(८३) मानवाची अवस्था अशी आहे की आम्ही जेव्हा त्याला देणगी प्रदान करतो तेव्हा तो ऐटीत येतो व पाठ दाखवतो आणि जेव्हा जरा संकटात सापडतो तेव्हा निराश होऊ लागतो.
(८४) हे पैगंबर (स.)! या लोकांना सांगा, ‘‘प्रत्येक आपल्या पद्धतीने काम करीत आहे, आता तुमचा पालनकर्ताच हे उत्तम जाणतो की सरळमार्गावर कोण आहे.’’
(८५) हे लोक तुम्हाला आत्म्याविषयी विचारतात, सांगा, ‘‘हा आत्मा माझ्या पालनकर्त्याच्या आज्ञेने येतो, पण तुम्हा लोकांना अल्पज्ञान मिळाले आहे.’’३८
३८) या ठिकाणी ‘रुह’ या शब्दाने आत्मा अभिप्रेत आहे असे सर्वसामान्यपणे समजले जाते. म्हणजे लोकांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे जीवन आत्म्यासंबंधी विचारले होते की त्याची वास्तवता काय आहे, तर तो अल्लाहच्या आज्ञेने येत असतो, असे त्याचे उत्तर दिले गेले. परंतु आयतीचा संदर्भ दृष्टीसमोर ठेवून पाहिल्यास या ठिकाणी आत्म्याने अभिप्रेत पैगंबरत्वाचा आत्मा अथवा दिव्यबोध (वह्य) असल्याचे स्पष्टपणे कळते. हीच गोष्ट सूरह-१६ अन्नह्ल, आयत क्र. २ आणि सूरह-४० अल्मुअ्मिन, आयत क्र. १५ व सूरह-४२ अश्शूरा आयत क्र. ५२ मध्ये फरमाविली गेली आहे. प्रारंभिक काळातील विद्वानांपैकी इब्ने-अब्बास (रजि.), कतादा व हसन बसरी (रह.) यांनीदेखील हेच भाष्य स्वीकारले आहे. ‘रूहुल-मआनी’ यांनी हसन बसरी व कतादा यांचे कथन उद्धृत केले की, ‘रुह-आत्माने अभिप्रेत आदरणीय जिब्रिल (अ.) आहेत व ते कसे उतरतात आणि कशा प्रकारे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या हृदयात दिव्यबोध टाकतात, मूळ प्रश्न असा होता.
Post a Comment