प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, जर एखाद्या मुस्लिमाचा कुठे अनादर केला जात असेल, त्याची अवहेलना केली जात असेल आणि अशा वेळी दुसरा कुणी मुस्लिम त्याच ठिकाणी असेल आणि तो ज्यावर अत्याचार होत आहे त्याची मदत करीत नसेल तर अल्लाह अशा व्यक्तीची कुठेही मदत करणार नाही. आणि जर एखाद्या मुस्लिमावर अत्याचार होत असेल आणि दुसरी मुस्लिम व्यक्ती त्याच्या मदतीला धावून येत असेल, तर अशा मुस्लिमाची अल्लाहदेखील मदत करील, जिथे त्याला आवश्यक असेल. (ह. जाबिर (र.), अबू दाऊद)
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, जो व्यक्ती एखाद्या मुस्लिमावर होत असलेल्या सक्तीच्या वेळी त्याची मदत करतो, अल्लाहदेखील कयामतच्या दिवशी त्याच्या अडचणीत मदत करील. जर कुणी एखाद्या गरीब व्यक्ती (आर्थिक व इतर) मदत करील तर अल्लाह त्याची या जगात तसेच कयामतच्या दिवशीसुद्धा मदत करील. जर कुणी एखाद्या मुस्लिमाचे अवगुण झाकून घेईल, तर अल्लाहदेखील त्याच्या उणिवा या जगात तसेच कयामतच्या दिवशी झाकून घेईल. अल्लाह तोपर्यंत आपल्या भक्ताची मदत करत राहतो जोपर्यंत तो आपल्या बांधवाची मदत करत राहतो. (ह. अबू हुरैरा (र.), अबू दाऊद) ह. अबू दरदा (र.) म्हणतात की मी प्रेषित मुहम्मद (स.) यांना असे सांगताना ऐकले आहे की “मला दुर्बल लोकांमध्ये शोधा, कारण अशा दुर्बल लोकांमुळेच तुम्हाला मदत केली जाते आणि तुम्हाला उपजीविका दिली जात असते.” (अबू दाऊद)
अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांचे म्हणणे आहे की तुमचे सेवक तुमचे बंधू आहेत. अल्लाहने त्यांना तुमच्या हाताखाली दिलेले आहे. आणि म्हणून अल्लाहने ज्या माणसाला तुमचा सेवक बनवले आहे त्याला तुम्ही तेच खायला द्या जे तुम्ही खाता, तशीच वस्त्रे परिधान करायला द्या जी तुम्ही स्वतः परिधान करता आणि त्याच्याकडून असे काम करून घेऊ नये ज्याचे त्याच्यात सामर्थ्य नसेल. जर तसा प्रसंग आला तर तुम्हीदेखील त्याची मदत करा. (ह. अबू जर (र.), बुखारी, मुस्लिम) अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, “जेवण आणि वस्त्रे पुरविणे सेवकाचे अधिकार आहेत. आणि त्याच्याकडून अशीच सेवा घेतली जावी जी करण्याची त्याच्यात शक्ती आहे.” (ह. अबू हुरैरा (र.), मुस्लिम)
ह. अब्दुल्लाह बिन उमर (र.) म्हणतात की एक व्यक्ती प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या सेवनेत हजर झाला आणि विचारले की हे अल्लाहचे प्रेषित (स.), आम्ही सेवकाला किती वेळा माफ करावे? प्रेषित (स.) यांनी उत्तर दिले नाही. त्या व्यक्तीने पुन्हा तोच प्रश्न विचारला. प्रेषितांनी मौनच बाळगले. जेव्हा तिसऱ्यांदा त्या व्यक्तीने तोच प्रश्न विचारला त्यावर प्रेषित (स.) म्हणाले, “सेवकाला दिवसातून सत्तर वेळा क्षमा करत जा.” (अबू दाऊद)
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment