खरे तर आपल्या गावाचं, शहराचं, राज्याचं, देशाच्या विकासाचं भविष्य आपण निवडणुकीच्या माध्यमातून ठरवत असतो. मात्र हल्ली निवडणुका आल्या की, उत्साहाच्या जागी आता चिंता वाटायला लागली आहे. देशातील अनेक पक्ष आता जातीयवाद आणि धर्मवादाच्या आजाराने ग्रस्त झाले आहेत. सोबतच त्यांनी मोठ्या प्रमाणात जनतेलाही आपलसं बनवलं असल्याचे पहायला मिळत आहे. हल्ली आता कुठल्याही निवडणुका असोत राजकीय पक्षांचे काही पदाधिकारी विकासाऐवजी विनाशाचीच भाषा बोलताना पहावयास मिळत आहेत. त्यामुळे निवडणुका आल्या की संवदेनशील व्यक्ती चिंताग्रस्त होताना पहायला मिळत आहेत.
आपण क्वचितच पहायले असेल की, अतिक्रमणामुळे दंगल घडली असेल. मात्र असे झाले आहे. नुकतेच विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या नावावरून काही धर्मांधानी दंगल घडवून आणली. मुस्लिम समाजाला टार्गेट केले. दंगेखोरांचा आणि गजापूर येथील नागरिकांचा कधी साधा व्यवहारही झालेला नसेल अथवा त्यांनी एकमेकांना पाहिलेही नसेल. तरी परंतु, मुस्लिम वस्त्यांवर दंगेखोरांनी हल्ला चढविला. तेथील मस्जिदीची तोडफोड केली. वाहने जाळली, असे का बरे केले असेल. तर चिंतनाअंती आणि समाजमाध्यमांवर होत असलेल्या चर्चेअंती असे निदर्शनास येते की, निवडणूक जवळ आली आहे. नागरिकांनी जागल करायला हवी. निवडणुकीच्या तोंडावर दंगे करून मतांची विभागणी करावी, असा उद्देश काहींचा असू शकतो. दंगेखोरांनी छत्रपती शाहूंच्या शांततेच्या नगरीला टार्गेट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी आता जागल करायला हवी, चांगल्या विचारांची गावोगावी पेरणी करायला हवी. महापुरूषांचा विचार अंगी बाळगायला हवा आणि निवडणुका व्यवस्थित पार पाडायला हव्यात.
- बशीर शेख.
Post a Comment