(१८४१-१९१७)
मुस्लिमांच्या विकासासाठी शिक्षणाव्यतिरिक्त राजकीय सत्तेत भागीदारी अत्यंत आवश्यक आहे, असे मानणारे नवाब वकार-उल-मुल्क यांचा जन्म २४ मार्च १८४१ रोजी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे झाला. त्यांचे खरे नाव शेख मुश्ताक हुसेन होते. पारंपारिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते सरकारी शाळेत दाखल झाले. ज्या शाळेत त्यांचे शिक्षण झाले त्याच शाळेत ते शिक्षक झाले. नंतर त्यांनी ब्रिटिश सरकारमध्ये अधिकारी म्हणून काम केले. हैदराबादच्या निजामाने त्यांचा ‘नवाब मुश्ताक हुसेन वकार-उल-मुल्क’ ही पदवी देऊन गौरव केला. पुढे ते ‘नवाब वकार-उल-मुल्क’ म्हणून प्रसिद्ध झाले. १८६१ मध्ये त्यांची सर सय्यद अहमद खान यांच्याशी भेट झाली, त्यानंतर त्यांनी अलीगढमध्ये नंतर चालवल्या जाणाऱ्या मोहम्मडन अँग्लो-ओरिएंटल कॉलेजच्या उपक्रमांना मदत करण्यास सुरुवात केली. निजामाच्या नवाबांच्या निमंत्रणावरून त्यांनी १८७५ मध्ये प्रथम श्रेणीचे अधिकारी म्हणून हैदराबाद राज्याच्या सेवेत प्रवेश केला. निजामाने त्यांची प्रतिभा ओळखून त्यांना कायदा मंत्री म्हणून नियुक्त केले. त्यांनी १८७८ मध्ये न्यायपालिकेत सुधारणांबाबत सुचविलेल्या अहवालाबद्दल त्यांचे कौतुक झाले. नवाब वकार-उल-मुल्क यांनी निजाम सरकारच्या सेवेतून परतल्यानंतर त्यांच्या मूळ गावी अमरोहा येथे काही काळ घालवला आणि नंतर ते चळवळीत सामील झाले.
१९०० मध्ये नवाब मोहसीन-उल-मुल्क यांनी उर्दूच्या संरक्षणासाठी सुरू केलेल्या चळवळीत त्यांनी भाग घेतला. त्यांनी मुस्लिमांना सत्तेच्या राजकारणात सहभागी करून घेण्याची विनंती केली कारण ते त्यांच्या लोकशाही अधिकारांच्या पूर्ततेसाठी आवश्यक होते. त्यांनी १९०१ मध्ये मुहम्मडन अँग्लो-ओरिएंटल डिफेन्स असोसिएशनचे नूतनीकरण केले. नवाब वकार-उल-मुल्क हे मुस्लिम प्रतिनिधींपैकी एक होते ज्यांनी ऑक्टोबर १९०६ मध्ये मुस्लिमांना राजकीय प्रतिनिधित्व देण्याचे आवाहन करणारे निवेदन व्हाइसरॉय यांना दिले होते.
दरम्यान, ढाकाचे नवाब सलीमुल्लाह यांनी डिसेंबर १९०६ मध्ये ऑल इंडिया मोहम्मडन एज्युकेशनल कॉन्फरन्सचे आयोजन केले होते. ढाका परिषदेच्या समारोपाच्या दिवशी, नवाब सलीमुल्लाह यांनी प्रस्तावित केल्यानुसार ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली, ज्याला हकीम अजमल खान यांनी पाठिंबा दिला, मुस्लिम लीगच्या स्थापनेत नवाब वकार-उल-मुल्क यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तेव्हापासून त्यांनी आपले उर्वरित आयुष्य मुहम्मद अँग्लो-ओरिएंटल कॉलेज आणि ऑल इंडिया मुस्लिम लीगच्या विकासासाठी समर्पित केले. त्यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेतली नाही आणि मुहम्मडन अँग्लो-ओरिएंटल कॉलेज आणि ऑल इंडिया मुस्लिम लीगच्या कार्यात व्यस्त असतानाच नवाब वकार-उल-मुल्क यांचे २७ जानेवारी १९१७ रोजी निधन झाले.
लेखक : सय्यद नसीर अहमद
भाषांतर : शाहजहान मगदुम
Post a Comment