(१८७२-१९१७)
मौलवी अब्दुल रसूल यांनी बंगालच्या विभाजनाला विरोध करणार्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. त्यांचा जन्म १८७२ मध्ये झाला. त्यांचे वडील मौलवी गुलाम रसूल हे बंगालमधील जमीनदार होते. अब्दुल रसूल १८८९ मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले, तेथून त्यांनी १८९८ मध्ये कायद्याची पदवी प्राप्त केली. पदवी प्राप्त करणारे ते पहिले बंगाली होते.
त्यांनी बंगालच्या फाळणीला कडाडून विरोध केला आणि फाळणीविरोधी चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आणि लॉर्ड कर्झनच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला. तेव्हापासून त्यांनी स्वातंत्र्यसैनिक म्हणून नव्या आयुष्याला सुरुवात केली. बंगालच्या फाळणीला विरोध करण्यासाठी ७ ऑगस्ट १९०५ रोजी कलकत्त्याच्या टाऊन हॉलमध्ये झालेल्या सभेत ते सहभागी झाले होते. नंतर, त्यांनी आपला कायदेशीर व्यवसाय सोडला आणि स्वतःला भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी पूर्णपणे समर्पित केले.
त्यांनी लॉर्ड कर्झनच्या चुकीच्या कृत्यांवर टीका करण्यासाठी संपूर्ण बंगालमध्ये अनेक सभा आयोजित केल्या. बंगालच्या फाळणीला विरोध करण्याची गरज त्यांनी लोकांना समजावून सांगितली आणि हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील मजबूत सौहार्दपूर्ण आणि मैत्रीपूर्ण संबंधांसाठी काम केले. ब्रिटिश सरकारविरुद्ध प्रचार सहन न झाल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला.
अब्दुल रसूल यांनी टीका केली की, ब्रिटिश राज्यकर्त्यांनी ज्याप्रमाणे बंगालचे विभाजन केले त्याचप्रमाणे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. ब्रिटीश सरकारने त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकले आणि त्यांना अनेक वेळा तुरुंगात टाकले.
अब्दुल रसूल यांनी ‘स्वदेशी धोरण’ स्वीकारले आणि घरगुती वस्तूंच्या वापरास प्रोत्साहन दिले. त्यांनी मुस्लिमांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी ‘बंगाल मोहम्मडन असोसिएशन’ सारख्या अनेक संघटना स्थापन केल्या ज्याद्वारे त्यांनी धर्मनिरपेक्षतेच्या विचारधारेचा प्रसार केला.
मार्च १९०७ मध्ये जेव्हा जातीय दंगली उसळल्या तेव्हा त्यांनी त्या सर्व ठिकाणांना भेट दिली आणि हिंदू-मुस्लिमांच्या परस्पर सुरक्षेसाठी ‘राखी बंधन’ कार्यक्रमाचे आवाहन केले. अब्दुल रसूल यांनी १९१६ मध्ये अॅनी बेझंट यांनी सुरू केलेल्या होमरूल चळवळीतही महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांना या चळवळीशी इतका लगाव होता की, होमरूल चळवळीचे प्रतीक कोरलेले त्यांच्या मनगटावरील घड्याळा त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याबरोबर दफन करण्यात यावे अशी त्यांची इच्छा होती. मौलवी अब्दुल रसूल यांचे सप्टेंबर १९१७ मध्ये त्यांची शेवटची इच्छा जाहीर केल्यानंतर अचानक निधन झाले.
लेखक : सय्यद नसीर अहमद
भाषांतर : शाहजहान मगदुम
Post a Comment