(१८५३-१९२२)
मलबार मोपला विद्रोहाचे राष्ट्रीय भावनेने नेतृत्व करणारे मौलवी अली मुसलियार. या विद्रोहाचा सुमारे १२० वर्षांचा इतिहास आहे. त्यांचा जन्म १८५३ मध्ये केरळच्या पूर्व मंजेरी जिल्ह्यातील पंडिक्कडजवळील नेल्लीक्कट्टू गावात झाला. त्याचे वडील इरिककुन्नन पल्लट्टू मल्याळी कुंची मोहिद्दीन आणि आई अमीना होते. मौलवी मुसलियार यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या मूळ गावी झाले आणि नंतर त्यांनी मक्का येथे प्रवास केला, जिथे त्यांनी आध्यात्मिक शिक्षण घेतले. मूळ गावी परतल्यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. मलबार मोपला शेतकऱ्यांवर ब्रिटीश सरकारी अधिकारी आणि मूळ जमीनदारांनी केलेले अत्याचार त्यांनी जवळून पाहिले आणि त्यांनी इंग्रजांना हाकलून देण्याचा निर्णय घेतला. १९१६ मध्ये त्यांनी या संदर्भात प्रयत्न सुरू केले असतानाच भारतीय राष्ट्रीय चळवळीचे वारे मलबारपर्यंत पोहोचले होते. महात्मा गांधी आणि मौलाना मोहम्मद अली आणि इतर नेत्यांच्या प्रभावाखाली ते राष्ट्रीय चळवळीत सामील झाले. त्यांनी तरुणांना इंग्रजांविरुद्ध बंडाचा मार्ग निवडण्याचे आवाहन केले आणि प्रशिक्षित तरुणांसह क्रांतिकारी गट सुरू केले. त्यामुळे इंग्रज खूपच संतापले आणि त्यांना ‘डेंजरस पर्सन’ घोषित करून त्यांना अटक करण्याचा निर्णय घेतला. तथापि, अलींची अटक रोखण्यासाठी, खिलाफतचे नेते मौलवी कुनी कादर यांच्या नेतृत्वाखाली लोकांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड केले. गोळीबार करूनही पोलिस लोकांना नियंत्रित करू शकले नाहीत. जमावाला पकडण्यात ते अपयशी ठरल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी तेथून माघार घेतली. मौलवींनी परिस्थितीचा उपयोग करून आपल्या क्रांतिकारी गटांच्या मदतीने तिरुंगडी क्षेत्राची प्रशासकीय सूत्रे हाती घेतली. या घडामोडींमुळे संतप्त होऊन ब्रिटीश अधिकाऱ्यांनी मौलवींना संपवण्याचा निर्णय घेतला. मौलवींना त्यांच्या जीवाला आणि लोकांसाठी असलेला धोका जाणवला. मौलवी अली मुसलियार यांनी केशव मेनन, मोहम्मद अब्दुर रहमान, यू. गोपाल राव, मौलवी ई. मोईडू आणि इतरांसारख्या राष्ट्रीय नेत्यांशी या विषयावर चर्चा केली. लोकांचे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी इंग्रजांशी चर्चा करण्याची तयारी जाहीर केली. ब्रिटीश अधिकाऱ्यांनी चर्चेसाठी सहमती दर्शवली परंतु ते प्रचंड पोलिस फौजफाट्यासह तिरंगडीला पोहोचले. त्यांनी तिरंगडी येथील जामा मस्जिदला वेढा घातला जिथे मौलवी अली राहत होते आणि गोळीबार सुरू केला. त्यांच्या ११४ अनुयायांसह मौलवींना पोलिसांनी घेरले होते. दोन्ही बाजूंच्या संघर्षात मौलवी गटातील २२ जण आणि २० पोलिस कर्मचार्यांना जीव गमवावा लागला. शेवटी, मौलवी मुसलियार आणि त्यांच्या अनुयायांनी आत्मसमर्पण केले. ब्रिटीश सरकारने मौलवी आणि त्यांच्या अनुयायांना त्यांच्या वतीने वकील नेमण्याची संधीही दिली नाही. त्यांच्यावर खटला चालवणाऱ्या विशेष न्यायालयाने मौलवी लींसह १२ जणांना फाशीची, तिघांना हद्दपारीची आणि ३३ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तथापि, मौलवी मुसलियार यांचा मृत्यू १७ फेब्रुवारी १९२२ रोजी मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी होण्यापूर्वीच झाला.
लेखक : सय्यद नसीर अहमद
भाषांतर : शाहजहान मगदुम
Post a Comment