माणूस हे तर सांगू शकतो की त्याचा जन्म कुठे झाला, पण त्याचा मृत्यू कुठे होईल? हे त्याला सांगता येत नाही. अनेकदा असे दिसून येते की एखादी व्यक्ती काही कामानिमित्त बाहेर पडते आणि त्याचा मृत्यू त्याच्या घरापासून दूर एखाद्या शहरात किंवा परदेशात होतो. माझे एक नातेवाईक असलेले वृध्द दाम्पत्य आपल्या मुलाला भेटण्यासाठी नांदेडहून औरंगाबादला आले होते. आठवडाभर आपल्या कुटुंबासोबत हसत बोलत राहिले. मग एके दिवशी सकाळी जेव्हा ते परतीला निघाले तेव्हा मुलगा म्हणाला की अजून दिवसभर थांबा आणि संध्याकाळी जा, म्हणून दोघे सायंकाळच्या गाडीने नांदेडला निघाले. जालन्याला पोहोचेपर्यंत फोनवर मुलाचे वडीलांशी चांगले दोन चार वेळा बोलणे झाले. त्यांची तब्येत आतापर्यंत चांगली होती, मात्र जालना येताच बिघडली. लोकांच्या मदतीने ते खाली उतरले. योगायोगाने त्यांच्या मोहल्ल्यातील एक सेवाभावी तरूण त्याच ट्रेनने नांदेडला जात होता. तोही या दाम्पत्याच्या मदतीसाठी खाली उतरला. त्याच्या प्रयत्नांमुळेच दवाखाना गाठणे शक्य झाले. मात्र तिथे डाक्टरने मृत्यू झाल्याचे सांगितले आणि मृतदेह घेऊन ते सर्व नांदेडला परतले. आई-बाबाची वाट पाहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले. मयत कधीही जालन्याला गेले नव्हते किंवा तिथे त्यांचे कुणी नातेवाईकही नव्हते. कुटुंबियासाठी ही घटना अतिशय त्रासदायक आणि असामान्य होती. या प्रसंगी एकाने आपले मत व्यक्त केले की मृत्यूची वेळ तर ठरलेली आहेच, पण सकाळी निघाले असते तर बरे झाले असते. त्यांचा मृत्यू नांदेडमधील आपल्या कुटुंबात झाला असता आणि त्रासही टळला असता, पण हा विचार वास्तविकतेच्या विरुद्ध आहे. मृत्यूच्या ठिकाणाबाबत पवित्र कुरआनमध्ये म्हटले गेले आहे की,
व मा तद्-री नफ्सुन बिअय्यि अर्-जिन तमूतु, इन्नल्ला-ह अलीमुन खबीरुन.
अनुवाद :- ‘’आणि कोणत्याही व्यक्तीला हे माहीत नाही की त्याला कोणत्या भूमीवर मृत्यू येणार आहे, अल्लाहच सर्वकाही जाणणारा व माहितगार आहे.’’ ( 31 लुक्मान : 34 )
आदरणीय अब्दुल्लाह इब्ने मस्ऊद (रजि.) यांनी वर्णन केले आहे की आदरणीय पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, जेव्हा तुमच्यापैकी एखाद्याच्या मृत्यूची नियोजित वेळ, एखाद्या विशिष्ट ठिकाणी लिहिली जाते तेव्हा त्याची गरज त्याला त्या ठिकाणी घेऊन जाते. मग जेव्हा तो शेवटच्या टप्प्यावर पोहोचतो तेव्हा अल्लाह त्याचा आत्मा ताब्यात घेतो.
( हदीससंग्रह इब्ने माजह् - 4263 )
नांदेडच्या दुसऱ्या परिवाराची घटना अशीच काही आहे. एक सद्गृहस्थ आपल्या पत्नीला उपचारासाठी मुंबईला घेऊन गेले. तेथे त्यांच्यावर चांगले उपचार झाले. दोघेही काही काळ तेथे राहीले, फिरले. मग त्यांनी काही विचार करूनच कारने परत येण्याचा निर्णय घेतला. वाटेत अहमदनगरजवळ रुग्णाला वेदना जाणवल्या. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. लोकं म्हणू लागले की अशा आजाराच्या अवस्थेत कारने येणे योग्य नव्हते, रेल्वेने यायला हवे होते. मृत्यू झाल्यावर असा विचार करणे कुरआन आणि हदीसमध्ये असलेल्या शिकवणुकीच्या विरुद्ध आहे.
माणसाचे ज्ञान अत्यंत मर्यादित आहे आणि तो आपल्या निर्मात्यासमोर अत्यंत लाचार आहे. अचानक एक घटना घडते आणि त्याच्या जीवनात मोठे बदल घडतात. ज्याची कल्पना क्षणभर पुर्वीही कुणाला नसते. उद्या आपले काय होईल? आपले आयुष्य कुठे आणि कसे संपेल? हे स्वत:लाही माहित नसते. मात्र ही सर्व माहिती जाणणारा फक्त अल्लाह आहे. माणसाला एक एक गोष्ट आधीच जाणून घ्यायची इच्छा असते जेणेकरून तो त्यासाठी काही बंदोबस्त करू शकेल, पण अल्लाहने ते सर्व ज्ञान स्वत:कडेच ठेवले आहे. त्यामुळे माणसाच्या हाती चांगले प्रयत्न करण्याशिवाय काहीही नाही. योग्य प्रयत्नानंतर आपल्या जीवनाचे निर्णय अल्लाहची मर्जी आणि त्याच्या नियोजनावर सोडून देणे याशिवाय माणसासमोर दुसरा पर्याय नाही.
...................... क्रमशः
- अब्दुल कय्यूम शेख अहमद.
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment