Halloween Costume ideas 2015

सहप्रवाशाचा अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)

माननीय सहल बिन सअद (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘लोकसमुदायाचा प्रमुख त्या लोकसमुदायाचा सेवक असतो. अल्लाहच्या मार्गातील हौतात्म्यव्यतिरिक्त लोकांची सेवा करण्यात पुढाकार घेणाऱ्याच्या कर्मापेक्षा कोणतेही पुण्यकर्म श्रेष्ठ असत नाही.’’ (हदीस : मिश्कात)

स्पष्टीकरण
एखाद्या समूहाबरोबर प्रवास करणाऱ्या मनुष्याने त्या समूहातील लोकांची सेवा करावी, त्यांची गरजांची पूर्तता करावी आणि त्यांना प्रत्येक प्रकारचे साहाय्य करण्याचा प्रयत्न करावा, याचे  फार मोठे पुण्य आहे. या पुण्यापेक्षा श्रेष्ठ जर कोणते पुण्य असेल तर ते म्हणजे मनुष्याने अल्लाहच्या मार्गात युद्ध करताना हौतात्म्य पत्करणे होय.

माननीय अबू सईद खुदरी (रजि.) यांच्या कथनानुसार, एकदा आम्ही प्रवासात असताना पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याजवळ एक मनुष्य उंटिणीवर स्वार होऊन आला, मग त्याने उजव्या  व डाव्या बाजूला वळून पाहण्यास सुरूवात केली, तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘ज्या मनुष्याकडे एखादे अतिरिक्त वाहन असेल त्याने ते वाहन नसलेल्या व्यक्तीला द्यावे आणि ज्या कोणाकडे  अतिरिक्त भोजन असेल त्याने ते ज्यांच्याकडे जेवणाचे पदार्थ नसलेल्याला द्यावे.’’

अबू सईद खुदरी (रजि.) यांच्या मते पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आमच्याकडील अनेक प्रकारच्या सामानाचा अंदाज घेतला, त्यावेळी आम्हाला वाटले की एखाद्याच्या आवश्यकतेपेक्षा  अधिक सामानावर आमच्यापैकी कोणाचाही अधिकार नाही. (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण
आलेल्या व्यक्तीने उजवीकडे व डावीकडे पाहिले कारण खरे तर तो गरजवंत होता, म्हणून लोकांनी त्याची मदत करावी अशी त्याची इच्छा होती.

माननीय सईद बिन अबू हिंद अन् अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘काही उंट शैतानाचा भाग असतात, काही घरे शैतानाचा भाग असतात,  शैतानांचे उंट मी पाहिले आहेत, तुमच्यापैकी कोणी आपल्याबरोबर अनेक उंटिणी घेऊन निघतो आणि त्यांना खूप  चारा-पाणी देऊन ताजेतवाणे करून ठेवले आहे आणि त्यांच्यापैकी  कोणत्याही एकावर तो स्वार होत नाही. जेव्हा तो आपल्या वाहन नसलेल्या बंधुजवळून जातो तेव्हा तो आपल्या उंटिणींवर बसवत नाही. शैतानांच्या घरांबाबत म्हणायचे झाले तर ते मी  पाहिलेले नाहीत. (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण
‘शैतानांची घरे’ म्हणजे जी घरे लोक फक्त आपले मोठेपण दाखविण्यासाठी अनावश्यक निर्माण करतात. ते लोक स्वत: त्यात राहात नाहीत अथवा इतर गरजवंत लोकांना राहायला देतही नाहीत. इस्लाम संपत्तीच्या अशाप्रकारच्या देखाव्याला पसंत करीत नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी अशी घरे पाहिलेली नाहीत. त्या काळात असे देखावा करणारे लोक नव्हते.  होय, नंतर आमच्या वाडवडिलांनी अशी घरे पहिली आणि आम्हीही आमच्या काळातील श्रीमंत मुस्लिमांची अशी दिखाऊ घरे पाहतो आहोत.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget