कोल्हापूर (अशफाक पठाण)
विशाळगडावरील घटनेचे तथ्य जाणून घेण्यासाठी 21 आणि 22 जुलै 2024 रोजी असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हील राईट्स आणि सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझम या संस्थांनी संयुक्तपणे विशाळगट, गजापूर येथे भेट दिली. यावेळी मुंबई येथील सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझमचे संचालक इरफान इंजिनिअर, ए.पी.सी.आरचे राज्य अध्यक्ष असलम गाझी, मुस्लिम नुमाईंदा कौन्सिल औरंगाबदचे मेराज सिद्दीकी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया पार्टीचे अभय टक्साळ, शिक्षक प्रीतम घनघावे, सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझमचे प्रतिनिधी मिथिला राऊत, जमाअतचे राज्यसचिव मजहर फारुकी, जमाअते इस्लामी हिंद जालनाचे सचिव अब्दुल मुजीब, जेआयएच कोल्हापूरचे सदस्य इस्माईल शेख, एसआयओ साउथ महाराष्ट्राचे पीआर मीडिया सेक्रेट्री अशफाक पठाण यांचा सहभाग होता.
यावेळी प्रतिनिधी मंडळाने गजापूरमध्ये घटलेेल्या घटनेचे बळी पडलेल्या लोकांशी संवाद साधला. विशेष करून शिराज कासम प्रभुलकर, 300 वर्षाचा इतिहास असलेल्या रजा जामा मस्जिद ट्रस्ट चे अध्यक्ष आणि इतर ग्रामस्थांची भेट घेतली. तसेच कोल्हापूर शहरातील काही मान्यवर मंडळींच्याही भेटी या शिष्टमंडळाने घेऊन त्यांच्याशी घडलेल्या घटनेबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
या भेटीत खालील बाबी आढळून आल्या.
1. हा हल्ला पूर्व नियोजित हल्ला होता. गजापूर गावातील मुस्लिम लोक तेथील स्थानिक आहेत, त्यांनी जमीनी अनधिकृतरित्या बळकावलेल्या नाहीत, त्यांच्याकडे जमिनीचे, घराचे कागदपत्र आहेत, मशीदीचेही कागदपत्र आहेत. मोठ्या प्रमाणावर या गावातील मुस्लिम पुरुष मुंबई व इतर ठिकाणी नोकरी, व्यवसाय करतात. सणासुदीला कुटुंबातील व्यक्तींना भेटण्यास येतात. त्यांचा आणि विशाळगडावरील अनधिकृत स्टॉलशी काहीच संबंध नाही.
2. हल्लेखोरांच्या हातात, तलवार, हातोडे, सब्बल होती.
3. हल्ला करण्याचे कारण राजकीय आणि सांप्रदायिक दिसतं. कारण विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना हा हल्ला झाला आणि मुस्लिम समुदायातील लोकांवर जाणून बुजून हल्ला झाला; ज्यांचा अतिक्रमणाशी काहीच संबंध नाही. गजापूर हे गाव विशाळगडापासून 5 किमी दूर आहे. त्यांच्यावर हल्ला मुस्लिम असल्यामुळेच केला गेला.
4. अतिक्रमण करणारे सगळे बाहेरचे लोक होते. स्थानिक व्यक्ती नारायण पांडुरंग वेल्हाल यांच्या घरी अगोदर रवींद्र पडवळ यांच्या पुढाकाराने काही मीटिंग झाल्या होत्या, ज्यांचे नाव एफआयआरमध्ये देखील नमूद आहे.
5. एफ.आय.आर मध्ये नारायण पांडुरंग वेल्हाल यांचे नाव दिले असता पोलिसांनी ते घेतले नसल्याचे समोर आले.
