इतिहासात बऱ्याच घटना घडत असतात. काहींची दखल घेतली जाते, काही घटनांकडे दुर्लक्ष केले जाते. ज्या घटनांची दखल घेतली जाते त्या घटनांमधील पात्र हे ठरवत असतात की त्या घटनांचा इतिहास कोणत्याही राष्ट्राच्या राजकीय, सामाजिक एकूणच तत्कालीन व्यवस्थेवर कोणते दूरगामी परिणाम होणार आहेत ज्यामुळे हा इतिहास बऱ्याच अंशी, बराच काळ जीवंत ठेवला जातो. जे पात्र त्या इतिहासाला कारणीभूत ठरले होते, लोकांकडून ही दखल घेतली जात असते की पुढचा किती काळ या इतिहासाला जीवंत ठेवायचे आहे. म्हणजे जो इतिहास घडला आणि त्या इतिहासाला किती काळ स्मरणात ठेवायचे आहे यामागे काही ऐतिहासिक उद्दिष्टे असतात. त्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी तो इतिहास जीवंत ठेवला जातो. पण त्या कोणत्या शक्ती असतात, त्यांचे लक्ष्य कोण असतात त्याची माहिती तत्कालीन आणि त्यानंतर येणाऱ्या सर्वकालीन मानवांना होत नसते, कारण ती माहिती लोकांपर्यंत पोचवायची नसते. यामागे काही विशेष शक्ती, जनसमूह गुंतलेले असतात ज्यांचे उद्दिष्ट या इतिहासांतर्गत घटनांशी जुळलेले असते, जेणेकरून त्यांनी ठरवलेल्या सगळ्या स्वप्नांना, उद्दिष्टांना साकारले जावे. या घटना घडवल्या जात असताना कुणी याची पर्वा करत नसतो की यामागे कोण आहेत आणि त्यांना नेमके काय हवंय.
सन १९७५ मध्ये भारतात आणीबाणी लादण्यात आली ही अशीच एक घटना असेल ज्यावर कुणीही आजवर सखोल विचार केला नाही की बऱ्या प्रमाणात यावर चर्चा झालेली दिसत नाही. काही इतिहासकार, पत्रकारांनी आपल्या परीने आणीबाणीविषयी लेख, पुस्तके लिहिली आहेत, प्रकाशित केलेली आहेत. पण या साहित्याद्वारे आणीबाणीचे खरे उद्दिष्ट भारतात आणीबाणी लादण्यात कोणत्या शक्ती कार्यरत होत्या यावर प्रकाश पडत नाही.
आणीबाणीपूर्वी काही घटना घडत होत्या. जसे गुजरातमधील चिमनभाई पटेल सरकारविरुद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपांची मोहीम सुरू झाली आणि या मोहिमेची परिणती आणीबाणीत झाली. ही गोष्ट १९७४ सालची आहे. नवनिर्माण नावाची अगोदर विद्यार्थ्यांनी एक चळवळ उभारली आणि नंतर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध भ्रष्टाचारविरोधी आंदोलन सुरू झाले. या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याचे लक्षात येताच मुख्यमंत्री चिमनभाई पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांच्या नवनिर्माण संघटनेने आंदोलन इथेच थांबवायला हवे होते, कारण त्यांची मागणी मान्य करून चिमनबाई पटेल सरकारला संपवण्यात आले होते. तसे झाले नाही. हे आंदोलन चालूच राहिले. यानंतर या आंदोलनाने थेट बिहारकडे लक्ष वळवले. असे म्हटले जाते की तिथल्या विद्यार्थ्यांनी नवनिर्माण संस्थेशी प्रेरणा घेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वात छात्रसंघर्ष समितीची स्थापना केली. याचा अर्थ काय? गुजरातमधील चळवळीचा मुख्यत्वे राज्यातील सरकारविरोधात असलेल्या, बिहारच्या विद्यार्थ्यांचा संबंध का आला, कुणी जुळवला आणि कुणी प्रेरणा दिल्या? आणीबाणीची ही पटकथा तयार होत होती का? असा प्रश्न उपस्थित होतो. १८ मार्च रोजी विद्यार्थ्यांनी राज्याच्या विधानसभेकडे मार्च केले. जाळपोळीच्या घटना घडल्या. यात काही विद्यार्थ्यांचा जीव गेला. विद्यार्थ्यांनी जयप्रकाश नारायण यांना या चळवळीचे नेतृत्व करण्याची विनंती केली. अचानक जयप्रकाश नारायण यांचे नाव लक्षात आले की या पटकथेतील ते पूर्वीपासूनच पात्र होते? जयप्रकाश नारायण यांनी हे मान्य केले आणि यानंतर या मोहिमेचे नाव जेपी आंदोलन असे झाले. याच घटनांमधील एक श्रृंखला म्हणून समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी अखंड भारत रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन छेडले. नवनिर्माण संघटनेशी फर्नांडिस यांचा कसा संबंध आला आणि का? ह्याचे आजवर उत्तर मिळालेले नाही. ही घटना मे १९७४ मधील आहे. वरकरणी समजवादी नेत्यांचे गुजरातच्या नवनिर्माण संघटनेशी कोणता संबंध कधी स्थापित झाला होता हे कळले नाही. तिकडे जॉर्ज फर्नांडिस यांनी रेल्वे बंदची घोषणा केली, इकडे जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीची घोषणा केली. या संपूर्ण क्रांतीचे उद्दिष्ट कोणते, कधी ते ठरवले गेले हे आजवर कळले नाही. जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीची ही घोषणा पाटना येथील गांधी मैदान येथे आयोजित एका जाहीर सभेत केली होती. आणि नंतर लागोपाठ देशाच्या इतर भागांत अशाच जाहीर सभा घेण्यात आल्या. संपूर्ण क्रांतीनंतर आता “सिंहासन खाली करो कि जनता आती है“ अशा घोषणा द्यायला सुरुवात झाली. म्हणजे गुजरातमधील चिमनभाई पटेल सरकारद्वारे संपूर्ण देशापर्यंत मजल गेली. ५ जून १९७५ ला जेपी यांनी संपूर्ण क्रांतीची घोषणा केली होती. १२ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरुद्ध अलाहाबाद उच्च न्यायालयातील खटल्यात न्यायाधीश जगमोहनलाल सिन्हा यांनी निकाल दिला. निवडणुकीत गैरव्यवहारासाठी इंदिरा गांधी यांना दोषी ठरवले गेले होते.
इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव सुरू झाला. जयप्रकाश नारायण यांनी पोलीस दलाला सांगितले की त्यांनी सरकारच्या अएनैतिक आदेशांचे पालन करू नये. याचा अर्थ काय? सरकारचे आदेश नैतिक अनैतिक असू शकतात की प्रशासकीय असतात? इंदिरा गांधी यांनी शेवटी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणीची घोषणा केली. अशा प्रकारे गुजरातमध्ये सुरू झालेल्या एका आंदोलनाने देशाला आणीबाणीच्या खाईत लोटले! नितीश, यादव आणि समाजवाद्यांचा गुजरातशी जुना संबंध आहे.
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक
मो. : 9820121207)
Post a Comment