झोपेत आणि मृत्यूसमयी आत्मा शरीरापासून वेगळा होतो पण दोन्हीमधील फरक जीवन किंवा मृत्यूचे कारण ठरते. याविषयी पवित्र कुरआनमध्ये स्पष्ट मार्गदर्शन आहे.
अल्लाहु यतवफ्फल्-अन्फु-स ही-न मव्-तिहा वल्लति लम् तमुत् फी मनामिहा, फयुम्-सिकुल्लती कज़ा अलय्-हल् मव्-ता व युर्-सिलुल् उख़्-रा’ इला अ-ज-लिम्-मुसम्मन, इन्-न फी ज़ालि-कल आयाति लिकव्-मिंय्- यतफक्करू-न.
अनुवाद :-
तो अल्लाहच आहे जो लोकांच्या मृत्यूसमयी त्यांचे आत्मे ताब्यात घेतो आणि ज्याची वेळ अजून आलेली नाही त्याचा आत्मा झोपेत ताब्यात घेतो, मग ज्याच्यासाठी तो मृत्यूचा निर्णय जारी करतो त्यास रोखून ठेवतो आणि इतरांचे आत्मे एका निश्चित वेळेसाठी परत पाठवतो. यांत मोठे संकेत आहेत त्या लोकांसाठी जे गंभीरतेने विचार करतात. ( 39 अज़्-ज़ुमर् - 42 )
या आयतीवरून हे ज्ञात होते की अल्लाह माणसाच्या मृत्यूसमयी आणि झोपेच्या वेळी त्याचा आत्मा ताब्यात घेतो. झोप लागणे हेही एक प्रकारे मृत्यूच आहे, पण त्यामध्ये अल्लाह माणसाच्या आत्म्याचा ताबा घेऊनही त्याला शरीराशी असा काही संबंधित ठेवतो की नाडी नियमित असते, अन्न पचते आणि माणूस श्वासही घेतो म्हणजे जिवंत असतो, पण कधी कधी हा आंतरिक संबंधही तुटतो, ज्यामुळे माणसाचे या जगातील आयुष्य संपते, म्हणून कित्येक लोकांचा मृत्यू झोपेतच झाल्याचे दिसून येते.
यासंबंधी स्पष्टीकरण करताना मुफ्ती मुहम्मद शफी (र) यांनी लिहिले आहे,
मृत्यू आणि झोप दोन्हीमध्ये आत्मा ताब्यात घेण्याचा हा फरक ज्याचा वर उल्लेख केला गेला आहे, त्याचे समर्थन आदरणीय अली (र.) यांच्या एका बोधवचनातून होते.
झोपेच्या वेळी व्यक्तीचा आत्मा शरीर सोडून जातो, पण आत्म्याची एक किरण शरीरात राहते जी त्याला जिवंत ठेवते.
(अनुवाद : मआरिफुल्-कुरआन - खंड 7 - पृ. 563 )
या बाबतीत उदाहरण देताना मौलाना शब्बीर अहमद उस्मानी यांनी लिहिले आहे की, ’जसे सुर्य लाखो किलोमीटर दूर असूनही तो आपल्या किरणांद्वारे पृथ्वीला उबदार ठेवतो.’ ( अनुवाद : तफ्सीरे उस्मानी - पृ. 600 )
झोप आणि मृत्युचा उल्लेख करून या आयतीच्या शेवटी म्हटले गेले आहे की गंभीरतेने विचार करणाऱ्यांसाठी यामध्ये मोठे संकेत आहेत. याविषयी स्पष्टीकरण करताना डॉ. मुहम्मद अस्लम सिद्दिकी यांनी लिहिले आहे की,
ज्याप्रमाणे विश्व निर्मिती आणि त्याचे व्यवस्थापन पूर्णपणे अल्लाहच्या अधिकारात आहे आणि त्यात इतर कुणीही सहभागी नाही, त्याचप्रमाणे जीवन आणि मृत्यू हेही त्याच्याच हाती आहेत. ज्याला तो जीवन देऊ इच्छितो, त्याला कुणी संपवू शकत नाही आणि ज्याचे जीवन तो संपवू इच्छितो, त्याचा जीव कुणीच राखू शकत नाही. त्यामुळे जीवन-मृत्यूची लगाम ज्याच्या ताब्यात आहे, त्याच्याविषयी अज्ञानी राहून आणि त्यापासून विमुख होऊन जगणे किती आश्चर्यकारक आहे. माणसाने ही खात्री बाळगायला हवी की माझा निर्माता मला कधीही कायमचा झोपवू शकतो आणि तो कयामतच्या दिवशी माझ्या जीवनाचा हिशोब घेणार आहे. तरीही माणूस जर आपल्या ईश्वरासमोर बंडखोरी आणि अहंकारी वृत्तीने वागत असेल तर त्याला मुर्खच म्हणावे लागेल. या आयतीद्वारे दुसरा संकेत हा मिळतो की जोपर्यंत माणसाला मृत्यू येत नाही तोपर्यंत त्याला दररोज झोपेद्वारे मृत्यू अनुभवायला मिळतो. जेव्हा एखादी व्यक्ती झोपी जाते, तेव्हा त्याचा श्वासोच्छ्वास चालू राहतो पण त्याच्या आत जीवनाची इतर कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. भावना, चेतना, समज, आकलन, इच्छा व अधिकारांपासून तो पूर्णपणे वंचित होतो. जेव्हा माणूस झोपतो तेव्हा त्याचा आत्मा ईश्वराच्या ताब्यात असतो. अशा वेळी ईश्वराचा निर्णय एक तर माणसाच्या झोपेला मृत्यूमध्ये बदलू शकतो किंवा त्याला परत जगण्याची संधीही मिळू शकते. यातून माणसाला रोज मृत्यूची अनुभूती येते आणि तो स्वतःला पुर्णपणे ईश्वराच्या नियंत्रणात असल्याचे पाहतो, तरीही जीवनासंबंधी निष्काळजीपणा दाखवतो आणि सांसारिक मोहजालातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही, याचे आश्चर्य वाटते.
या आयतीमध्ये तिसरा संकेत हा मिळतो की जेव्हा झोप झाल्यावर माणसाला जाग येते तेव्हा ही वास्तविकता त्याच्या लक्षात आणून दिली जाते की ’ मरणोत्तर जीवनात कयामतच्या दिवशी माणसांना दूबार जिवंत केले जाईल.’ जो निर्माता माणसाच्या जागरणावर मात करून त्याला निद्रावस्थेत नेतो आणि गाढ झोपेतून माणसाला जागे करतो, त्याच्यासाठी माणसांच्या मृत्यूनंतर त्यांना कयामतच्या दिवशी दूबार जिवंत करणे आणि आपल्या अंतिम न्यायालयात हजर करणे काय कठीण आहे. ( अनुवाद : रूहुल्-कुरआन )
माणसाने एवढेच लक्षात ठेवले पाहिजे की त्याचे जीवन आपोआप संपत नाही, तर अल्लाहने ठरवून दिलेल्या वेळेवर संपते. माणूस नेहमी अल्लाहच्या नियंत्रणात असतो. जोपर्यंत अल्लाह इच्छितो तोपर्यंतच माणूस सांसारिक जीवनाचा आनंद घेऊ शकतो, मात्र एका निश्चित वेळेवर अल्लाह माणसाचा आत्मा ताब्यात घेतो.
...................... क्रमशः
अब्दुल कय्यूम शेख अहमद.
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment