Halloween Costume ideas 2015

एकात्मता, संयम आणि सौहार्द वाढविणारी ईद

कोरोना : ईद-उल-फित्रच्या डिजिटल शुभेच्छा

रमजान ईद म्हणजेच ईद-उल-फित्र. जगभरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा उत्सव. जगभरातील ईद साजरा करण्याचा पॅटर्नही एकच आणि रोजाचाही पॅटर्नही एकच. फक्त भौगोलिक घटनाक्रमावरून थोडा फार एखाद दिवसाचा किंवा सहर, इफ्तार आणि ईद साजरी करण्यातला वेळेचा फरक. महिनाभराच्या कठीण उपवासानंतर रोजेधारकांना बक्षीसाच्या स्वरूपात अल्लाहकडून भेट म्हणून ईदचा दिवस. या दिवशी समाजातील सर्वच स्तरातील लोक मोठ्या उत्साहाने ईद साजरी करतात. शेजारी, मित्रपरिवाराला सोबत घेत, गळा भेट घेऊन, ईद मुबारक म्हणत आणि एकाच पंगतीत बसवून स्वत: सर्वांना शिरखुर्मा आणि इतर रूचकर पदार्थ भरवितात. यात भर पडते ती अत्तर आणि सुरम्याची. हा माहोल एवढे सुख आणि समाधान देतो की कितीही कुणाबद्दल कटूता असलीतरी त्याला माफ करत आलींगन द्यायला भाग पाडतो. मात्र यंदा यावर  मोठ्या प्रमाणात विरझन पडले आहे. कोरोना विषाणूच्या महामारीने या सणावर बंधने आली आहेत. एका ठिकाणी जमू शकत नाहीत, एकत्र नमाज अदा करू शकत नाहीत, एकमेकांना आलिंगन देउ शकत नाहीत. यंदाच्या सर्व शुभेच्छाही डिजीटल असतील. दोन दिवसावर ईद आली आहे. यंदाची ही ईद घरातच साजरी करावयाची आहे.
रमजानचा महिना प्रत्येक मुस्लिम बांधवाला त्यातल्या त्यात रोजेधारकाला स्वत:ला बदलायला, विचार करायला आणि दान, धर्म करायला प्रेरित करतो. संयम, आत्मीयता आणि माफ करण्याच्या प्रवृत्ती या महिन्यात अधिक वृद्धींगत होते. त्याची फलश्रुती ईदच्या दिवशी दिसते. कुठल्याही सणादिवशी लोक आपल्या कुटुंबातील लोकांसोबत रममाण असतात. मात्र ईदच्या दिवशी कुटुंबापेक्षा अधिक मित्रांना, शेजार्‍यांना, ओळखीच्या व्यक्तींना, परिसरातील गरीबांच्या सेवेत अधिक जातो. त्यांना आग्रहाने घरी बोलावून शिरखुर्माचा आस्वाद घेण्यासाठी भाग पाडतो. घरातील प्रत्येकाचे कोणी ना कोणी मित्र असतात. लहानगा असेल तर त्याचे मित्र, मोठा असेल तर त्याचे मित्र. म्हणजेच या दिवशी घरातल्या सर्व लहान, थोरांच्या सर्वधर्मीय जवळच्या व्यक्तीना घरी बोलावून जेवू घातल्याशिवाय ईद साजरी झाल्यासारखी वाटतच नाही. गळा भेट घेऊन ईद मुबारक म्हणणे, एवढीच भेट या दिनी स्विकारली जाते. ज्यामुळे चेहर्‍यावर नूर बहरत असतो आणि स्मीत हास्याने ईदची खुशी झळकत असते. ही खुशी चेहर्‍यावर फुलविण्यात मोठा वाटा असतो तो घरातील स्त्रीयांचा. कारण त्यांच्या परिश्रमामुळेच सर्व काही मिष्टान्न तयार झालेले असतात. खासकरून ईदच्या दिवशी शिरखुर्म्याची चव ही सर्वश्रेष्ठ स्वादापैकी एक असते. तसा स्वाद इतर दिवशी येत नसल्याचा मित्रपरिवाराचं म्हणण आलं. मात्र यंदा, कोरोनामुळे जवळीक कमी झाली आहे. प्रेमात अंतर पडले आहे.

रमजानमध्ये कोणाला काय मिळते?
अल्लाहने कुरआनमध्ये म्हटले आहे की, “हे इमानधारकांनो! विहित केले तुमच्यावर उपवास जसे विहित केले होते तुमच्या पूर्वींच्या(लोकां) वर, जेणेकरून तुम्ही चारित्र्यवान व्हाल.” (संदर्भ : सुरह बकरा आयत नं.183). म्हणजेच अल्लाहकडून इमानधारकांसाठी चारित्र्यनिर्माणाची भेट मिळते. सर्वचजण म्हणतात, उत्तम चारित्र्य ही यशाची गुरूकुल्ली असते. ऐहिक जीवनात आणि पारलौकिक जीवनातही. रोजाच्या काळात कठीण प्रशिक्षण असते. त्यामुळे महिनाभर नियमानुसार रोजे करणे, तरावीहची नमाज अदा केल्यामुळे रोजेधारकाला उत्तम शरीरयष्ठी प्राप्त होते. त्याचे शरीर निरोगी बनते. रोजा माणसामध्ये भुकेची जाणीव उत्पन्न करतो. अन्न धान्यांची कदर करायला शिकवितो. पाण्याची महत्ता वाढवितो.  या सर्वांमुळे अन्नदान करायला माणूस प्रेरित होतो. तसेच रमजान गरीबीचे निर्मुलन करण्यासाठी श्रीमंताना प्रेरित करतो. ते म्हणजे जकात, सदका आणि फित्राच्या माध्यमातून. जकातमुळे तर समाजातील जवळपास 8 गटातील लोक सुखावतात. कुरआनच्या सुरे तौबात म्हटले आहे की, ” हे दान तर खर्‍या अर्थाने फकीर आणि गोरगरीबांसाठी आहे आणि त्या लोकांसाठी जे दान वसुलीच्या कामावर नेमले आहेत आणि त्या लोकांकरिता ज्यांची दिलजमाई अपेक्षित आहे. तसेच हे, गुलामांच्या मुक्ततेसाठी व कर्जदारांना मदत करण्यासाठी व ईश्‍वरी मार्गात आणि वाटसरूंच्या सेवेसाठी उपयोगात आणण्याकरिता आहे, एक कर्तव्य आहे अल्लाहकडून आणि अल्लाह सर्वकाही जाणणारा दृष्टा व बुद्धीमान आहे.”
म्हणजेच 1. फकीर 2. मिस्कीन, 3. जकात वसूल करणारे 4. तालीफे कुलूब. 5. प्रवासी, 6. निर्दोषींना सोडविणे 7. फी सबीलिल्लाह म्हणजे ईश्‍वरीय मार्ग सुलभतेसाठी  8. कर्जदारांना कर्जमुक्त करण्यासाठी.
सदका म्हणजे गरीबांना करण्यात येणारे दान आणि फित्रा म्हणजेच घरातील प्रत्येक व्यक्तीच्या नावे पावने दोन किलो गहू अथवा तत्सम रक्कम गरीबांमध्ये दान करणे. यामध्ये श्रीमंत, मध्यमवर्गीय आदींचा समावेश होतो. याचा अर्थ गरीबांना गरीबीतून बाहेर पडण्यासाठी मोठी मदत होते. आणि शेवटी एवढे अल्लाहने या रोजेधारकांसाठी ईदची सर्वात मोठी भेट दिली आहे. ईदची नमाज सामुहिकपणे ईदगाहवर अदा करण्याला प्राधान्य आहे. ज्यामुळे सामुहिकपणे प्रार्थना होते आणि येथे सर्वांच्या भेटीगाठी होतात. आणि आनंदाने ईदगाहून शांततेने लोक आपापल्या घरी जातात. मात्र यावर्षी असे होणे शक्य नाही. रमजान ईद म्हणजेच ईद-उल-फित्र ही एकात्मता, सौहार्द, प्रेम, आपुलकी वाढविण्यासाठी अल्लाहकडून प्रत्येक इमानधारकाला मिळालेली भेटच आहे.
आदरणीय सआद बिन औस रजि. आपले वडील औस यांच्या हवाल्याने सांगतात की, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फरमाविले आहे की, ” जेव्हा ईद-उल-फित्रचा दिवस येतो तेव्हा अल्लाहचे दूत प्रत्येक रस्त्याच्या कडेला उभे राहतात आणि घोषणा करतात की, ’ हे मुस्लिमानों! आपल्या पालनकर्त्याकडे चला जो फार मोठा कृपाळू आहे. जो पुण्यकर्म करण्याचा आदेश देतो आणि ते करण्याची क्षमता देतो. आणि त्यावर परत बक्षीसही देतो. तुम्हाला त्याच्याकडून (प्रेषितांच्या मार्गाने) तरावीहची अतिरिक्त नमाज अदा करण्याचा आदेश झाला. त्याचेही तुम्ही पालन केले. दिवसा रोजा ठेवण्याचा आदेश झाला तुम्ही रोजेही केले. आपल्या पालनकर्त्याचा आदेश तुम्ही पूर्णपणे मानला तर आता चला आपापले बक्षीस घ्या.”
जेव्हा ईदची नमाज संपते तेव्हा एक ईशदूत घोषणा करतो की, ” हे लोकांनों ! तुमच्या पालनकर्त्याने तुम्हाला मुक्ती दिलेली आहे. आता तुम्ही आपापल्या घरी परत जा. अशा पद्धतीने ही आठवण ठेवत की हा दिवस बक्षीसाचा दिवस आहे. जगामध्ये याला भलेही ईदचा दिवस म्हटले जात असेल मात्र परलोकांमध्ये याला बक्षीसाचा दिवस म्हटले जाते. (संदर्भ : तरगीब : अलमंजुरी, हदीस प्रभा पेज नं.41) . शोधनच्या सर्व वाचकांस ईदच्या मन:पूर्वक शुभेच्छा. अल्लाहकडे दुआ आहे की, माझ्या या प्रिय देशास व बांधवांस कोरोनापासून मुक्ती दे. सर्व व्यवहार सुरळीत होउ देे, सर्वांना सद्बुद्धी दे आणि प्रेम व सद्भावना वाढीस लागू दे. आमीन.

- बशीर शेख, उपसंपादक

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget