(६८) बरे तर काय तुम्ही यापासून अगदीच निर्भय आहात की अल्लाहने तुम्हाला एखादे वेळी खुश्कीवरच जमिनीत खचवावे किंवा तुमच्यावर दगडांचा वर्षाव करणारे वादळ पाठवावे आणि त्यापासून तुम्हाला वाचविणारा कोणीही संरक्षक सापडू नये?
(६९) आणि काय तुम्हाला याची भीती नाही की अल्लाहने पुन्हा एखादे वेळी तुम्हाला समुद्रात न्यावे आणि तुमच्या कृतघ्नतेबद्दल भयंकर वादळी वारा पाठवून तुम्हाला बुडवून टाकावे आणि तुमच्या या दुर्दशेची खबरबात विचारणारा कोणीच सापडू नये,
(७०) ही तर आमची मेहरबानी आहे की आम्ही आदमच्या संततीला (मानवजातीला) मोठेपण दिले आणि त्यांना खुश्की व जलमार्गावर वाहने दिली आणि त्यांन्ाा निर्मल पदार्थाचे अन्न दिले व आपल्या बर्याचशा निर्मितीवर स्पष्ट श्रेष्ठत्व प्रदान केले.
(७१) मग विचार करा त्या दिवसाचा जेव्हा आम्ही प्रत्येक मानवगटाला त्याच्या नेत्यासह बोलवू. त्या वेळी ज्या लोकांना त्यांचा कृति-लेख उजव्या हातात दिला गेला ते आपली कार्यनोंद वाचतील आणि त्यांच्यावर तिळमात्रदेखील अन्याय होणार नाही.
(७२) आणि जो या जगात अंध बनून राहिला तो परलोकातसुद्धा नेत्रहीनच राहील, किंबहुना मार्गप्राप्तीत नेत्रहीनाहूनदेखील अधिक अपयशी.
(७३) हे पैगंबर (स.)! या लोकांनी या प्रयत्नांत कोणतीही उणीव राहू दिली नाही की तुम्हाला उपद्रवात टाकून त्या दिव्य प्रकटनापासून परावृत्त करावे, जो आम्ही तुमच्याकडे पाठविला आहे जेणेकरून तुम्ही आमच्या नावाने स्वत:कडून एखादी गोष्ट रचावी. जर तुम्ही असे केले असते तर त्यांनी जरूर तुम्हाला आपले मित्र बनविले असते.
७४) आणि जर आम्ही तुम्हाला दृढ ठेवले नसते तर शक्य होते, तुम्ही त्यांच्याकडे काही न काही अंशी झुकला असता.
Post a Comment