डाळिंब - आनंद देणारे फळ
जैवविविधतेत सपुष्प आवृत्तबिजी वनस्पतींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण वनस्पतींच्या उत्क्रांतीमध्ये हा गट परमस्थानी आहे. वेगवेगळ्या परिस्थितीत वाढ, विकास आणि प्रजनन होण्यासाठी या गटात अनेक अंतर्गत आणि बाह्य गुणधर्मांची वाढ झाली. याबरोबरच बियांच्या प्रसारासाठी फळांची उत्क्रांती ही फार मोठी नैसर्गिक क्रांती ठरली. ही उत्क्रांती बियांना फळांमध्ये झाकण्यावरच संपली नाही. रंग, आकार, बियांच्या प्रसाराचे माध्यम इत्यादींच्या आधारावर फळांच्या विविधतेत फारच वाढ झाली आणि जैवविविधतेचा खुप मोठा भाग फळे येणाऱ्या सपुष्प वनस्पतींनी व्यापला. त्यातुनच फळांचे अनेक प्रकार समोर आले.
फुलातील एकाच अंडाशयापासून एकच फळ तयार होत असल्यास़, अशा फळाला ‘साधे फळ’ म्हणतात. ते शुष्क किंवा मृदू असू शकते.
शुष्क फळांचे परिपक्व होऊन वाळल्यावर त्याच्या फुटण्याच्या आधारावर स्फुटनशील, अस्फुटनशील किंवा अर्धस्फुटनशील असे उपप्रकार पडतात.
मृदू फळे एकअंडपी किंवा बहुअंडपी, संयुक्त व ऊर्ध्वस्थ अंडाशयापासून तयार होतात. त्यांची फलभित्ती जाड व मऊ असून पिकल्यावर फुटत नाही. गरामध्ये एक किंवा अनेक बिया असतात. अंत:फलभित्तीचे स्वरूप व बियांची संख्या यांनुसार त्यांचे सात उपप्रकार होतात. १) आठोळीयुक्त (ड्रूप) उदा. आंबा, काजू; २) अनष्ठिल (बेरी) उदा. वांगे, टोमॅटो; ३) कर्कटी (पेपो) उदा. काकडी, कलिंगड; ४) उत्कोलक (पोम) उदा. सफरचंद, नासपती; ५) नारंगक (हेस्पिरीडियम) उदा. लिंबू, मोसंबी; ६) घनकवची मृदुफळ (अँफिसराका) उदा. बेल, कवठ आणि ७) दाडिम (बॅलुस्टा) उदा. डाळिंब.
येथे आपण डाळिंब या मृदु फळाविषयी चर्चा करू. हे दाडिम प्रकारचे फळ असून या फळामध्ये फलभित्ती जाड व चामड्यासारखी असून आत कप्पे असतात. हे कप्पे पातळ पडद्यांनी विभागलेले असतात व प्रत्येक कप्प्यांमध्ये अनेक रसाळ बिया असतात. krishi.maharashtra.gov.in
या महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटनुसार डाळींबाची लागवड फार प्राचीन काळापासून म्हणजे इ.स. पुर्व ३५०० वर्षापूर्वी झाल्याचा उल्लेख आढळून येतो; डाळींबाचे उगमस्थान इराण असून २००० वर्षापासून डाळींबाची लागवड केली जात होती असे आढळते. इराण प्रमाणेच स्पेन, इजिप्त, अफगाणिस्थान, मोराक्को, बलूचीस्थान, पाकीस्तान, इराक, ब्रम्हदेश, चीन, जपान, अमेरिका, रशिया, भारत या देशांमध्ये लागवड केली जाते.
डाळींबाच्या रसात १० ते १६% साखरेचे प्रमाण असते. ही साखर पचनास हलकी असते. फळांमध्ये ७८.२% पाणी, १.६% प्रथिने, ०.१% स्निग्ध पदार्थ, ५.१% तंतुमय पदार्थ, १४.५% पिष्टमय पदार्थ आणि ०.७% खनिजे आढळतात. कुष्ठरोगावर डाळींबाचा रस गुणकारी आहे. त्याचप्रमाणे फळांची साल अमांश व अतिसार या रोगांवर गुणकारी आहे. कापड रंगविण्यासाठीसुध्दा फळांच्या सालीचा उपयोग केला जातो. अवर्षण प्रवण भागामध्ये हलक्या जमिनीत व कमी पावसावर तग धरणारे हे झाड आहे. त्यामुळे या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात मोठी वाढ होत आहे.
एवढ्या गुणकारी वनस्पतीचा उल्लेख कुरआनमध्ये कसा असणार नाही. अध्याय अर्-रहमानच्या आयत क्रमांक ६८ मध्ये स्वर्गीय कृपांविषयी सांगताना म्हटले आहे,
"...त्या दोन्ही (बागां) मध्ये फळे, खजुरी आणि डाळिंब असतील."
याचे स्पष्टीकरण देताना मौलाना अब्दुर्रहमान क़ीलानी आपल्या तय्-सीरुल कुरआनमध्ये म्हणतात,
मुळ अरबी शब्द फकीहा म्हणजे शारीरिक आनंद, आनंदीपणा आणि हसणे हसविणे तसेच फिकह म्हणजे एखाद्याला फळे खाऊ घालणे आणि एखाद्याला गोड बोलण्याने आनंदी करणे आणि फवाका म्हणजे ज्या फळांचा मुख्य उद्देश भूक मिटवणे नसून मजा आणि आनंद मिळवणे आहे. त्यानंतर येथे खजुरींचा उल्लेख केला आहे ज्या पाण्यासोबत पूर्ण अन्न बनतात. मग पाण्याऐवजी डाळिंबाचे पाणी खजुरात मिसळले तर सर्व उद्दिष्टे साध्य होतात. खाणे, पिणे आणि आनंद मिळवणे.
सत्कर्मांच्या बदल्यात चांगला मोबदला मिळेल हे स्पष्ट करताना येथे मोबदल्यात मिळणाऱ्या बागेंविषयी सांगितले जात आहे. अरब लोक डाळिंबाला अगदी जवळून ओळखत. डाळिंब त्यांच्या खाण्यापिण्याची आणि मेजवानीतील महत्त्वाची वस्तू होती. अशा प्रकारे कुरआनमध्ये विविध फळांसमवेत डाळिंबाला स्थान दिले गेले आहे.
(क्रमशः)
- डॉ. हर्षदीप बी. सरतापे
मो. ७५०७१५३१०६
Post a Comment