दिल्ली येथे काही आठवड्यांपूर्वी लल्लन टॉपचा एक पत्रकार आजादपूर सब्जी मंडी (भाजी मंडई) मध्ये जाऊन टोमॅटो आणि इतर भाज्यांच्या भावाची चौकशी करतानाचा एक व्हिडिओ बनवला. त्या पत्रकाराने सहज एका भाजीविक्रेत्याची मुलाखत घेतली. तो घरी परत निघाला होता. पत्रकाराने विचारले, ‘तुम्ही काही खरेदी केली नाही?’ त्या भाजी विक्रेत्याने (रामेश्वर) सांगितले, ‘माझ्याकडे इतके पैसे नाहीत.’ पत्रकार म्हणाला, ‘तर तुमचा हा ठेला असा रिकामाच जाणार?’ हे ऐकून रामेश्वर यांना रडू कोसळले. त्यांनी इकडे तिकडे पाहण्याचा प्रयत्न केला कुणी रडताना आपल्याला पाहू नये म्हणून. यानंतर या व्हिडिओ आणि रामेश्वरची देशभरता चर्चा होऊ लागली. म्हणजे आजच्या भाषेत व्हिडिओ व्हायरल झाला. पत्रकाराने विचारले, ‘रोज किती कमाई होते?’ ते म्हणाले, ‘१००-२०० रु. कधी काहीच कमाई होत नाही. उपाशीपोटी राहण्याची वेळ येते. एक-दोन दिवस उपासमारही होते. खायला जास्त काही मिळत नाही. कधी जेवण कमी मिळाले तर पाणी पिऊन झोपतो. बरेच लोक नुसतं पाण्यावर गुजरान करतात.’ रामेश्वर सहजतेने आपल्या वेदना मांडत होते. ‘देशातील निम्म्या लोकांना भरपूर खायला मिळावे, बाकिच्यांना काहीच मिळू नये असे होऊ नये.’ असे म्हणताना रामेश्वर कल्याणकारी राज्य कसे असावे याची व्याख्या करत होते. भलं मोठं भाषण नाही, शोधनिबंध नाही. काही वाक्ये स्वाभाविकपणे तोंडातून बाहेर पडत होते. त्यांचे म्हणणे बारकाईने ऐकल्यावर साहित्य कसे असावे, सामान्य लोकांपर्यंत ते कसे पोहोचवावे याची जाणीव होईल. रामेश्वर यांचा व्हिडिओ सगळीकडे पोहोचला. दुसऱ्या दिवशी राहूल गांधी त्यांचा शोध घेण्यासाठी आजादपूर भाजी मंडईला गेले. भेट झाली नाही. तसे लल्लन टॉप वाल्यांनी त्याचा शोध घेण्याची सुरुवात केली. काही दिवसांनी भेट झाली. या भेटीत त्या पत्रकाराचे उत्तर देताना रामेश्वर म्हणाले, ‘गोरगरीब उद्ध्वस्त होत आहेत, श्रीमंत वाढत आहेत.’ याच मुलाखतीत त्यांनी त्या पत्रकाराकडे राहूल गांधी यांना भेटण्याची इच्छा सहज व्यक्त केली. ‘मला भेटायचेच आहे,’ असे म्हटले नाही. हसत हसत म्हटले. नंतर काही दिवसांनी राहूल गांधी यांनी त्यांना बोलावून घेतले. त्यांच्याबरोबर जेवण केले. याचे त्यांना फार कौतुक वाटले की त्यांनी स्वतः आपल्या हातांनी जेऊ घातलं. त्यांचे हात धुतले. राहूल गांधी यांनी त्यांना विचारले, ‘कुठे राहता?’ आपण मुळचे उत्तर प्रदेशचे असल्याचे सांगून रामेश्वर म्हणाले की शहराकडे आलो होतो, आर्थिक स्थिती सुधरेल या आशेने. पण इथे येऊन ‘झुलसता रहा, झुलसता रहा’. काहीच साध्य झालं नाही, असे म्हणत त्यांनी कोट्यवधी लोकांची व्यथा मांडली जे आपले गाव, आपली मुलंबाळं, आई, पत्नीला सोडून शहराकडे धाव घेतात आणि इथे आल्यावर त्यांचे हाल रामेश्वरसारखे होतात. सडकेवर विक्री करणाऱ्याचे सामान उचलल्यावर लोक एक-दोन दिवस उपाशी राहतात, हेही त्यांनी सांगितले. राहूल गांधी यांनी रामेश्वर यांना बरेच काही विचारले. शहराकडे आल्यावर काही मिळाले नाही याला कोण जबाबदार? असा प्रश्न त्यांनी केला नाही. राहूल गांधींविषयी रामेश्वरचे म्हणणे होते की ते साऱ्या शरीराची तपासणी करतात एका डॉक्टरप्रमाणे आणि कुठे वेदना आहेत ते हुडकून काढतात. ते जर नसते तर ५० टक्के लोक भुकेने मरून जातील. मीही स्वातंत्र्य दिन साजरा केला जेणेकरून गरीबीपासून स्वातंत्र्य मिळावे, इतकी गंभीर गोष्ट रामेश्वर किती सहजपणे बोलून गेले. यावर पत्रकाराने त्यांना विचारले, ‘तुम्ही आता कुणाला मत देणार?’ रामेश्वर यांनी राहून गांधींचे नाव घेतले नाही. ते म्हणाले की जो प्रामाणिक असेल, सत्य असेल त्यालाच मत देऊ. ही रामेश्वर यांची परिपक्वता आहे. ‘इमानदारी का प्रचार करुंगा’ असे ते म्हणाले. शासनाकडून महिन्याला राशन दिले जाते ते कधी कमी कधी बरोबर मिळते. कधी कुणाचे नाव काढून टाकले जाते, पण आम्ही याची विचारपूस करत नाही. जे देवाने दिले त्यावर समाधान. प्रधानमंत्र्यांना आमच्या समस्या काय माहीत असणार, असेही ते बोलले. राहूल गांधी यांनी त्यांना सांगितले की प्रत्येक गरीबाला दर महिन्याला ६००० रुपये देण्याची योजना होती. त्यावर रामेश्वर म्हणतात की जर असे झाले तर लोकांना किती शांतता लाभेल. दुसरीकडे काही सत्ताधारी आहेत ज्यांना ७०-८०-१०० हजार कोटी रुपये त्यांनी कमविले तरी पण त्यांना पुन्हा सत्ता हवी असते आणखीन कमवण्यासाठी. ते सत्ताधाऱ्यांना सांगतात की गरीब माणूस श्रीमंतांचे ओझे आपल्या खांद्यावर घेतो. त्याचे खांदे मोडू नका. जर मोडले तर तुम्ही कुठे बसणार! पत्रकाराने शेवटी रामेश्वर यांना सांगितले की सबंध देश तुम्हाला पाहत आहे, ऐकत आहे. त्यावर त्यांनी उत्तर दिले की साऱ्या देशाला माझे आयुष्य लाभो. सत्ताधारी याचे उलट सांगतात, साऱ्या देशाचे आयुष्य आपल्याला लाभो. या देशातले गोगरीब नागरिक किती विनम्र, संवेदनशील स्वभावाचे आहेत. हे लोक जगात नसते तर साऱ्या मानवजातीचे जगणे बिकट झाले असते.
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक,
मो.: 9820121207
Post a Comment