6. पोलिसांनी जो बंदोबस्त करायला पाहिजे होता तेवढा त्यांनी दक्षता घेतली नाही. पोलिसांनी त्या वेळेसच नाकाबंदी केली पाहिजे होती. पोलिसांनी दक्षतापूर्वक कर्तव्य बजावले नाही. त्यांच्या निष्काळजीपणामुळे गजापूर गावातील घरे आणि दुकाने मिळून 41 आणि 300 वर्षे जुनी एक मजीद असे एकूण 42 वास्तूंची तोडफोड केली गेली. तसेच 51 वाहने त्यात 17 चार चाकी आणि 34 दुचाकी वाहनांचे नुकसान झाले. हा हल्ला काही लोकांच्या मते सकाळी 11 तर काहींच्या मते दुपारी 12.30 ते सायंकाळी 5 एवढ्या दीर्घ कालावधीत चालू होता. एका घरातील नव्वद हजार रूपये, सहा तोळे सोने लुटले. दुसऱ्या दोन घरातील प्रत्येकी 3 तोळे सोने आणि काही पैसे लुटले. धान्य, कडधान्ये फेकून टाकले. टी. व्ही, कपाटे, फ्रिज, लाईट कने्नशन असे जे मिळेल त्याची नास धुस केली गेली. कुरानच्या प्रती जाळण्यात आल्या. मशीदीची तोडफोड केली आणि कब्रस्तान चे कुंपण तोडले. ज्या घरातील लोकांनी मिरवणुकीत जाताना पाणी मागितल्यावर पाणी दिले, पाऊस होता म्हणून छत्री आणि रेनकोट दिले त्याच घरात दोन सिलिंडरचा स्फोट केला. मिरवणुकीमध्ये पंधरा हजार लोक होते पण अंदाजे पंधराशे लोकांनी हल्ला केला.
7. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ल्याचा निषेध न करता, विशाळगडावरून अतिक्रमण हटवण्याचे आश्वासन दिले आणि 15 जुलैला वर्तमानपत्रात नमूद केल्या नुसार विशाळगडावरील 35 अनधिकृत दुकाने तोडली.
8. हिंसक जमावाने पोलिसांवर देखील हल्ला केला. त्यात 11 पोलीस कर्मचारी जखमी झाले. मुस्लिम समुदायातील लोक जंगलात पळून गेले होते म्हणून वाचले. नाहीतर जीवघेणा हल्ला झाला असता. रहिवाशी याकूब मोहम्मद प्रभुलकर अपंग असल्यामुळे त्यांना पळता येत नव्हते त्यांनाही दंगेखोरांनी मारहाण केली. त्यांच्या पायाला दोन आणि हाताला एक फ्रॅक्चर झाले. जे आता मिरज शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे.
9. संजय पाटील, राजू कांबळे, मंगेश कांबळे, पांडुरंग कोंडे, मारुती निबले, चंद्रकांत कोकरे असे सर्वच समाजाचे लोक संध्याकाळी गजापूर गावातील मुस्लिम लोकांना धीर देण्यासाठी आले व त्यांच्यासाठी जेवण देखील घेऊन आले होते.
प्रतिनिधी मंडळाच्या मागण्या...
01 सर्वप्रथम व्यवस्थित गजापूर गावातील लोकांचे नुकसानीचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई सरकारने तातडीने दिली पाहिजे. सध्या सरकारने दिलेले रू. 25000/- चेक अगदीच अपुरे आहेत.
02. प्रत्येक नुकसानीचे वेगवेगळे एफ.आय.आर. दाखल केले पाहिजेत.
03. एस.आय. टी नेमून उच्च न्यायालयाच्या निगराणीखाली त्याची चौकशी व्हावी व दोषींना कडक शिक्षा व्हावी. त्यांच्यावर दहशतवादाचा गुन्हा दाखल व्हावा.
04. ह्या हल्ल्याचा कट कोणी, कधी आणि कुठे केला, याचा मुळ सूत्रधार कोण आहे हे शोधून काढावे.
05. महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी लोक व इतर काही भाजपचे आमदार यांच्याकडून बरीच द्वेषजनक भाषणे दिली गेली आहेत. आर्थिक स्थैर्यात देशात पहिल्या क्रमांकावर असलेले महाराष्ट्र राज्य आहे.
अशा घटना जर वारंवावर घडत असल्या तरी त्याचे रूपांतर हिंसेमध्ये होणार यात शकांच नाही. द्वेषजनक भाषनांवर देखील शासनाने कठोर कार्यवाही केली पाहिजे, अशा मागण्या प्रतिनिधी मंडळाने शासनाकडे केल्या आहेत.
Post a Comment