अल्लाहच्या हजारो पैगंबरांनी कयामत म्हणजे न्यायाचा दिवस येणार असल्याची खात्री दिली, पण विरोधकांनी नेहमीच ते अमान्य केले. माणसाला न्यायाच्या दिवसावर विश्वास ठेवण्याचे किंवा नाकारण्याचे स्वातंत्र्य आहे, परंतु वस्तुस्थिती ही आहे की मृत्यू येताच माणसाला त्या सत्याची जाणीव होऊ लागते जी तो नाकारत होता.’’व जा’अत् सक्-रतुल्-मवति बिल्-हक्कि, ज़ालि-क मा कुन्-त मिन्हु तहीदु.’’ अनुवाद :- आणि मृत्यूकळा सत्यासह प्रकट होईल, हेच ते ज्यापासून तू पळ काढत होतास. ( 50 कॉफ : 19 ) मृत्यूसमयी जीव निघण्याची वेळ तो प्रारंभ बिंदू आहे जिथून मरणोत्तर जीवनातील वास्तविकता समोर येण्यास सुरुवात होते. ज्याच्यावर सांसारिक जीवनात पडदा पडलेला असतो. त्या क्षणापासून माणसाला ते दुसरे जग स्पष्टपणे दिसू लागते, ज्याची खबर पैगंबरांनी दिली होती. इथूनच माणसाला परलोक पूर्णत: सत्य असल्याचे कळते. मृत्यूचे देवदूत समोर दिसतात. आत्तापर्यंत अदृश्य असलेल्या त्या गोष्टी दिसू लागतात, ज्यांवर विश्वास ठेवायला माणसाने नकार दिला होता. त्या गोष्टी वास्तव म्हणून समोर आहेत हे त्याला चांगलेच कळते आणि मरणोत्तर जीवन आणि कयामतचा दिवस, ज्यांना तो अशक्य समजत होता तेही सत्य असल्याचा विश्वास आता बसतो. याबरोबर जीवनाच्या या दुसऱ्या टप्प्यात तो भाग्यवान म्हणून दाखल होत आहे की अभागी हेही त्याला कळते. माणूस मृत्यूपासून दूर पळतो किंवा या विषयावर बोलणे टाळतो. हे संपूर्ण मानवजातीत नैसर्गिकरित्या आढळते. माणसाला जीवन प्रिय असते आणि तो मृत्यूला आपत्ती मानतो, म्हणून ते टाळण्याचा प्रयत्न करतो पण हा विषय कितीही टाळला, यापासून कितीही पळून जावेसे वाटले तरीही एक ना एक दिवस मृत्यू येणारच आहे. त्यामुळे शहाणा माणूस तोच आहे जो मृत्यू येण्यापूर्वीच त्याची तयारी करतो.
..... क्रमशः
- अब्दुल कय्यूम शेख अहमद.
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment