भारत शेतीप्रधान देश आहे, या देशातील शेतकरी जगला तरच हा देश जगणार आहे, आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे.शेती उत्पादनावर भारतीय अर्थव्यवस्था अवलंबून आहे.शेती आणि शेतकरी हे या देशातील विकास प्रक्रियेतील महत्वाचे घटक आहेत, मात्र
शेती कसणाऱ्या या देशातील शेतकऱ्यांच्या अडचणी,त्यांच्या समस्या, त्यांचे हाल, त्यांचे प्रश्न महाभयंकर आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या परिस्थितीला समजून घेण्यास सरकारमध्ये बसलेल्या व शेतकऱ्यांचे तारणहार म्हणून मंचावर मिरवणाऱ्या कुणालाही आता वेळ नाही, कारण प्रशासनालाही माहीत आहे की, भारतीय आर्थिक व्यवस्थेचा कणा हा शेतीच आहे, त्यामुळेच ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या व किंमती वाढवून शेतकरी वर्गाची मुस्कटदाबी केली जाते आहे.
सर्व थरांतील शासकीय व प्रशासकीय अधिकारी शेतकऱ्यांची पिळवणूक करून ‘मुकी बिचारी कुणीही हाका’ या उक्तीप्रमाणे शेतकऱ्यांच्या दैन्यावस्था व प्रचंड हाल अपेष्टांमध्ये भरच घालीत आहेत. रासायनिक खते व कीडनाशके, बी-बियाणे यांच्या किंमती वाढविणे, त्याची टंचाई निर्माण करणे, हा मानवनिर्मित प्रकार शेतकऱ्यांच्या हाल अपेष्टा मध्ये वाढ करणारा आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत मौलिक कामगिरी करणाऱ्या बळीराजाचे आर्थिक शोषण करणे हे अत्यंत निषेधार्ह आहे, शेतकरी आधीच आर्थिक विवंचनेत आहे, शेतकऱ्यांच्या शेती मालाला भाव नाही, त्यातच नैसर्गिक आपत्तीत शेतातील उभ्या पीकांचे नुकसान होते आहे, याशिवाय बँका खरीप हंगामातील बी -बियाणे खरेदीला सुध्दा कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत, सावकारी कर्ज घेण्याशिवाय शेतकऱ्यांच्या जवळ दुसरा पर्याय रहात नाही, अशा स्थितीत यंदा रासायनिक खते व कीडनाशके यांच्या दरात प्रचंड वाढ करुन शेतकऱ्यांना जेरीस आणलेले आहे,यामुळे
अनेक शेतकरी आर्थिक संकटाला बळी गेलेले आहेत, शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटुंब सध्या आर्थिक व मानसिक कोंडीत सापडले आहे. तरीही बळीराजाचे कुटुंब झुंजतांना दिसत आहेत, खेड्यापाड्यात, अगदी वाड्या वस्त्यांतील शेतकऱ्यांचे अतोनात हाल होताहेत, त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे, बी- बियाणे, खते, तसेच शेतीची मशागतीसाठी खर्च वाढतच आहे अशा स्थितीत त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होत असतांना सरकारने खतांच्या व शेतकऱ्यांच्या माथी बसत आहे.
रासायनिक खते, बी- बियाणे व किडनाशके यांच्या किंमतीत भरमसाठ वाढ करणे, योग्य नाही, आधीच खरीप हंगाम तोंडावर असताना ही शेतीची मशागत व मृगाच्या तोंडावर करावी लागणारी शेतीची कामे पाऊस लांबल्याने पूर्ण झालेली नाहीत, आ-ता कुठे नाईलाजाने पण कर्तव्य भावनेने बळीराजा शेतीच्या कामाला लागलेला आहे, काही शेतकरी कुटुंबातील काही व्यक्ती गेल्या दोन तीन वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गमावल्या आहेत, अशा कुटुंबातील शेतकरी अजूनही दुःखातून सावरलेला नाही, बँका ही खरीप बी-बियाणे व खतासाठी कर्ज देण्यास टाळा-टाळ करीत आहे, पंतप्रधान फंडातून मिळालेली रक्कम तुटपुंजी आहे,तरीही मोठ्या आशेने बळीराजा शेतीच्या कामासाठी तयारीला लागलेला आहे,याचा सारासार विचार शासनाने करावयास हवा होता,मगच खतांच्या किमती वाढविण्याबाबत विचार करावयास हवा होता, सरकारने खतांच्या किंमती वाढवून शेतकरी वर्गाला मोठ्या अडचणीत आणलेले आहे,
खतांच्या या भरमसाठ दरवाढीमुळे शेतकऱ्यांची खरीप पिके धोक्यात आलेली आहेत, शेतकरी ही महागडी खते घेऊ शकत नाहीत, ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर वाढवलेल्या या खतांच्या किंमती शेतकऱ्यांसाठी न परवडणाऱ्या असून जीवघेण्या आहेत, या खतांच्या दरवाढीचे
दुष्परिणाम पीक उत्पादन वाढीवर होणार असून शेतकरी आपल्या पिकांना पुरेसे खत देऊ शकणार नाहीत, जमिनीचा पोत इतका निकृष्ट दर्जाचा झाला आहे की, रासायनिक खतांचा वापर केल्याशिवाय जमिनीतून पिकें वर येत नाहीत.
एवढं सगळं करुन ही पुन्हा पाऊस वेळेवर पडेलच याची शाश्वती नाही, पिकांसाठी वापरलेली खते भेसळयुक्त नसतील याची ही खात्री
नाही, या सर्व बाबींचा शासनाने जरूर विचार करावा व या वाढलेल्या किंमती त्वरित कमी कराव्यात तरच बळीराजा यंदा आपल्या शेतातून चांगले उत्पादन काढुन देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावू शकतो, हे सरकारने गांभीर्याने लक्षात घ्यावे.
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत)
Post a Comment