लहानपणी आम्ही सुटीच्या दिवशी आमराईत जायचो. आमचे वडील आमराई घेत असत. भरपूर आंब्याची झाडे असायची आमराईत. कच्चे आंबे पिकले की नाही याची ओळख अशी होती की झाडावरच काही कच्चे आंबे पिकून जात आणि झाडावरून आपोआप खाली पडले की समजायचं की आंब्याच्या झाडावर जे आंबे आहेत ते उतरवणीवर आली आहेत. त्याला पाड म्हणायचो. आता सर्व आंबे उतरवू शकता किंवा तोडू शकता. आम्ही काय करत होतो की झाडावरचे आंबे पिकली की ते केव्हा खाली पडणार याची वाट बघत. आंब्याच्या झाडाजवळ उभे राहायचं आणि समजा एखादा आंबा पाड खाली पडला की त्याला प्राप्त करण्यासाठी वेगाने धावत झपाटा मारून तो खाली पडलेला आंबा आपल्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न करायचं. मी थोडं चपळ असल्याने बिबट्या समान झपाटा मारून तो पिकलेला आंबा माझ्या ताब्यात घ्यायचो, आणि दिवसभरात बरेच पाडाचे आंबे माझ्याजवळ जमा होऊन जायचे. एवढे आंबे माझ्याजवळ जमा झालेले असताना देखील माझ्या मनात आणखी लालसा राहत असे की केव्हा आंबा खाली पडतो आणि मी केव्हा झपाटा मारून त्याला माझ्या ताब्यात घेतो.
या जीवनाची ही हकीकत अशीच आहे हे मला मोठे झाल्यावर कळले. कितीही भौतिक सुविधा आपल्याला प्राप्त झाल्या तरी आपल्या मनात लालसा असते की अजून संपत्ती गोळा करावी. पोट भरता भरत नाही या दुनियेच्या लालसेने.
आम्ही बघत आहोत की मानव जग प्राप्तीसाठी किती वेगाने धावपळ करीत आहे. सर्व जग यााच्या मागे धावत आहे आणि सर्वांची हीच इच्छा आहे की जास्तीत जास्त धन संपत्ती गोळा करावी, मोठे धनाढ्य व्हावे. आरामाने लक्झरीयस जीवन व्यतीत करावे. कुणी लखपती असेल तर त्याची इच्छा करोडपती बनण्याची असते. कुणाजवळ पाच हेक्टर शेत असेल तर तो त्याला दहा हेक्टर कसे करता येईल याच्या प्रयत्नात असतो. जर कुणाजवळ एक फ्लॅट असेल तर तो दोन-तीन फ्लॅट चा मालक कसा होऊ शकेल याच्या प्रयत्नात असतो. एखाद्याचा मुलगा किंवा मुलगी डॉक्टर अथवा इंजिनियर झाले की मनात लालसा येते की माझ्या मुलांचाही नंबर कसा लागेल. शेजाऱ्यांचा वा नातेवाईकांचा मुलगा किंवा मुलगी कॉन्व्हेंट मध्ये शिकत आहे ते बघून आमची देखील इच्छा होते की माझ्या पाल्यांनी देखील कॉन्व्हेंट मध्ये शिक्षण घ्यावे.जर कुणी घर बांधले की माझं घर केव्हा तयार होईल याची चिंता लागते. कोणी दुचाकी किंवा चार चाकी घेतली की आम्ही देखील त्याच्यामागे लागतो. सांगायचे तात्पर्य असे की जग प्राप्तीची लालसा कधीच संपत नाही. मानवाला सोन्याची एक खाण जर मिळाली तरी त्याची इच्छा हीच असते की दुसरी सोन्याची खाण केव्हा भेटणार? मन भरतच नाही मानवाचे या भौतिक सुविधा प्राप्तीच्या इच्छेने.
कूरआन मध्ये सूरह तकासुरमध्ये याचे जे वर्णन आहे ते वाचण्यायोग्य आहे आणि भरपूर मार्गदर्शनही आहे यामधे. अल्लाह सांगतो की,
’’तुम्हा लोकांना अधिकाअधिक आणि एकमेकांपेक्षा जास्त धन प्राप्त करण्याच्या मोहाने बेसावध करून टाकले आहे, येथपावेतो की (याच चिंतेत) तुम्ही थडग्यापर्यंत पोहचता, कदापि नाही, लवकरच तुम्हाला कळून येईल, पुन्हा (ऐकून घ्या) कदापि नाही, लवकरच तुम्हाला कळून येईल, कदापि नाही, जर तुम्ही खात्रीचे ज्ञान म्हणून (या चालीच्या परिणामाला) जाणत असता (तर तुमचे वर्तन असे नसते). तुम्ही नरक पाहणारच, पुन्हा (ऐकून घ्या) तुम्ही अगदी खात्रीने ते पहाल.’’’’मग जरूर त्या दिवशी या देणग्यांसंबंधी तुम्हाला जाब विचारला जाईल.’’ (दिव्य कूरआन, सूरह अत तकासुर)
याचे स्पष्टीकरण देताना इस्लामी स्कॉलर मौलाना सय्यद अबुल आला मौदुदी(र.अ) सांगतात की, याचे तीन अर्थ आहेत. पहिला अर्थ असा की मानवाचे जास्तीत जास्त भौतिक सुविधा प्राप्त करण्याचे प्रयत्न करणे. दुसरा अर्थ असा की, लोक जास्तीत जास्त भौतिक सुविधा प्राप्तीसाठी एक दुसऱ्याला मागे टाकून वरचढ कसे होता येईल याचे प्रयत्न करतात किंवा करू लागतात. तिसरे असे की जी भौतिक सुविधा मानवाने जमा केली आहे त्याच्यावर तो गर्व करू लागतो आणि इतरांना याची जाणीव करून देण्याचे प्रयत्न करतो. किती छान वर्णन केले मौलानांनी. मानवाची मानसिकता या दुनियेबद्दल अशीच आहे की तो धन संपत्ती गोळा करण्यासाठी जीवाचे राण करतो त्याचे सर्व प्रयत्न यासाठीच असते की जास्तीत जास्त संपत्ती गोळा करावी, धनवान बनावे आणि यासाठी आम्ही बघत आहोत जणू धनसंपत्ती गोळा करण्याची स्पर्धा सुरू आहे मानवांमध्ये.
बस यही दौड है आज इंसानो की,
तेरी दिवार से उंची मेरी दिवार बने
मानव याकरिताच धावपळ करतांना दिसतो की एक प्लॉटचे दोन प्लाट कसे बनतील? त्याच्या घरापेक्षा माझं घर सुंदर कसे दिसेल? दुचाकीची चार चाकी केव्हा होईल? आणि समजा त्याला हे सर्व काही प्राप्त झाले तरी त्याची लालसा कमी होतांना दिसत नाही. या विपरीत धन दौलतीवर तो गर्व करू लागतो. अहंकार त्याच्यात शिरकाव करतो. दुसऱ्यांना काहीच समजत नाही. क्रूर बनतो. दया भावना त्यांच्यात राहत नाही. हक्कदारांचे हक्क देणे तर सोडून द्या त्यांचे हक्क खाऊन देखील त्यांची इच्छा अतृप्त असते. आणि एक दिवस असा येतो की जग प्राप्त करता-करता तो हे विसरून जातो की त्याला मृत्यूशी सामना करने तर बाकीच आहे. धन प्राप्तीच्या आवेशात केस पांढरे होतात, शरीर अशक्त होते, म्हातारपण लवकर येते. अगदी मृत्यू शय्येवर पडल्यावर देखील मानवाची जग प्राप्तीची लालसा कमी होत नाही. इथं पावेतो की तो थडग्यापर्यंत पोहोचून जातो जग सोडावे लागते. त्याने एवढी मोठी संपत्ती गोळा केली जी काहीच कामाची राहत नाही. म्हणूनच म्हणतात खाली हाथ आया था खाली हात चला गया.
बुद्धिवंत आहे जो मृत्यपूर्वी मरणोत्तर जीवनाची तयारी करतो. हे जीवन सर्व मोहमाया आहे. आणि हे जग सर्वसंपन्न देखील नाही अपूर्ण आहे. या पलीकडे एक जीवन आहे पारलौकिक जीवन. मृत्यू नंतर अल्लाह समोर उभे राहणे आहे. त्याला तोंड दाखवणे आहे. या जीवनाचा क्षणाक्षणाचा हिशोब अल्लाहला देणे आहे. हे जीवन कसे जगले? या जीवनात किती संपत्ती गोळा केली? कोठून केली? कोठे खर्च केली? या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहे. शहाणा तो आहे जो मरणोत्तर जीवनाची तयारी करतो. संपत्ती प्राप्त अवश्य करतो पण कुणाचाही हक्क मारीत नाही. भ्रष्टाचार, दुष्टाचार ,अनाचार करीत नाही. दया करूना मनात राखतो. गर्विष्ठ होत नाही. अल्लाहने जो सत्य मार्ग दाखवला आहे त्यानुसार जीवन व्यतीत करतो. आणि हो या जग निर्मितीचा खरा अर्थ असा की तुमची जी इच्छा आकांक्षा असते ती सर्व पूर्ण होणे या जगात अशक्य आहे तुम्ही जे प्राप्त करण्याची इच्छा बाळगता ते पूर्ण होणे या दुनियेत अशक्य आहे. काही उणीवा काही आकांक्षा अपुऱ्या राहतात या जगात. ही अपूर्ण इच्छा मनात घेऊन तो जगाचा निरोप घेतो पण त्याची ही मनातील इच्छा अवश्य पूर्ण होईल मरणोत्तर जीवनात. स्वर्गात ज्याला अल्लाह कडून जन्नत चा परवाना मिळेल त्याला स्वर्गात सर्व काही मिळेल. या जीवनात जी ईच्छा अपूर्ण राहिली,जी आकांक्षा कमी पडली ती पूर्ण होणार त्यासाठी काय करावे लागेल काही जास्त नाही. एक अल्लाहाची पूजा अर्चा करावी लागेल. इमानवंत बनावे लागेल. सद्कार्य करावे लागेल. सत्य मार्गावर चालावे लागेल. अल्लाह आम्हा सर्वांना सद्बुद्धी देवो आणि या जीवनातील राहिलेली अपूर्ण इच्छा मरणोत्तर जीवनात जरूर पूर्ण करो हीच इच्छा अल्लाहशी बाळगतो. आमीन....
आमराई भेटणार गोड गोड आंबे देखील भेटणार
आम्ही या जगाच्या जीवनातसुद्धा तुमचे सोबती आहोत आणि परलोकातसुद्धा. तेथे जी काही इच्छा कराल तुम्हाला मिळेल आणि प्रत्येक गोष्ट जिची तुम्ही मनिषा बाळगाल, ती तुमची होईल. (दिव्य कूरआन सुरह 41:आयत 31)
- आसिफ खान,
धामणगाव बढे
9405932295
Post a Comment