(७९) मध्यरात्री ‘तहज्जुद’ (विशिष्ट नमाज) पठण करा,३५ ही तुम्हासाठी ‘नफ्ल’ (अतिरिक्त) आहे जेणेकरून तुमच्या पालनकर्त्याने तुम्हास स्तुत्यस्थानावर आरूढ करावे.३६ (८०) आणि प्रार्थना करा, ‘‘हे पालनकर्त्या! मला जेथे कोठे तू नेशील सत्यानिशी ने आणि जेथून काढावयाचे असेल, सत्यानिशी काढ आणि आपल्याकडून एका सत्ताधिकार्यास माझे साहाय्यक बनव.३७
(८१) आणि घोषणा कर की, ‘‘सत्य आले आणि असत्य नष्ट झाले, असत्य तर नष्ट होणारच आहे.’’
(८२) आम्ही या कुरआनच्या अवतरणक्रमात ते काही उतरवित आहोत जे त्याच्या अनुयायांसाठी तर रोगनिवारक आणि कृपा आहे, परंतु अत्याचार्यांकरिता हानीव्यतिरिक्त अन्य कोणत्याच गोष्टीत वाढ करीत नाही.
३५) ‘तहज्जुद’चा अर्थ झोप मोडून उठणे असा होतो. म्हणून रात्रीच्या वेळी तहज्जुद करण्याचा अर्थ असा की रात्रीचा एक भाग झोपेत काढल्यानंतर मग उठून नमाज अदा केली जावी.
३६) म्हणजे या जगात व परलोकात तुम्हाला अशा दर्जावर पोहचवावे जेथे तुम्ही निर्मितीकरवी स्तुत्य बनून राहावे. चोहीकडून तुम्हावर प्रशंसा आणि वाखाणणीचा वर्षाव व्हावा आणि तुमचे अस्तित्व एक प्रशंसनीय अस्तित्व ठरावे.
३७) म्हणजे एकतर खुद्द मलाच सत्ता प्रदान कर किंवा एखाद्या सत्तेला माझी साहाय्यक बनव जेणेकरून, तिच्या शक्तीने मी जगातील हे बिघाड दुरुस्त करू शकेल, अश्लीलता आणि अवज्ञेचे हे महापूर थोपवू शकेल व तुझा न्यायपूर्ण कायदा प्रचलित करू शकेल
Post a Comment