Halloween Costume ideas 2015

अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(५९) त्याच्याजवळच परोक्षाच्या किल्ल्या आहेत ज्यांचे ज्ञान त्याच्याशिवाय इतर कोणालाच नाही. समुद्र व जमिनीत जे काही आहे ते सर्व त्याला माहीत आहे. झाडावरून गळून पडणारे कोणतेच  पान असे नाही ज्याची माहिती त्याला नाही जमिनीच्या अंधकारपूर्ण थरांत कोणताच दाणा असा नाही, ज्याचे त्याला ज्ञान नाही. आद्र्र व शुष्क सर्वकाही एका खुल्या ग्रंथात लिहिलेले आहे.
(६०) तोच तर आहे जो रात्री तुमचे प्राण हरण करतो व दिवसा जे काही तुम्ही करता ते जाणतो, मग, दुसऱ्या दिवशी तो तुम्हाला याच ऐहिक जगात परत पाठवितो जेणेकरून जीवनाची ठराविक  मुदत पूर्ण व्हावी. सरतेशेवटी त्याच्याकडेच तुम्हाला परत जायचे आहे, मग तो तुम्हाला दाखवून देईल की तुम्ही काय करीत होता.
(६१) आपल्या दासांवर तो संपूर्ण प्रभुत्व राखतो आणि तुमच्यावर निरीक्षक नियुक्त करून पाठवितो,४० येथपावेतो की जेव्हा तुमच्यापैकी एखाद्याची मृत्यूघटका येऊन ठेपते तेव्हा त्याने पाठविलेले  दूत त्याचे प्राण हरण करतात व आपले कर्तव्य बजावण्यात जरादेखील चूक करीत नाहीत.
(६२) मग सर्वचेसर्व आपल्या खऱ्या स्वामी अल्लाहकडे परत आणले जातात, सावधान! निर्णयाचे सर्व अधिकार त्यालाच प्राप्त आहेत आणि हिशोब घेण्यात तो अत्यंत तत्पर आहे.’’
(६३) हे पैगंबर  (स.)! यांना विचारा, वाळवंट व समुद्राच्या अंधकारांत कोण तुम्हाला संकटापासून वाचवितो? कोण आहे ज्याच्याजवळ तुम्ही (संकटसमयी) गयावया करून आणि गुपचुपपणे प्रार्थना  करता? कुणाला म्हणता की जर त्याने या संकटातून वाचविले तर आम्ही जरूर कृतज्ञ बनू?
(६४) सांगा, अल्लाह तुम्हाला यापासून व प्रत्येक यातनांपासून मुक्त करतो मग तुम्ही इतरांना त्याचा भागीदार ठरविता.४१
(६५) सांगा, ‘‘तो याला समर्थ आहे की तुम्हावर एखादा प्रकोप वरून कोसळवेल, अथवा तुमच्या पायाखालून उसळवेल किंवा तुम्हाला गटागटांत विभागून एका गटाला दुसऱ्या गटांच्या शक्तीचा  आस्वाद चाखवील.’’ पाहा, आम्ही कशाप्रकारे वरचेवर विविध पद्धतींनी आमच्या निशाण्या यांच्यासमोर प्रस्तुत करीत आहोत की कस्रfचत यांना सत्य समजावे.४२
(६६) तुमचे समाजबांधव त्याचा इन्कार करीत आहेत, वास्तविक पाहता ते सत्य आहे. यांना सांगा की मी तुमच्यावर हवालदार बनविलो गेलो नाही.४३ (६७) प्रत्येक वार्तेच्या प्रकट होण्याची एक  वेळ निर्धारित आहे. लवकरच तुम्हाला स्वत:च परिणाम कळेल.
(६८) आणि हे पैगंबर (स.)! जेव्हा तुम्ही पाहाल की लोक आमच्या संकेतवचनांवर टीका करीत आहेत तर त्यांच्यापासून दूर व्हा. येथपावेतो की त्यांनी हे संभाषण सोडून दुसऱ्या गोष्टीत लागावे.   आणि जर एखादे वेळी शैतानाने तुम्हाला विसर पाडला,४४ तर जेव्हा तुम्हाला त्या चुकीची जाणीव होईल त्यानंतर पुन्हा अशा अत्याचाऱ्यांच्या जवळ बसू नका.


४०) म्हणजे असे देवदूत (फरिश्ते) जे तुमच्या एक एक गोष्टीवर व एक एक कार्यावर लक्ष ठेवून आहेत आणि तुमच्या प्रत्येक हरकतीचा लेखाजोखा सुरक्षित ठेवत आहेत.
४१) म्हणजे हे सत्य आहे की अल्लाह एकमेव सर्वशक्तिमान आहे आणि तोच सर्वाधिकार बाळगून आहे. त्याच्याच हातात तुमचे भविष्य आहे. तुमचे चांगले वाईट करण्याचा त्याला पूर्ण अधिकार  आहे. त्याच्याच हातात तुमच्या नशिबाची बागडौर आहे. त्याची साक्ष तर तुमच्यात उपलब्ध आहे जेव्हा एखादी कठीण वेळ येते आणि त्यातून सुरक्षित बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही, तेव्हा
अशा वेळी बेधडक तुम्ही त्याच अल्लाहकडे परतता. परंतु या उघड निशाण्या असतानादेखील तुम्ही ईशत्वात विनातर्क, विनाप्रमाण दुसऱ्यांना त्याचे भागीदार बनवित आहात. तुम्ही उदरनिर्वाह करता  त्याच्या उपजीविकेवर मात्र अन्नदाता बनविता इतरांना! मदत त्याच्या कृपेने प्राप्त् होते आणि समर्थक व सहाय्यक दुसऱ्याला ठरविता. दास आहात तुम्ही अल्लाहचे परंतु बंदगी करता इतरांची! संकटमोचन करतो अल्लाह तसेच अडचणीत धावा करता अल्लाहचाच मात्र वेळ निभावल्यावर विघ्नहर्ता ठरविता दुसऱ्याला! आणि नैवद्य चढवतात भलत्यांनाच!
४२) जे लोक अल्लाहच्या कोपाला आपणापासून दूर जाणून सत्याच्या विरोधात दुस्साहसवर दुस्साहस करीत आहेत, त्यांना  सचेत केले जात आहे की अल्लाहचा कोप होण्यास विलंब लागत नाही.  हवेचे एकच वादळ तुम्हाला एका झटक्यात नष्ट करू शकते. भूकंपाचा एक झटका तुमच्या वस्तींना मातीमोल करण्यास सक्षम आहे. कबिले, समाज व देशातील शत्रुत्वाच्या मैग्जीनची (दारूगोळयाची) एक ठिणगी असा विध्वंस पसरवू शकते की वर्षानुवर्षे रक्तपात व अशांतीपासून तुमची सुटका होणार नाही म्हणून कोप होत नाही या कारणास्तव गफलतीने बेधुंद होऊ नका आणि  निश्चितपणे चांगल्या वाईटात फरक न करता आंधळयासारखे जीवन जगू नका. गनीमत जाणा की अल्लाह तुम्हाला सवलत देत आहे आणि त्या सर्व निशाण्या तुमच्यासमोर ठेवत आहे. ज्यांना   पाहूनतुम्ही सत्य जाणून स्वीकारावे.
४३) म्हणजे माझे हे काम नाही की जे काही तुम्ही पाहात नाही ते बळजबरीने दाखवावे. जे काही तुम्ही समजून घेत नाही तेसुद्धा शक्तीपूर्वक तुम्हाला समजवावे. माझे हे काम पण नाही की तुम्ही   पाहिनात व समजूनही घेईनात म्हणून तुमच्यावर प्रकोप आणावा. माझे काम फक्त सत्य आणि असत्य वेगवेगळे करून तुमच्यासमोर ठेवणे आहे. आता तुम्ही मान्य करत नसाल तर ज्या वाईट परिणामापासून मी तुम्हाला सचेत करत आहे, ते वेळेवर तुमच्यासमोर येणारच आहे.
४४) म्हणजे एखाद्यावेळी आमचा हा आदेश तुम्हाला आठवला नाही आणि तुम्ही भूलचुकीने अशा लोकांच्या संगतीत वावरत राहावे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget