हदीस संग्रह बुखारी आणि मुस्लिममध्ये एक हदीस आलेली आहे. ज्यात प्रेषित वचन खालीलप्रमाणे उधृत करण्यात आलेले आहे, ’’ ज्या व्यक्तीने माझा संदर्भ सांगून कोणाला एखादी चुकीची गोष्ट सांगितली तर त्याने स्वतःचे ठिकाण नरकात आहे, एवढे समजून घ्यावे’’ एवढी कडक चेतावनी मिळाल्यानंतरही इस्लामच्या इतिहासामध्ये अशा अनेक व्यक्ती होवून गेल्या ज्यांनी चुकीची प्रेषित वचने तयार करून समाजात प्रस्तुत केली. यामागे त्यांचे राजकीय समर्थन किंवा विरोध हे कारण होते. सत्ताधाऱ्यांकडून भौतिक मदत मिळावी म्हणून किंवा मुसलमानांच्या दुसऱ्या गटाशी असलेले मतभेद वाढावेत म्हणून अशी प्रेषित वचने पेरली गेली. हा प्रकार इस्लामच्या सुरूवाती काळापासूनच सुरू झालेला आहे. शेकडो लोकांनी हे घृणित काम केलेले आहे आणि हजारो खोटी प्रेषित वचने तयार केली गेली आहेत. ईश्वराची कृपा हो त्या हदीसच्या विद्वानांवर ज्यांनी वेळीच अशा खोट्या प्रेषित वचनांना ओळखून त्यांना खऱ्या प्रेषित वचनांपासून वेगळे करून टाकले आहे. असे करण्याच्या कृतीला अस्माउल रिजाल पद्धत असे म्हणतात. या पद्धतीतून हजारो लोकांच्या जीवनाचे अहवाल गोळा केले गेले. त्यावर संशोधन केले गेले आणि त्याच्यापैकी जे खरे वाटले त्यांना सन्माननीय हदीसचे संदर्भकार म्हणून नोंदविले गेले. ज्यांच्याव्यक्तिमत्वाविषयी संशय किंवा ते खोटे असल्याविषयीची खात्री होती त्यांना वेगळे करण्यात आले. त्यांची ओळख पटविण्यात आली. जेणेकरून समाज त्यांच्यापासून सावध राहील.
हदीसच्या अभ्यासामध्ये अनेक महिलांनी मोठी जबाबदारी पेललेली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, खोट्या हदीस तयार करण्यामध्ये एकाही महिलेचे नाव नाही. ही मुस्लिम महिलांसाठी गर्व करण्यासारखी गोष्ट आहे. ईमाम अल जरह वल तआदील, अल्लाम्मा शम्सुद्दीन जहबी यांनी स्पष्ट शब्दात म्हटलेले आहे की, आम्हाला माहित नाही की हदीसच्या संदर्भात एकाही स्त्रीने चुकीची हदीस संदर्भित केलेली आहे. महिलांची ही गोष्ट खरोखर स्तुतीपात्र आहे.
- डॉ. रजिउल इस्लाम नदवी
दिल्ली
पुस्तक : मेमारे जहाँ तू है
भाषांतर : डॉ. सिमीन शहापुरे
Post a Comment