Halloween Costume ideas 2015

कुरआन आणि वनस्पतीशास्त्र (भाग २६)

नानाविध प्रकारचा भाजीपाला



भारतासारख्या कृषीप्रधान देशात अन्न आणि आहार हा नेहमीच महत्त्वाचा मुद्दा असतो. तसेच शाकाहार आणि मांसाहार हाही वादाचा विषय बनलेला असतो. वैज्ञानिकदृष्ट्या अंडी, दूध, मांस आणि भाजीपाला यांचे आपल्या शरीरात आपापले वेगळे महत्त्व आहे. माणसाच्या इतिहासातही माणूस मांसाहारी असल्याचे पुरावे आढळतात. मात्र शेतीच्या विकासासोबत जिभेचे चोचले सुद्धा विकसित झाले. ती तृष्णा मिटविण्यासाठी भाजीपाला आणि मसाल्यांची शेती सुरू झाली आणि स्वयंपाकघरात भाजीपाल्याने आपले स्थान मिळवले.

मराठी विश्वकोशानुसार अल्पायू व नरम देठाच्या, औषधीय वनस्पतीच्या ताज्या व खाद्य भागांना भाजीपाला असे म्हटले जाते. हे खाद्य भाग म्हणजे मूळ, खोड, पाने, फुले व फळे असतात. हे खाद्य भाग ताज्या स्थितीत अगर त्यांवर प्रक्रिया करून खाण्यासाठी वापरण्यात येतात. निरनिराळ्या खाद्य भागांच्या आधारावर भाजीपाला पुढीलप्रमाणे विभागला जाऊ शकतो.

१) मूळ : जमिनीखाली पाणी शोषणाऱ्या भागात वनस्पती जेव्हा अन्न साठवून ठेवतात तेव्हा ते मूळ भाजी म्हणून वापरल्या जाते. उदा. बीट, गाजर, रताळे, मुळा.

२) खोड : जमिनीखाली किंवा जमिनीच्या तळाशी अन्नाचा साठा करून एक फुगीर खाद्य भाग काही वनस्पती तयार करतात. तो सुद्धा भाजी म्हणून वापरल्या जातो. उदा. बटाटा, सुरण, नवलकोल, आर्वी किंवा अळूचे गड्डे, गोराडू.

३) कंद : कांदा, लसूण या वनस्पती आपल्या पानांच्या तळाशी अन्नाचा साठा करून कंद तयार करतात, तोच खाद्य भाग असतो.

४) पाने : कोबी, पालक, घोळ, अळू, मेथी, चाकवत इत्यादींसमवेत भारतात २०० पेक्षा जास्त वनस्पतींच्या पानांचा भाजीसाठी वापर केला जातो.

५) फुले : फुलकोबी, अगस्ता किंवा हदगा, केळफूल, शेवगा यांच्या तर फुलांचीच भाजी केली जाते.

६) अपक्व फळे : वांगी, काकडी, शेवगा, मिरची, गवार, भेंडी, पडवळ, कारले वगैरे वनस्पतींची फळे किंवा शेंगा कच्च्या अवस्थेत म्हणजे अपक्व अवस्थेत तोडून भाजीसाठी वापरल्या जातात.

७) पक्व फळे : टोमॅटो, लाल भोपळा या फळभाज्या पूर्णपणे पिकलेल्या अवस्थेत भाजी म्हणून वापरतात.

८) बिया : वाटाणा, घेवडा, वाल यांसारख्या वनस्पतींच्या कोवळ्या किंवा परिपक्व बियांचा वापर भाजी म्हणून केला जातो.

९) यांशिवाय बांबूच्या झाडांचे कोवळे अंकूरही काही लोक भाजीसाठी वापरतात.

या सर्व प्रकारच्या भाजीपाला पिकांनी आधुनिक शेतीला योगदान मिळत आहे. एकीकडे शेतीतले अत्यल्प उत्पन्न, तोकडा नफा, जमीन धारणेतली घट या कारणांस्तव ग्रामीण भागातले तरुण उदरनिर्वाहासाठी बिगरशेती व्यवसायांकडे वळत आहेत किंवा रोजगारासाठी शहरांकडे स्थलांतर करत आहेत, तर दुसरीकडे काही तरुण चांगली नोकरी सोडून शेती करत असल्याचं चित्र दिसत आहे. हे तरुण शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भरपूर उत्पादन घेत वर्षाला भरपूर पैसे कमावत आहेत.

कुरआनमध्ये भाजीपाल्याबद्दल माहिती शोधताना बनी इस्राईल समुदायाचा एक प्रसंग अध्याय अल्-बकराच्या आयत ६१ मध्ये आढळतो.

"आठवण करा जेव्हा, तुम्ही सांगितले होते की, 'हे मूसा, आम्ही एकाच प्रकारच्या अन्नाचा उपभोग घेऊन संयम करू शकत नाही. आपल्या पालनकर्त्याकडे याचना करा की आमच्यासाठी जमिनीमधून पिके, भाजीपाला, गहू, लसूण, कांदा, डाळी वगैरे उत्पन्न करावे.' तेव्हा मूसा (अ.) ने सांगितले, 'एका उत्तम प्रकारच्या वस्तूऐवजी तुम्ही कनिष्ठ दर्जाच्या वस्तू घेऊ इच्छिता?'......"

या आयतीची पार्श्वभूमी जरी वेगळी असली तरी या प्रसंगावरून हे लक्षात येते की भाजीपाल्याचे महत्त्व मानवी जीवनात वर्षानुवर्षांपासून होते आणि आज त्यांचे स्थान स्वयंपाकघरात पक्के झाले आहे. पण आपल्या जीवनाचा मूळ उद्देश फक्त खाणे-पिणे तसेच शेतीच्या माध्यमातून विरंगुळा करणे हा तर नक्कीच नाही.

(क्रमशः)


- डॉ. हर्षदीप बी. सरतापे

मो. ७५०७१५३१०६


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget