Halloween Costume ideas 2015

प्रेषित : ज्यांनी 23 वर्षात जगाचे चित्र बदलून टाकले


इस्लामचे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांची सगळ्यात चांगली स्तुती शेख सादी रहे. यांनी केलेली आहे. ते म्हणतात ’’बाद अज ख़ुदा बुजूर्ग तू ही मुख्तसर’’ दूसरे विख्यात शायर डॉ. अल्लामा इक्बाल यांनी म्हटलेले आहे की -

वो दाना-ए-सुबल, खत्म-ए-रसूल, 

मौला-ए-कुल, 

जिसने गुबार-ए-राह को बख्शा, 

फरोग-ए-वादी-ए-सीना, 

निगाह-ए-इश्क-व-मस्ती में 

वही अव्वल वही आखिर, 

वही कुरआँ वही फुरकाँ,

वही यासीन वही ताहा. 

यांच्याशिवाय, तकल्लूफ बदायुनी म्हणतात-

रूख-ए-मुस्तफा है वो आयीना, 

के अब ऐसा दूसरा आयीना, 

हमारे चश्म-ए-खयाल में न 

दुकान-ए-आयीना साज में.

प्रेषितांच्या स्तुतीमध्ये कोट्यावधी शेर व साहित्य निर्माण झालेले आहे. म्हणून वरील तीन शेर नमूद करून थांबतो. अन्यथा हा लेख शेर शायरीनेच भरून जाईल. ही तर झाली मुस्लिमांची गोष्ट. असे गृहित धरूया की, प्रेषितांवरील नैसर्गिक प्रेमामुळे मुस्लिमांनी त्यांच्या स्तुतीमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती केली. मात्र आता चर्चा अशा एका पुस्तकाची ज्याचे नाव  ‘द हंड्रेड’ असे आहे. या पुस्तकाचे लेखक एक अमेरिकन ख्रिश्चन व्यक्ती आहेत. ज्यांचे नाव मायकेल एच.हार्ट असून त्यांचे नाव इंग्रजी साहित्य क्षेत्रात आदराने घेतले जाते. त्यांनी आपल्या द हंड्रेड या पुस्तकात जगातील अशा 100 महान व्यक्तींना सूचीबद्ध केलेले आहे, ज्यांनी जगावर आपल्या कार्याने कायमचा प्रभाव सोडलेला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, स्वतः ख्रिश्चन असून त्यांनी येशू ख्रिश्ताचे नाव या पुस्तकात क्रमांक एकवर न ठेवता इस्लामचे प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांचे नाव क्रमांक एकवर ठेवले आहे.

इस्लामी कैलेंडर प्रमाणे 18 सप्टेंबर 2023 पासून रबी-उल-अव्वल चा महिना सुरू झाला असून प्रेषित मुहम्मद सल्लम यांचा जन्म याच महिन्यात झाला होता. गेल्या काही वर्षांपासून इतरांचे पाहून मुस्लिम युवकांनी सुद्धा देशात (विशेषतः महाराष्ट्रात) ज्या पद्धतीने प्रेषित जयंती साजरी करावयास सुरुवात केली आहे त्यामुळे अनेक गंभीर प्रश्न गंभीर प्रवृत्तीच्या लोकांमध्ये निर्माण झालेले आहेत. प्रेषितांच्या सन्मानार्थ जुलूस काढणे असो, नातीया मुशायरे आयोजित करणे असो की हिरवे रंग तोंडाला फासून गळ्यात हिरवे गमजे घालून मिरविणे असो. हे सर्व प्रकार चिंताजनक तसेच प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्या सन्मानाच्या विरूद्ध आहेत. हे सर्व न करता युवकांनी जर का प्रेषितांच्या शिकवणीवर लक्ष दिले असते आणि त्यांच्या चरित्राचा अभ्यास करून त्यांनी दिलेले आदेश शिरसावंद्य माणून आचरण केले असते तर आज त्यांना अशा स्तरहीन पद्धतीने जयंती साजरी करण्याची वेळ आली नसती व मुस्लिम समाज कुठच्या कुठे गेला असता.

श्रेष्ठ व्यक्तींचे गुणगान करणे त्यांनी दिलेल्या शिकवणीवर आचरण करण्यापेक्षा अतिशय सोपे असते. इतर युवकांप्रमाणे मुस्लिम युवकांनीही हा सोपा मार्ग गेल्या काही वर्षांपासून अनुसरलेला आहे. यानिमित्त अशा कोणत्या महत्वाच्या शिकवणी आहेत, ज्यांच्याकडे युवकांनी पाठ फिरवलेली आहे, याचा संक्षिप्त आढावा या लेखात घेणे अप्रस्तुत होणार नाही.

सर्वात मोठी गफलत म्हणजे मुस्लिम समाज विशेषतः मुस्लिम तरूणांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष करून प्रेषितांच्या पहिल्याच शिकवणीचा अनादर केलेला आहे. आठवण करा तो दिवस! ज्या दिवशी गार-ए-हिरामधून जिब्राईल अलै. यांच्याकडून पहिला धडा ’इकरा (वाच) अल्लाहच्या नावाने’  घेवून प्रेषित घरी आले व त्यांनी आयुष्यभर शिक्षणाला महत्व दिले. शिक्षणासाठी पाहिजे तर चीन पर्यंत जा असा धाडसी संदेश दिला. अरबांसारख्या रानटी लोकांना त्यांनी सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कृतसुद्धा केले. इतके की अवघ्या 30 वर्षात जगाच्या एक तृतीयांश भागावर त्या लोकांचे शासन निर्माण झाले. जे स्वतः जाहील (अशिक्षित) होते. ते जगाचे इमाम झाले. त्यांनी त्या काळातील भौतिक शिक्षण, सैनिकी शिक्षण तसेच अध्यात्मिक शिक्षण घेवून स्वतःची प्रगती केली. आज भारतीय मुस्लिम तरूण शिक्षणाच्या बाबतीत सर्वात शेवटच्या पायरीवर उभा आहे. याची जाणीव जयंती साजरी करणाऱ्यांना खचितच नाही.

उर्दू शाळांतून दिले जाणारे स्तरहीन शिक्षण, मदरशांतून दिले जाणारे एकांगी शिक्षण तर सरकारी शाळांतून दिले जाणारे दर्जाहीन प्रादेशिक भाषांतील शिक्षण. या तिन्ही शिक्षण पद्धतींच्या चक्रव्यूव्हात मुस्लिम तरूण पुरता अडकलेला आहे. बोटावर मोजण्याइतके तरूण दर्जेदार भौतिक शिक्षण तसेच दर्जेदार अध्यात्मिक शिक्षण घेवून स्वतःचा संतुलित विकास करतांना दिसून येतात. बाकींच्या बाबतीत आनंदी आनंद आहे. अर्धवट शिक्षण घेतलेली ही तरूण पीढि, अ‍ॅन्ड्रॉईडच्या पूर्ण आधीन झालेली असून, त्यातून येणाऱ्या घाणीमध्ये गळ्यापर्यंत रूतलेली आहे.

दूसरी गफलत मुस्लिमांनी ही केली की, प्रेषितांची दूसरी शिकवण म्हणजे मीडियाचा उपयोग करण्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. प्रेषितांच्या जीवनातील ती घटना आठवा! जेव्हा प्रेषित सल्ल. गार-ए-हिरामधून घरी आले व त्यांच्या सुविद्य पत्नी व सर्व मुस्लिमांची आई हजरत खतीजा रजि. यांनी प्रेषितांना धीर दिला. सुरूवातीला इस्लामचा प्रसार लपून-छपून केला जात होता पण जेव्हा इस्लामचा उघड प्रसार करण्याची परवानगी मिळाली तेव्हा प्रेषित मुहम्मद सल्लम मक्का शहराला लागून असलेल्या एका उंच टेकडीवर चढले आणि त्यांनी हाक देवून सर्व मक्कावासियांना टेकडीच्या पायथ्याशी गोळा केले व त्यांना सांगितले की,  तुमचा माझ्यावर विश्वास आहे काय? त्यावर लोक उत्तरले, आम्ही तुम्हाला गेल्या 40 वर्षांपासून ओळखतो, तुम्ही सादिक (खरे) व अमीन (विश्वासू) आहात. तुम्ही जे म्हणाल त्यावर आम्ही डोळेझाकून विश्वास ठेवू. त्यावर प्रेषितांनी अल्लाह एक असल्याची व स्वतः त्याचे प्रेषित असल्याची घोषणा केली. त्यानंतर काय झाले? हा प्रश्न अलाहिदा. मात्र त्या काळात उपलब्ध असलेल्या सर्वोत्कृष्ट मीडियाचा वापर करून प्रेषित सल्ल. यांनी आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचविला. त्या काळात कोणालाही कुठलीही घोषणा सार्वजनिकरित्या करावयाची असल्यास तो सबा नावाच्या मक्के शेजारील टेकडीवर चढून जोरजोराने ओरडून लोकांना गोळा करून आपले म्हणणे लोकांसमोर मांडत होता. हाच त्या काळातला मीडिया होता. आज मीडियामध्ये खूप प्रगती झालेली आहे. प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये तीव्र स्पर्धा सुरू झालेली आहे. मात्र मुस्लिम या दोन्ही क्षेत्रात कुठेच नाहीत. आपल्या संवेदना उर्दूमधून व्यक्त करून कर्तव्यपूर्तीचे समाधान मांडण्यात आपण समाधानी आहोत. 

महाराष्ट्रात राहणाऱ्या पावणे दोन कोटी मुस्लिमांच्या भावना मराठीमध्ये व्यक्त करणारे एक दैनिक आपण गेल्या 75 वर्षात उभे करू शकलो नाही. याचा परिणाम असा झालेला आहे की, मीडियाच्या क्षेत्रात आपण फार मागे पडलेले आहोत. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपली बाजू प्रभावशालीपणे मांडण्याची पात्रता सुद्धा आपल्यामध्ये राहिलेली नाही. रोज अनेक वाहिन्यांवर आपण मुस्लिम धर्मगुरूंचा होणारा पानउतारा याची देही याची डोळा पाहतो. आश्चर्य म्हणजे रोज-रोजच्या अपमानाला कंटाळून देवबंद इस्लामी विद्यापीठाचे प्रमुख मौलाना मुफ्ती मुहम्मद अय्युब कास्मी नौमानी यांनी 14 एप्रिल 2017 रोजी अशी दुर्दैवी घोषणा केली की, उलेमांनी कुठल्याही वाहिनीवर जावून इस्लामची बाजू मांडू नये. वास्तविक पाहता कमी शब्दांमध्ये, कमी वेळेमध्ये आपली बाजू प्रभावशालीपणे मांडणारे वक्ते तयार करणे ही देवबंदचीच नव्हे तर सर्व मुस्लिम समाजाची जबाबदारी आहे. मात्र 20 कोटी मुस्लिमांमधून काही शेकडा लोकही असे तयार होवू शकलेले नाहीत. हा प्रेषितांच्या मीडियासंबंधीच्या शिकवणीचा उपमर्द नव्हे काय? याची कोणाला काळजी आहे काय? मुस्लिमांना स्वतःच्या गुणवत्तेवर भरोसा नाही काय?

देशात भ्रष्ट राजनीतिने उच्छाद मांडलेला आहे. आज तेच लोक सुखाने जगत आहेत जे कुठल्या न कुठल्या पद्धतीने भ्रष्टाचार करण्यास पात्र आहेत. शेतीमध्ये भ्रष्टाचार करता येत नाही, म्हणून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यांची कोणाला परवा नाही. देशात अनेक अनैतिक व्यवसाय फोफावलेले आहेत. अनुत्पादक क्षेत्रामध्ये अब्जावधींची गुंतवणूक झालेली आहे. दर शुक्रवारी चार-दोन नवीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. शेकडो मालिका तयार केल्या जात आहेत. अब्जावधी रूपयांची यातून उलाढाल होत आहे. उत्पादक क्षेत्रात मात्र कोणीही गुंतवणूक करण्यास तयार नाही. म्हणून शेती दुर्लक्षित आहे. शेतकऱ्यांची नवीन पीढि शेती करण्यापेक्षा ऑटो चालविण्यास प्राधान्य देत आहेत. महिलांवर सर्व क्षेत्रात अत्याचार वाढत आहेत. शालेय मुलांमध्ये एकमेकांचे खून करण्याइतपत धाडस विविध मालिकांच्या सौजन्याने निर्माण झालेले आहेत. कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये दाम दिल्याशिवाय काम होत नाही. अशाच लोकांचा विकास होत आहे, जे शासन स्थापण्यामध्ये किंवा शासनाला उलथून टाकण्यामध्ये काही भूमिका निभाऊ शकतात. बाकी लोकांचा विकास थांबलेला आहे. किंबहुना विकास वेडा झालेला आहे. हा  अनर्थ अनैतिक लोकांच्या हातात शासनाची सुत्रे गेल्यामुळे होत आहे. अखिल भारतीय मुस्लिम समाज हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. आपल्या प्रिय देशाला एक स्वच्छ आणि नैतिक राजकारण देण्याची जबाबदारी मुस्लिमांचीही आहे. याचा विसर जयंती साजरी करणाऱ्यांना पडलेला आहे.

देशातील मुस्लिम धर्मगुरू, बुद्धीजीवी लोक राजकारणापासून अलिप्त आहेत. प्रेषित सल्ल. यांना अभिप्रेत असलेल्या नैतिक राजकारणाचा परिचय देशाला करून देण्यामध्ये मुस्लिम समाज सपशेल अपयशी ठरलेला आहे. जे मुस्लिम लोक राजकारणात आहेत ते इतरांप्रमाणेच भ्रष्ट आणि अनैतिक आहेत. यांच्यात आणि त्यांच्यात काही फरक नाही. ज्या-ज्या क्षेत्रात मुस्लिमांना संधी मिळाली त्या-त्या क्षेत्रात त्यांनी नैतिक आचरण करून आपला ठसा उमटवायला हवा, हे त्यांचे धार्मिक आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे. अपवाद वगळता मोठ्या प्रमाणात मुस्लिम असे करण्यात अपयशी ठरलेले आहेत. मुस्लिमांमध्येही भ्रष्ट आचरण किती खोलपर्यंत रूजले आहे याचा अंदाज मुस्लिम लोकांच्या नित्य वर्तनातून होतो.

इस्लामला अभिप्रेत असलेली खिलाफत व्यवस्था अवघ्या 30 वर्षात संपलेली आहे. त्यानंतर खिलाफतीच्या नावाखाली बादशाही व्यवस्थेचा अमल सुरू झाला तो आजतागायत सुरू आहे. 20 व्या शतकात अवघे जग लोकशाहीमय झाले आज 21वे शतक सूरू आहे तरी अनेक मुस्लिम देशांमध्ये अजूनही बादशाही व्यवस्थाच चालू आहे. भारतीय मुस्लिमांना संकटात टाकून इस्लामच्या नावाने तयार करण्यात आलेल्या पाकिस्तान नावाच्या राष्ट्रात सुद्धा भ्रष्टाचार इतका बोकाळला आहे की, पंतप्रधान नवाज शरीफ यांना सहकुटूंब लंडन ला पलायन करावे लागले आहे. एकंदरीत मुस्लिम समाजाची ही अवस्था आहे.

एकदा असे झाले की, प्रेषित सल्ल. झोपेतून जागे झाले. तेव्हा त्यांनी पाहिले की, त्यांच्या अंगरख्यावर एक मांजर निवांतपणे झोपलेली आहे. तेव्हा प्रेषितांनी कात्री मागवून आपल्या अंगरख्याचा तेवढाच भाग कापून काढला. जेणेकरून तिची झोपमोड होवू नये. ही घटना प्रेषितांच्या मुक्यााप्राण्यांच्या जीवाची त्यांना किती काळजी होती, हे दर्शविते. आज पाकिस्तानपासून इजिप्तपर्यंत मस्जिदीमध्ये नमाज अदा करणाऱ्या लोकांवर आतंकवादी हल्ले होत आहेत व त्यात शेकडो लोकांचा जीव जात आहे. याच्यापेक्षा प्रेषितांच्या शिकवणीचा अपमान दूसरा कोणता असू शकेल? या लोकांना एवढे कळत नाही की, एके 47 हातात घेवून समाज बदलत नाही तर प्रेषित सल्ल. यांच्या शिकवणीने समाज बदलतो. नो डाऊट इट इज-ए-टेस्टेड फॉर्मुला!

आज एकंदरित अशी परिस्थिती आहे की, अशी कुठलीच सामाजिक कुरीती नाही जी भारतीय मुस्लिमांमध्ये कमी अधिक प्रमाणात नाही. याविषयीची जाणीव आपण जयंती साजरी करणाऱ्यांमध्ये निर्माण करू शकलेलो नाही, हे उलेमा व बुद्धीजीवींचे मोठे अपयश आहे.  इन्क्लाब म्हणजे क्रांती. वाईट व्यवस्थेला हटवून चांगल्या व्यवस्थेची स्थापना करणे म्हणजे क्रांती. जगात अनेक क्रांत्या झालेल्या आहेत. ज्यात फ्रेंच क्रांती, रशियन क्रांती आणि इंग्रजी शासनाविरूद्ध भारतीयांनी केलेली क्रांती यांचा विशेष करून उल्लेख केला जातो. या क्रांत्यांमधून स्वातंत्र्य, समता आणि बंधूभाव यासारखी मानवी मुल्य जगाला मिळालेली आहेत. याचा दावा सभ्य जगामध्ये केला जातो. मात्र प्रेषित सल्ल.यांनी सहाव्या शतकात केलेली इस्लामी क्रांती यापेक्षाही उच्च दर्जाची होती. ती कशी हे आपण पाहूया.

वर नमूद जगप्रसिद्ध क्रांत्यांमधून वाईट व्यवस्था जावून चांगली व्यवस्था निर्माण झाल्याचा दावा केला जातो. तो खरा की खोटा या विवादात न पडता वाचकांचे एका वेगळ्या मुद्याकडे लक्ष वेधण्याचा माझा मानस आहे. प्रत्येक क्रांतीनंतर फक्त सत्ता बदलते लोक तेच राहतात. त्यांच्या सवई त्याच राहतात. सहाव्या शतकात मात्र शासनही बदलले, लोकही बदलले, त्यांच्या सवईही बदलल्या. जगाच्या इतिहासात असे फक्त एकदाच सहाव्या शतकात झाले आहे. प्रेषितांच्या शिकवणीमुळे नुसते अरबी शासनच बदलले नाही तर अरबी समाजसुद्धा बदलला. जुन्या दारूचा शौकीन अरबी समाज असा बदलला की आज 1445 वर्षानंतरसुद्धा मक्का आणि मदिना येथे दारू मिळत नाही. जे अरब मुलींना जीवंत पुरत होते ते मुलींना आपल्या संपत्तीचा वाटा देवू लागले. ज्या अरबांचा लुटीसारखा मुख्य व्यवसाय होता ते जगातील सगळ्यात मोठी चॅरिटी करू लागले. जे अरब व्याज घेत होते ते जागतिक अर्थव्यवस्थेच्या अवकाशात व्याजमुक्त व्यवस्थेमध्ये ध्रुवताऱ्यांसारखे चमकू लागले.

कुठलीही जयंती साजरी करण्याचा इस्लाममध्ये प्रघात नाही व ज्या पद्धतीने आजकाल पैगंबर जयंती साजरी होत आहे, त्या पद्धतीला तर इस्लामी पद्धत म्हणताच येणार नाही. मात्र पैगंबर जयंतीनिमित्त पैगंबर मुहम्मद सल्ल. यांच्या शिकवणीचा ओझरता उल्लेख जो मी या लेखात केलेला आहे त्यावर वाचकांनी लक्ष केंद्रीत केले व त्यानुसार आचरण केले तर आपल्या या प्रिय देशासमोर एक आदर्श समाज कसा असतो? याचे उदाहरण काही वर्षाच्या प्रयत्नानंतर आपण नक्कीच ठेवू शकू आणि तीच आपल्या प्रिय प्रेषित सल्ल. यांना खरी श्रद्धांजली असेल यात माझ्या मनात तरी शका नाही. अल्लाह आपल्या सर्वांना सद्बुद्धी देओ. (आमीन.)

- एम. आय. शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget