विशाळगड दंगल व हिंसाचाराच्या निमित्ताने विद्वेषी, धर्मांध, जातीवादी राजकारण पुन्हा एकदा समोर आले आहे. अशा उथळ, हुल्लडबाज व हिंसक आंदोलनाचे नेतृत्व छत्रपती संभाजी राजे यांनी करणे हे अतिशय लाजिरवाणे आहे. छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा जोपासायचे सोडून हा कोणता अज्ञानी, अपरिपक्व व सवंग विचार आचरत आहेत? अशा प्रकारच्या विचार व चळवळीतून त्यांच्या स्वराज्य संघटनेचे कोणते राजकीय भवितव्य निर्माण होणार आहे? आपल्याच संस्थानातील गोरगरीब जनतेला वेठीस धरून त्यांचे राजकारण, समाजकारण उभे राहिल? त्यांच्या संघटनेचे कोणतेही निश्चित विचार व ध्येय नसल्याने ‘नरो वा कुंजरो’ भूमिकेमुळे त्यांना राज्यसभेतील खासदार पदही गमवावे लागले. असो. त्यांचे राजकारण त्यांचे बरोबर, कोल्हापूरच्या जनतेला त्याचेशी कांहीही देणेघेणे नाही. त्यांचे भविष्याचा मात्र त्यांनी निश्चित विचार करावा. सवंग हिंदुत्ववादी राजकारणात त्यांचा निव्वळ हत्यार म्हणून वापर होवू शकतो. या चक्रव्यूहात त्यांनी सापडू नये. छत्रपतींचे वारस व करवीरचे युवराज म्हणून आम्हाला थोडी काळजी वाटते एवढेच.
छत्रपती शिवराय व राजर्षी शाहू महाराजांचे विचार व कार्य त्यांनी एकदा अभ्यासावे. गोरगरीब अठरापगड जातीच्या लोकांना त्यांनी पोटाशी धरले आणि त्याच लोकांचे मनात स्वराज्याचे स्फुलिंग जागृत करून याच लोकांच्या मदतीने स्वराज्य निर्माण केले. यांनी कधीच आपले राज्य फक्त हिंदुचेच म्हंटले नाही. स्वतःला शिवभक्त म्हणवणारे मात्र त्यांचे विचार आणि कार्याला विकृत करत आहेत. आणि त्यांचे महान मोठेपण संकुचित, विकृत, धर्मांध विचारांनी संपवायचा प्रयत्न करत आहेत. शिवरायांच्या सेवेत असणारे अनेक पराक्रमी व स्वराज्यासाठी बलिदान दिलेले निष्ठावंत मुस्लिम सैनिक यांना कधी दिसले नाहीत. पन्हाळ्याच्या वेढ्यातच पराक्रमाची शर्थ गाजवून बलिदान दिलेले सिद्दी वाहवाह त्यांना कधी आठवत नाहीत. ज्या सिद्दी हिलाल यांनी आपले चार पुत्र स्वराज्यासाठी कुर्बान केले ते यांना कधी आठवत नाही. स्वराज्याचा पाया घालण्यासाठी कित्येक मुस्लिम धुरंदरांनी आपले आयुष्य लावले ते यांना कधी दिसत नाही. आपल्या निष्ठावंत मुस्लिम सैनिकांसाठी महाराजांनी रायगडावर आपल्या राजवाड्यासमोर मस्जीद बांधली. त्यांनी गोरगरीबांची घरे कधीच पेटवली नाहीत. उलट ‘गोरगरीब रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका’ असा सक्त आदेश आपल्या सैन्याला दिला होता. सद्गुरु याकृत बाबा, मौनी बाबा, वकील काझी हैदर, दर्यासारंग, अंगरक्षक सिद्दी इब्राहिम, सरनौबत नुरखान, तोफखाना प्रमुख इब्राहिम खान, घोडदळ सेनानी सिद्धी हिलाल, शिवरायांना वाघनखे देणारा रुस्तमे जमान, विश्वासू अंगरक्षक मदारी मेहतर, दौलत खान, शमाखान, दाऊद खान, चित्रकार मीर महंमद ही नावे यांना कधी आठवत नाहीत. महाराजांच्या सैन्यात हजारोंनी मुस्लिम सैनिक होते हे यांना कधी आठवत नाही. हे शिवभक्त एवढे धर्मांध, जातीवादी आहेत की त्यांना ठराविक जातीच्या लोकांचा पराक्रमच आठवतो. राजर्षी शाहू राजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांच्या उद्धारासाठी किती प्रयत्न केले हे आपण जाणतोच. मुस्लिमांच्या शैक्षणिक उद्धारासाठी मोहमेडन एज्युकेशन सोसायटी ची स्थापना केलीच पण त्याचे अध्यक्षपदीही स्वतः राहिले कारण या कार्यासाठी त्यांचे चांगले लक्ष राहिले पाहिजे हे या अंधभक्तांना दिसत नाही.
विशाळगडावरील अतिक्रमणाचे त्रांगडे अनेक वर्षापासून आहे. यामध्ये संभाजीराजे यांनी अलीकडेच वर्ष दोन वर्षापासून लक्ष घातले आहे. याबाबतीत त्यांनी गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे होते. निव्वळ आवाहान व घोषणा करून त्याचा काहीही उपयोग नव्हता. याबाबतीत शासन, प्रशासन व स्थानिक नागरिक यांना एकत्रित विश्वासात घेऊन, कोणावरही अन्याय न करता सामंजस्य व शांततेने हा प्रश्न सोडवता आला असता. छत्रपती घराण्याचे वारसदार म्हणून त्यांचे शब्दाला निश्चितच मान मिळाला असता व त्याचे श्रेयही मिळाले असते. अतिक्रमण वाल्यांचे गडाच्या खाली पुनर्वसन ही करता आले असते. पण असे न करता निव्वळ एकतर्फी घोषणाबाजी केली. याबाबतीत त्यांनी गांभीर्य, परिपक्वता व सामंजस्य दाखवले पाहिजे होते. या प्रकरणाचे राजकारण न करता हा प्रश्न मार्गी लागला असता. असले प्रश्न निव्वळ जातीवादी, धार्मिक राजकारणासाठी लोंबकळत ठेवले जातात. सध्याच्या परिस्थितीबाबत मात्र संभाजी राजेंच्या वर मोठे लांच्छन लागले आहे. या प्रश्नाला त्यांनी आंदोलनाचे स्वरूप दिले. प्रसंगी कायदा हातात घेण्याची भाषा करून अतिक्रमण जबरदस्ती व दांडगावा करून तोडण्याची वल्गना केली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी हातोडा, कुदळ व फावड्यांची पूजन केले. विशाळगडावर जाताना सोबत हत्यारे व अवजारे घेऊन गेले. यातून त्यांचा हेतू स्पष्ट होतो. महाराष्ट्रातील विशेष कार्यकर्त्यांनी यांना घोड्यावर बसवले. हे कोण लोक आहेत हे संभाजी राजेंनी ओळखायला पाहिजे होते. पुढे काय होणार आहे याचे भिडे सारख्या माणसाला माहीत होते. त्यामुळे त्यांनी आधीच आपल्या धारकऱ्यांना यामध्ये सामील न होण्याचे आवाहन केले होते. प्रत्यक्षात काय केले देव जाणे. भडकावलेला जमाव हा आपल्या नेत्याचे सुद्धा ऐकत नाही हे समजायला पाहिजे होते.
विशाळगडवरचे अतिक्रमण हे संभाजी राजेंच्या डोक्यात भरले. पण कोल्हापुरात जुना राजवाडा, भवानी मंडप व संस्थांनच्या इतर ऐतिहासिक वास्तूंच्या आजूबाजूला व वास्तूंना झाकून टाकणारे अतिक्रमण संभाजी राजेंना कधी दिसले नाही. अशा अतिक्रमणामुळे ऐतिहासिक वास्तूंना गलिच्छ व ओंगळवाणे स्वरूप आलेले आहे. अशा ठिकाणी अनेक टपऱ्या, दुकाने भाडेतत्त्वावर दिल्याचे समजते. कित्येक वारसा स्थळे व गोष्टी जमीनदोस्त केल्या आहेत. याबाबत कोण बोलणार?
विशाळगड अतिक्रमण आंदोलनाबाबत संभाजी राजेंनी अनेक चुका केल्या आहेत. याबाबत छत्रपती शिवराय, राजर्षी शाहूंचे वारसदार म्हणून निश्चित जबाबदारी घेतली पाहिजे. त्यांचे आचार, विचारांना हरताळ फसला आहे. याबद्दल त्यांनी छत्रपती शिवराय व राजर्षींची माफी मागितली पाहिजे. त्याचबरोबर विशाळगडावरील सुफी संत सद्गुरू मलिक रेहान विशाळगड बाबा, जे अनेक हिंदू मुस्लिमांचे श्रद्धास्थान आहे. त्यांचा कृपाशीर्वाद आणि सावली महाराष्ट्र, कर्नाटक येथील असंख्य भाविक अनुभवतात आणि जे गोरगरीब व निष्पाप लोक या दंगलीमध्ये भरडले गेले त्यांचीही माफी मागावी. नुकसान भरपाई करावी व त्यांना पोटाशी धरावे. यातून त्यांनी केलेल्या गोष्टीचे कांही प्रमाणात परिमार्जन होऊ शकेल.
एवढ्याने संभाजी राजेंची आपली जबाबदारी संपणार नाही. याची संपूर्ण जबाबदारी म्हणून कायद्याने होणाऱ्या कारवाईला सामोरे जावे लागेल. हिंसाचारात नुकसान झालेल्या निष्पाप, गोरगरीब लोकांच्या साधन, संपत्तीचे मूल्यमापन करून शासनाने ही रक्कम त्यांच्याकडून वसूल करावी आणि कायदा हातात घेऊन जातीय, धार्मिक भावना भडकावून ठराविक जातीच्या लोकांवर अन्याय, अत्याचार केल्याबद्दल प्रशासन, पोलिसांनी कठोर कारवाई करावी. ज्यामुळे येथून पुढे अशा प्रकारचे उथळ व हुल्लडबाज आंदोलन करण्याचे धाडस कोणी करणार नाही.
शफिक देसाई
कोल्हापूर
भ्रमणध्वनी : ९४२१२०३६३२
Post a Comment