जाणून घेण्यासाठी, अल्लाहने आम्हाला पृथ्वीवर कशासाठी पाठविले आहे, याचा कधी विचारही करीत नाही. जीवन जगण्यात एवढे धूंद होतो की, ईश्‍वरीय मार्गदर्शन जाणून घेण्याकडे आम्ही पाठ फिरवितो. त्याला आम्ही अधिक महत्व देत नाही. मात्र आयुष्याच्या भल्याचे सर्वस्वी मार्गदर्शन हे कुरआनमध्ये लिखित स्वरूपात आहे. रमजानमध्ये प्रत्येक ईमानधारकांनी कुरआनचे पठण केलेच पाहिजे. समजून घेतलेच पाहिजे. शेवटी रमजानच्या पावनप्रसंगी अल्लाहदरबारी प्रार्थना करते की, कोरोनाची ही महामारी नष्ट होवो. संबंध जगात सुख, शांती, समृद्धीची नांदो. (आमीन.)
ईद-ऊल-फित्रच्या सर्व देशबांधवांना हार्दिक शुभेच्छा.

- रिजवाना अतहर जागीरदार
नळदूर्ग
9972469224

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget