Halloween Costume ideas 2015

चला आपण सर्वजण मिळून निश्‍चय करूया

आपण सर्व लॉकडाऊनमध्ये आहोत. काही दिवसात दोन महिने पूर्ण होतील. लॉकडाऊनमुळे लोकांना गंभीर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गरिबांव्यतिरिक्त सामान्य कामगार वर्गही व्यवसाय बंद पडल्यामुळे बेरोजगार झाला आहे आणि त्यामुळे लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा भागविण्यात अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत रमजानचा पवित्र महिनाही सुरू आहे. लोक स्वत:च्या घरात इबादत करत आहेत. आमच्या मस्जिदी बंद आहेत. देशाची आर्थिक परिस्थिती पाहता सरकार काही दुकाने आणि शॉपिंग मॉल्स सुरू करण्यास परवानगी  दिलेली आहे. या भारी लॉकडाऊनमध्ये दुकाने आणि मॉल्स उघडण्याचा काय अर्थ आहे याचा स्वत: चा विचार करा. अशा परिस्थितीत दुकाने उघडल्यास लोक खरेदीसाठी तुटून पडतात. ज्यामुळे लोकांमध्ये शारीरिक अंतर राखता येणार नाही. कोरोना पसरविण्याचा धोका वाढेल. यापूर्वी तबलीगी जमात सदस्यांवर आरोप होता की त्यांच्यामुळेच कोरोना पसरला आहे. तर ईदच्या शॉपिंगच्या बहाण्याने आपण आणखी एक आरोप स्वत:वर लावून घ्यायचा काय? आणि गोदी मीडियाला मग पुन्हा एकदा मुस्लिमांना जबाबदार धरायला आवडेल. यावेळी निश्‍चय करूया की, आपण कोरोना संपेपर्यंत कोणतीच अनावश्यक खरेदी करणार नाही. गरिबांना या पैशातून मदत करू आणि आपल्या अल्लाहला संतुष्ट करू जेणेकरुन आपण या साथीच्या रोगापासून लवकर मुक्त होऊ शकू.
    जेव्हा ही सवलत चालू असेल तेव्हा रमजान महिन्याचे शेवटचे दहा दिवस असतील. ईद म्हणजे आनंदाचे नाव आणि प्रत्येकजण आपल्या कुवतीनुसार हा आनंद साजरा करतो. आम्ही महिनाभर उपवास ठेवल्यानंतर ईद उल-फितर साजरी करतो. ही सर्वशक्तिमान अल्लाहकडून भेट आहे; खासकरुन जे उपवास करतात त्यांच्यासाठी. इस्लामने आपल्याला शरीयतच्या मर्यादेत आनंद मिळविण्याचा अधिकार दिलेला आहे. ईदचा दिवस संपूर्ण मुस्लीम उम्माहसाठी महत्वाचा आहे. नवीन कपडे, नवीन पादत्राणे, बांगड्या, झुमके, नवीन चादरी, पडदे आणि कानातील बाली आणि अन्य आनंददायी वस्तूंची खरेदी करण्याचा हा मौसम आहे. सर्व लोक आपल्या आसपासच्या भागात एकाच ठिकाणी एकत्र जमतात आणि ईदची नमाज अदा करतात, सर्वजण हसून आनंदाने एकमेकांना शुभेच्छा देतात. ईद साजरी करण्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे चांगले वस्त्र परिधान करणे होय. ईदच्या दिवशी नवीन कपडे आणि शिरखुर्मापान बंधनकारक जरी नसले तरी आपल्या संस्कृतीमध्ये या दिवशी शिरखुर्म्याची देवाणघेवाण आवश्यक अशी रीत झालेली आहे. ईद-उल-फितरच्या दिवशी प्रेषित सल्ल. विषम संख्येत खजूर खाल्यानंतर प्रार्थनेला जात असत. खजूर तर उपलब्ध असल्यास उत्तमच असतात. नवीन कपडे शिवणे, ते घालणे देखील योग्य आहे. हजरत मुआद बिन रजि. ने यांनी सांगितले की, मुहम्मद सल्ल. यांनी म्हटले आहे, ”जिस शख्स ने अल्लाह तआला के डर से लिबास में फुजूल खर्ची से अपने आप को बचाया, हालांके वो उसपर कादिर था, तो कल कयामत के रोज अल्लाह तआला तमाम इन्सानों के सामने इस को बुलायेगा और जन्नत में जेवरात में से जो वो चाहेगा पिनायेगा (तिर्मिजी).” हजरत जाबिर रजि. यांच्याकडून वर्णन आहे की, एक व्यक्ती नबी सल्ल. यांच्या सेवेत मळकट कपडे परिधान करून आला होता त्यावेळेस त्यास म्हटले होते की, ”तुम्हाला कपडे धुवायला काही सापडले नाही काय?” (निसाई, मुसनद अहमद).
    शक्यतो पैशाची उधळपट्टी न करता एखाद्याने चांगले आणि स्वच्छ कपडे घालावेत असे गृहित धरुन तथापि, ईदच्या दिवशी नवीन किंवा चांगले कपडे घालणे मुस्तहब (अल्लाहला पसंत ) आहे. अल्लाहने जर एखाद्याला संपत्ती दिली असेल तर ईदच्या दिवशी नवीन कपडे घालण्यास काहीच हरकत नाही. परंतु प्रत्येक गोष्टीत संयम असणे आवश्यक आहे आणि कपड्यांमध्ये गर्विष्ठपणा, गर्व आणि उच्छृंखलता टाळणे आवश्यक आहे.
    जगभरात कोरोना विषाणूच्या साथीचा रोग सुरू आहे आणि त्यामुळे जगभरात लॉकडाउन सुरू आहे. ज्यामुळे लोक चिंतेत आहेत, लोक बेरोजगार आहेत. तथापि, लोक सर्व प्रकारच्या अडचणीत आहेत. या निमित्ताने मुस्लिमांचे उच्च नेतृत्व आणि थोर विद्वान लोक जनतेला यावर्षी स्वत: साठी कपडे शिवू नयेत, असा सल्ला देत आहेत. मुलांनाही यंदा ईदसाठी नवीन कपडे मिळणार नाहीत, असा सल्ला देण्याचे आवाहन करीत आहेत. खरेदी करेल त्याऐवजी ते या पैशातून गरिबांना मदत करतील. आपण बरीच वर्षे ईदसाठी नवीन कपडे परिधान केलेले आहेत. एक वर्ष ईदची खरेदी न करता आपण आपल्याकडे असलेल्या कपड्यांमधून एखादा चांगला जोड परिधान करावेत. तसेच परिसरातील गरीब व्यक्तींनाही शिल्लक जोड द्यावेत.
    ईद-उल-फितरच्या दिवशी कोणतीही खरेदी करु नये असे मी संपूर्ण मुस्लीम उम्माह यांना आवाहन करते. एक प्रकारे हे आमचे संरक्षण असेल. मॉल खुले असले तर तिथे गर्दी असणारच. लॉकडाऊन शिथिल केल्याने काय परिणाम होउ शकतात याची चुनूक 4 मे रोजी दारूची दुकाने उघडली होती तेव्हा दिसून आलीच ना. मग पुन्हा मॉलमध्ये जावून विषाची परीक्षा कशाला पहायची.चांगले होईल जर आहे आमच्या मस्जिदी उघडल्या जातील. आम्हाला असेही माहित आहे की असे बरेच लोक आहेत जे फक्त ईदच्या निमित्ताने कपडे खरेदी करतात. पण आता अल्लाहला खुश करा आणि तुमच्याकडे जे आहे त्यात समाधान माना. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना विनंती करते की हे, लॉकडाऊनच्या काळात ईद खरेदीसाठी झुंबड होणार नाही आणि शारीरिक अंतर राखले जाईल, यासाठी पोलीस आणि महानगरपालिका, नगरपालिकाच्या लोकांना निर्देश द्यावेत. जेणेकरून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका राहणार नाही.

- सय्यदा तबस्सुम मंजूर नाडकर, मुंबई
(लेखिका : गोशा महिला आणि मुले स्टार न्यूज टुडे व गोशा वूमन अँड चिल्ड्रेन इंडिया उर्दू टाईम्सच्या संपादिका आहेत. मो. 9870971871.)

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget